संस्कृती संचिताचा आजीवन वसा घेतलेल्या डॉ. तारा भवाळकर

0
5
  • पौर्णिमा केरकर

लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड ही बातमीच लोकसाहित्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मनात ऊर्जा निर्माण करणारी आहे. ताराबाईंची निवड हा लोकसाहित्याचा गौरव आहे. बाईंनी आजपर्यंत त्यांच्या मनाच्या गाभ्याला जे पटले, रूचले तेच लिहिले, तेच त्या बोलल्या. स्त्री-जातीच्या सनातन वेदनेला वास्तवाचे परिमाण लावून त्यांनी त्यांच्या सोशिकतेमागच्या प्रचंड ऊर्जाशक्तीला, अनुभवविश्वाला, परंपरेतील शहाणपणाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आकार दिला.

डॉ. तारा भवाळकर हे एक प्रसन्न आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. लोकसंस्कृती ही मातृसंस्कृती मानून ज्यांनी अखंडितपणे वयाच्या 86व्या वर्षातही ऊर्जेने काम केले, करीत आहेत अशा विदुषीची दिल्ली येथे भरणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, हा लोकसाहित्य संस्कृतीचा गौरव आहे.

मनीमानसी लोकसंस्कृतीचा ध्यास घेऊन, त्यासाठी सतत कार्यमग्न राहून त्यांनी आजपर्यंतचा प्रवास केला आहे. लोकसाहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय खरा; पण त्याहीपेक्षा तो त्यांच्या जीवनधारणांचा विषय आहे. माणसाच्या वास्तव जीवनाचे प्रकटीकरण त्यातून प्रतिबिंबित होते; त्याला मानवी जगण्यापासून वेगळे काढताच येत नाही. अभिजनांच्या साहित्याच्या मांदियाळीत ‘लोकसाहित्य’ एक स्वतंत्र अभ्यासाचे क्षेत्र असून, त्यासाठी विचारसंशोधनाची एक परंपरा त्यांनी निर्माण केली. माणसांची एकूणच वर्तनपद्धती; वस्तू, साधन परंपरा; सातत्याने प्रवाहित राहिलेली मौखिक परंपरा अभ्यासताना लोकभाषा, लोकविज्ञान, लोकधर्म, लोककला, लोकसंगीत, लोकसमजुती, लोकव्यवहार यांचा करावा लागणारा विचार त्यांच्या व्यक्तित्वातून तसेच लिखाणातून अभिव्यक्त होत राहतो. कुतूहलबुद्धी, सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि एखाद्या विषयावरील परखड भाष्य स्पष्टपणे नोंदी करून तेवढ्याच ताकदीने त्यांचा धांडोळा घेणे हे डॉ. ताराबाईंनी आपल्या जगण्याचे ध्येयच मानले. त्यांची ज्ञानपिपासू वृत्ती सर्वच लिखाणातून ठळकपणे नजरेत भरते. त्यांचे लिखाण हे फक्त लिहिण्यासाठी म्हणून नाही, तर त्यामागे एक नित्यनूतन परंपरांना जोडणारा विचार असतो. जुने ते सोने हा अट्टाहास येथे दिसत नाही, तर या जुन्यालासुद्धा विज्ञानाधिष्ठित नजरेने अनुभवीत लोकमन त्यातून काय सांगू इच्छित असेल हे समजून घेतलेले आहे. मानवी संस्कृतीची एकात्मता आणि व्यापकता त्यातून अधोरेखित होते. त्यांच्या कुतूहलबुद्धीने त्यांना देशाच्या कानाकोपऱ्यांत नेऊन फिरवले. ‘सीतायन’ हे एक त्यासाठी महत्त्वाचे उदाहरण आहे. तळागाळातील लोकपरंपरेच्या प्रवाहातील स्त्रियांच्या वेदना-विद्रोहाचे दुर्लक्षित राहिलेले दर्शन या संशोधनात्मक ग्रंथातून त्या घडवितात. सीता ही त्यासाठी प्रेरणा ठरली. ‘रामायण’, ‘महाभारत’ ही दोन महाकाव्ये भारतीय लोकमानसाने नेहमीच वंदनीय, पूजनीय मानलेली आहेत. प्रभू रामचंद्रांची अर्धांगिनी म्हणून सीतेलाही सन्मानित केले गेले, मात्र तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व एक स्त्री म्हणून तिच्या जीवन जाणिवांसकट तिला सशक्तपणे वेदना आणि विद्रोहाच्या प्रतिमेतून उभी करीत समाजमनाला डॉ. तारा भवाळकर यांनी विचारप्रवण केले. सीता सोशिक, सहनशील तशीच ती सर्वसामान्य स्त्रीप्रमाणेच पत्नीधर्माचे पालन करणारी होती. प्रभू रामचंद्रांची ती पत्नी होती; आणि हीच तिची ओळख आजपर्यंतच्या साहित्यातून होत आली आहे. परंतु लोकरामायण काही वेगळे सांगू पाहत होते. सीता त्यांच्यासाठी राजाची राणी नव्हतीच, तर लोकपरंपरेतील सर्वसामान्य स्त्रीसारखेच तिचे जगणे होते. ती सोशिक, सहनशील तर होतीच; परंतु तिच्या आयुष्यात सहनशक्तीपलीकडील जेव्हा काही घटना घडल्या तेव्हा मात्र तिला विद्रोह करावाच लागला. त्याची धगधग व्यक्त करताना-
राम… राम म्हनू नये सीतेच्या तोलाचा…
हिरकणी माझी सीता… राम हलक्या दिलाचा…
हे असे धाडस लोकपरंपरेतील स्त्रियांनीच दाखवले. डॉ. ताराबाईंनी तो हुंकार शब्दबद्ध करून मुख्य प्रवाहात आणला. त्यामागची त्यांची साधना, वाचन, व्यासंग थक्क करणारा आहे. ध्यास हाच श्वास होणे म्हणजे काय असते याची प्रचिती या विदुषीच्या एकंदरीत लेखनातून येते.
1 एप्रिल 1939 चा त्यांचा जन्म. 1970 ते 1990 या काळात श्रीमती चंपाबेन वालचंद शाह या सांगलीतील महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केले. त्यानंतर मात्र वाचन, संशोधन, भ्रमंती आणि लेखन याचाच वसा घेऊन जगण्याचे जणू त्यांनी व्रतच स्वीकारले. त्यांची ग्रंथसंपदा खूप मोठी आहे. आजपर्यंत त्यांची एकेचाळीस पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांत ‘तिसऱ्या बिंदूच्या शोधात’, ‘महामाया’, ‘आकलन आणि आस्वाद’, ‘लोकपरंपरेतील सीता’, ‘माझिये जातीच्या’, ‘लोकनागर ‘रंगभूमी’, ‘मातीची रूपे’, ‘मायवाटेचा मागोवा’ आणि अगदी अलीकडेच प्रकाशित झालेले आणि अतिशय गाजलेले पुस्तक म्हणजे ‘सीतायन’ ही त्यांची काही महत्त्वाची पुस्तके.

