सकारात्मकता बाळगा आणि आनंद मिळवा!

0
15

योगसाधना ः 669, अंतरंगयोग- 255

  • डॉ. सीताकांत घाणेकर

कठीण परिस्थितीचा सामना फक्त तीस टक्के व्यक्ती करतात. याचे मूळ कारण म्हणजे त्यांना ‘आयुष्याचा अर्थ’ कळलेला असतो. नपेक्षा मनोदैहिक विविध रोग होतात. आजच्या युगात असे रोग भयानक प्रमाणात वाढले आहेत.

विश्वाकडे चौफेर नजर फिरवली की अनेक सकारात्मक व नकारात्मक घटना सहज नजरेत येतात. सकारात्मक घटना बघितल्या की मन आनंदी होते; पण नकारात्मक घटनांत मन दुःखी होते, ताणतणाव वाढतो. आणि अशा घटना स्वतःला अथवा आप्तेष्टांना भोगाव्या लागल्या तर त्या व्यक्तीची स्थिती महाभयंकर होते. सामान्य व्यक्ती तर भांबावून जाते. मग हे संकट टळण्यासाठी विविध तऱ्हेचे उपाय केले जातात. सुरुवातीला आपण समस्येला सामोरे जाण्याचा प्रयत्न करतो. प्रकृतीवर जर वाईट परिणाम झाला तर मग वैद्यकीय उपचार करतो. समुपदेशकाचा सल्ला घेतला जातो.
काही घटना तर अशा असतात की त्यावर आपले नियंत्रण असत नाही. त्याला आपण नशीब, प्रारब्ध, पूर्वकर्म अशी नावे देतो. अशावेळी अनेकवेळा व्यक्ती, कुटुंब एवढे दुःखी होते, निराश होते की विविध उपाय करू लागते. देवाचा कौलप्रसाद घेतात, कुंडली घेऊन ज्योतिषाकडे, आध्यात्मिक गुरूकडे जातात, तर काही व्यक्ती मांत्रिकाकडे जातात. शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती. या सगळ्या व्यक्ती वेगळ्या असतात. हिंदीत सांगायचे झाले तर ‘अलग’ असतात- ‘गलत’ नसतात. शेवटी आपले भोग आपल्यालाच माहीत असतात.

आपल्या संपर्कात जर अशी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला संपूर्ण मानसिक, भावनिक, धार्मिक व सगळ्यात मुख्य आध्यात्मिक आधार द्यायला हवा.
शास्त्रशुद्ध योगसाधनेमधील विविध योगमार्ग या विविध पैलूंत छान मार्गदर्शन करतात. आजच्या दुनियेत योग शिकवण्यासाठी विविध संस्था आहेत; पण बहुतेक संस्था जास्तकरून हठयोग शिकवतात. यामध्ये शारीरिक पैलूंवर जास्त भर दिला जातो. त्यामुळे शरीराशी संबंधित व्याधीपासून मुक्ती मिळू शकते. मात्र वर बघितलेली समस्या सुटत नाही. बहुतेक योगमार्गामध्ये आसने, श्वासाचे व्यायाम, प्राणायाम, ध्यान वगैरे शिकवले जाते. त्यामुळे काही प्रमाणात मानसिक व भावनिक पैलूंबाबत फायदा अवश्य होतो. खरे म्हणजे वरील समस्येवर आध्यात्मिक पैलूंचा जास्त अभ्यास हवा. त्यासाठी पतंजली योग सुरू करावा.
विविध योगमार्ग ः ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, राजयोग (अष्टांगयोग) यांचा थोडा तरी अभ्यास करून तो स्वतःच्या जीवनातील रोजच्या आचरणात येणे अत्यंत आवश्यक असते. अष्टांगयोगामध्ये सहावा पैलू म्हणजे धारणा. म्हणजे हे ज्ञान धारण करणे, म्हणजेच स्वतःच्या कौटुंबिक व सामाजिक आचरणात आणणे.