लोकसाहित्य क्षेत्रातील त्यांच्या या समर्पित कार्याची दखल विविध पातळ्यांवर घेण्यात आली आहे. त्यांच्या पुरस्कार, सन्मानाचीही यादी फार मोठी आहे. त्यात सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी पुणे विद्यापीठाचा पुरस्कार, बँक ऑफ बडोदाचा कृतज्ञता पुरस्कार, ‘लोकसंचित’ ग्रंथासाठी महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार. तसेच अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव मंगल पुरस्कार. कोल्हापूर विशेष कर्तृत्ववान स्त्रीसाठी साहित्यिक क्षेत्रातील कार्यासाठी श्री. ना. बनहट्टी पुरस्कार. पुणे नगर वाचन मंदिर, पुणे ‘मराठी नाट्यपरंपरा शोध आणि आस्वाद’ या ग्रंथासाठी वि. म. गोखले पुरस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ‘मराठी नाट्यपरंपरा शोध आणि आस्वाद.’ ‘रत्नशारदा पुरस्कार’ सह्याद्री वाहिनी. यशस्विनी पुरस्कार. साहित्यरत्न पुरस्कार रत्नाप्पा अण्णा कुंभार स्मृतिमंच, जयसिंगपूर. लोकमत सखीमंच जीवनगौरव पुरस्कार, सांगली. गार्गी पुरस्कार श्री. सिध्दिविनायक न्यास, मुंबई. सु. ल. गद्रे साहित्य पुरस्कार साहित्य संघ, मुंबई.