हल्ली योग शिकवणाऱ्या संस्था वाढल्या आहेत. योग करणारेदेखील वाढले आहेत, वाढताहेत. पण योगसाधक साऱ्या दृष्टीने अगदी कमीच दिसतात. अपवाद आहेतच. काही नावाजलेल्या संस्था तर यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. काही संस्था तर मोफत योगसाधना शिकवतात. पण तरीदेखील त्यांना तेवढा प्रतिसाद मिळत नाही. उलट त्या संस्थांची मुख्य तत्त्वे न समजल्यामुळे त्यांच्यावर टीका होते. त्यांच्याविरुद्ध लिहिले-बोलले जाते आणि तसा प्रचार केला जातो. पण नुकसान अशा व्यक्तीचे होते. त्या संस्था आपले कार्य भगवद्कार्य म्हणून चालूच ठेवतात.
अशावेळी मला श्री. आनंद कुलकर्णी- एक समुपदेशक- यांच्या छान भाषणाची व उत्तम मार्गदर्शनाची आठवण होते. ते कदाचित योगशिक्षक नसतील, पण त्यांचे विचार योगसाधनेच्या तत्त्वाशी मिळते-जुळते वाटतात.

श्री. कुलकर्णी सुरुवात करतात ती दुसऱ्या महायुद्धातील हिटलरच्या कैद्यांविषयी सांगून. त्यांच्या ‘कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्‌‍’मध्ये (शिबिरांमध्ये) हजारो लोकांना डांबून ठेवले जात असे. त्यांचे विविध तऱ्हेने भयानक हाल केले जात असत. त्या गोष्टी वाचल्या तरी अंग शहारते. मनाला, हृदयाला वेदना होतात. शेवटी या दुष्ट, क्रूर माणसाने स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. शेवटी नियतीचाच न्याय तो! अशा या शिबिरातून शंभरातून फक्त पाच टक्के व्यक्ती बाहेर पडत होत्या, असा उल्लेख आहे. अर्थात, अमानुषीय हालअपेष्टा सोसल्यानंतर. अशा व्यक्तींत एक व्यक्ती होती डॉ. व्हिक्टर फ्रॅन्कल, जे प्रख्यात मनोवैज्ञानिक तज्ज्ञ होते. त्यांनी तुरुंगात तब्बल चार वर्षे हालात काढली. पण ते रडत बसले नाहीत. त्यांनी मानवी मनाचा अभ्यास केला, त्यावर संशोधन केले. तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी अनेक लेख लिहिले, प्रवचने केली, काही निश्चित उपाय शोधून काढले.

डॉ. व्हिक्टर यांच्या म्हणण्याप्रमाणे, कठीण परिस्थितीचा सामना फक्त तीस टक्के व्यक्ती करतात. याचे मूळ कारण म्हणजे त्यांना ‘आयुष्याचा अर्थ’ कळलेला असतो. त्यावेळी त्यांचे शरीरदेखील त्यांना साथ देते. नाहीतर त्यांना मनोदैहिक विविध रोग होतात. आजच्या युगात असे रोग भयानक प्रमाणात वाढले आहेत. त्याचे एक कारण म्हणजे, त्या रोग्यांना फक्त औषधे देतात. त्यांना भावनिक ऊब देऊन त्यांच्याशी आत्मिक जवळीक साधली जात नाही.
डॉ. आनंद एक छान उदाहरण देतात ते आपले आद्य पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे. त्यांचे वय सत्तर वर्षे होते व त्यांना विविध व्याधी होत्या. ते राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार करीत होते, पण तेवढ्यात राजकीय स्तरावर अचानक अशा घटना घडल्या की त्यांना प्रधानमंत्री पद घ्यावेच लागले.
त्यानंतर श्री. नरसिंह राव सतत कामात राहायचे. तेरा ते चौदा तास काम करायचे. आणि आश्चर्य म्हणजे, त्यांच्या व्याधींवर पुष्कळ नियंत्रण आले. पाच वर्षांनी त्यांचा कार्यकाळ संपल्यावर ते राजकारणातून निवृत्त झाले आणि त्यांच्या व्याधी परत जोर धरू लागल्या. सारांश एकच- या आपल्या माकडमनाला सकारात्मक गोष्टीत व्यस्त ठेवायचे, म्हणजे शरीरदेखील साथ देईल.
डॉ. कुलकर्णी सांगतात की प्रत्येक व्यक्तीने स्वतःला रोज दोन प्रश्न विचारायचे- 1) आपण स्वतः आपल्या आयुष्याला अर्थ दिला आहे? 2) येणारा दिवस आपल्याला हवासा वाटतो?
प्रश्नाची विविध उत्तरे असतील- हो, नाही, माहीत नाही वगैरे. त्या उत्तरांप्रमाणे आपल्या जीवनाला गती मिळणार. डॉ. व्हिक्टर यासाठी एक पाच अक्षरी शब्द सांगतात. ‘फ्लॅश’ (इंग्रजीमध्ये).
1) फ्रेण्डस्‌‍ ः ‘एफ’- म्हणजे मित्र परिवार, आपले इष्ट, खरा मित्र कसल्याही परिस्थितीत आपली साथ न सोडणारा, ज्याला आपण विश्वासाने आपल्या सर्व समस्या सांगू शकतो. त्यावर चर्चा करू शकतो. सकारात्मक चिंतन करून, योग्य निर्णय घेऊन त्याप्रमाणे मार्ग काढू शकतो.
2) लर्निंग ः ‘एल’- म्हणजे सतत काहीतरी नवे शिकायचे. त्यामुळे आपल्या मेंदूला गती मिळते. त्याच्या विविध कार्यांमध्ये सुधारणा होते. न्यूरोबायोलॉजिस्ट म्हणतात की अशा व्यक्तींना स्मृतिभ्रंशाचे रोग- ‘आलझायमर’सारखे अथवा ‘पार्किन्सन’सारखे कमी प्रमाणात होतात. शारीरिक व्यायाम केल्यानंतर आपली हाडे, सांधे, स्नायू… निरोगी राहतात तसे.
3) ‘आर्ट’ ः ‘आय’- म्हणजे कला. भारतीय संस्कृतीमध्ये बहात्तर कला आहेत. त्यांतील कुठलीही आपल्याला येते ती कला जोपासायची. उदा. साधे खेळ, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, फुटबॉल… संगीत, नाटक… आपण अनेकजण बालवयात विविध संग जोपासत असतो. संसारातील व्यापामुळे त्यांकडे लक्ष द्यायला वेळ व संधी मिळाली नाही तर आता स्वतःच्या वयाप्रमाणे, शक्तीप्रमाणे त्या सुरू करू शकतो. अगदी शक्य नसल्यास इतरांच्या कलांचा मनापासून आस्वाद घेऊ शकतो. आजच्या जमान्यात यासाठी विविध माध्यमे आहेत.
4) स्पिरिच्युॲलिटी ः ‘एस’- म्हणजे अध्यात्म. ही तर आत्म्याचीच विद्या आहे. अध्यात्माच्या अभ्यासामुळे आम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. त्यामुळे अनेकांना आयुष्याचा नवा, खरा अर्थ समजतो. मन स्थिर राहते. अध्यात्म विद्येमध्ये एक प्रमुख तत्त्व म्हणजे विश्वातील एका अद्भुत शक्तीबद्दल अभ्यास, चिंतन व दृढ श्रद्धा. ही शक्ती म्हणजे परमात्मा. त्याच्या अनेक शक्तींचा अंश आपल्यामध्येदेखील आहे. नियमित अभ्यास व साधनेनंतर ह्याची प्रचिती येते. त्याच्याबरोबर आपला संबंध जुळतो. साधुसंतांनी हेच केले म्हणून ते आपल्या समस्यांना सहज सामोरे जाऊ शकले. इथे सद्गुरू लागतो.
5) हेल्प ः ‘एच’- म्हणजे मदत. येथे फक्त आर्थिक मदत अपेक्षित नाही तर मानसिक, भावनिक संबंध आवश्यक आहे. भारतीय तत्त्वज्ञानात यालाच ‘आत्मिक सेवा’ म्हणतात. इतरांना मदत करता करता आपला ताणतणाव आपोआप कमी व्हायला लागतो. स्वतःच्या समस्या लहान दिसायला लागतात. म्हणून ‘स्वयंसेवक’ होणे आवश्यक आहे.