काकासाहेब खाडिलकर जीवन गौरव पुरस्कार अ. भा. मराठी नाट्य परिषद, सांगली. पद्मश्री विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार, अहमदनगर. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे जीवनगौरव पुरस्कार. शरदचंद्र चट्टोपाध्याय पुरस्कार ः म. सा. परिषद, पुणे. लोकसंस्कृती, नाट्यसेवा पुरस्कार नाट्य-चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट, सांगली. डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान साहित्य सेवा पुरस्कार, सोलापूर. सूर्योदय सेवारत्न पुरस्कार, जळगाव. ज्ञानेश प्रकाशन, शैलजा काळे स्मृती पुरस्कार. मुंबई विद्यापीठाचा कै. डॉ. अ. का. प्रियोळकर स्मृती पुरस्कार. वि. म. गोखले पुरस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे मराठी नाट्यपरंपरा शोध आणि आस्वाद. विशेष वाङ्मय पुरस्कार, वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगाव. ‘माझिये जातीच्या, मराठी नाटक ः नव्या दिशा, नवी वळणे कै. मालतीबाई दांडेकर जीवनगौरव पुरस्कार. साहित्यप्रेमी मंडळ, पुणे के. प्र. महिला गौरव पुरस्कार. शिवलीला सांस्कृतिक कलामंच, सांगली महिला गौरव पुरस्कार. विशाखा वतने पुरस्कार नाट्यपंढरी लातूर ः आकलन आणि आस्वाद या ग्रंथासाठी, असे असंख्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. पुरस्कार, सन्मान, गौरव यांच्याही पलीकडे त्यांच्या लेखनाच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत. त्या म्हणतात, ग्रांथिक परंपरेपेक्षा लोकनिर्मित परंपरेचे विश्व फार वेगळे आहे. लोकपरंपरेतील निर्मिती ही समूहमनाची असते. ती आपापल्या परीने स्वतंत्र असते. म्हणून ती आपल्यापुरती प्रमाण असते. अभिजन परंपरेतील निर्मिती ही पूर्वनियोजित, सामाजिक, धार्मिक हेतूने होते, तर उत्स्फूर्तता, लवचिकता आणि दैनंदिन जीवनरीतीचा मुक्त आविष्कार हे लोकनिर्मितीचे स्वाभाविक वळण असते.

त्यांच्या लिखाणात लोकपरंपरेतील सहजता आणि लवचिकता, जिव्हाळा, आपुलकी आहे. या भावनांना व्यापून राहिलेली विज्ञानाधिष्ठित नजर त्यांच्या ग्रंथात आढळते. जाणिवेपेक्षा नेणिवेचा आणि विचारापेक्षा भावनेचा प्रभाव अधिक गडद होतो तो लोकसाहित्यात. लौकीक जीवन जगताना सर्वसामान्य लोकमनाला बऱ्याच संघर्ष-समस्यांना सामोरे जावे लागते. समाजव्यवस्थाच अशी आहे की तेथे तिची जाचणूक होत राहते. ज्याचं जळतं त्यालाच ते कळत असतं. कुटुंब आणि समाजव्यवस्था या दोन बाबी लोकपरंपरेने अतिशय महत्त्वाच्या मानलेल्या आहेत. त्यांना अडाणी म्हणून हिणवले गेले. कारण असा विचार करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना अक्षरओळख असेलही, परंतु सभोवतालाला समजून घेण्याची साक्षरता त्यांच्याकडे नाही.

डॉ. तारा भवाळकरांनी अगदी रोखठोक शब्दात सांगितले की, या स्त्रिया अनाक्षर असतील, परंतु अडाणी निश्चितच नाहीत. अनुभवाच्या शाळेतील शहाणपण त्यांच्याकडे आहे. ती सर्वांसमोर स्पष्टपणे बोलली नसेलही, त्यासाठी तिला परंपरेची बंधने आड येत होती. मात्र स्वतःला तथाकथित साक्षर समजणाऱ्या समूहाने कधी चीड व्यक्त केली नसेल. अशी चीड लोकपरंपरेतील या मालनीने जात्यापाशी व्यक्त केली. महाभारतातील द्रौपदीचे वस्त्रहरण भर सभेत होत असताना सर्वजण- आप्तस्वकीय, पुरुष, तिचे पाचही पती- निष्क्रिय बसून राहिले ही चीड व्यक्त केली ती याच अनाक्षर स्त्रियांनी. ‘पाच पतीची मी नार अनाथ रंडकी वानी…’ द्रौपदीच्या त्या विटंबनेशी लोकपरंपरेतील मालन भावनिकतेने जोडली गेली आणि एकूणच स्त्री-जातीची अगतिकता, संताप तिने या ओवीतून व्यक्त केला. डॉ. तारा भवाळकर यांनीसुद्धा या अनाक्षर स्त्रीमनाशी स्वतःला मनातळातून जोडून घेतलेले आहे. ‘रामायण’, ‘महाभारता’तील व्यक्तिरेखांशी त्या स्वतःला जोडून घेतात. सीता राणी असूनही ती लोकमनाला का जवळची वाटते याचा त्या मागोवा घेतात. तो वरवरचा नसतो तर तो मायवाटेचा मागोवा असतो. त्यात भावनिक ओल आहेच, शिवाय त्यातील वास्तव आणि वैज्ञानिकतेचा दृष्टिकोन लेखनाला अधिक उंचीवर नेतो. त्यांच्या सर्वच लेखनाला व्रतस्थतेचा पदर आहे. म्हणूनच हातात कसलाही संदर्भाचा कागद न घेता सलग तासन्‌‍तास त्या सह्याद्री वाहिनीसाठी कोणताही रिटेक न घेता बोलू शकतात. एका दिवसात सोळा-सोळा भागांची दृकश्राव्य मुलाखत देऊ शकतात, तीसुद्धा वयाची ऐंशी वर्षे ओलांडल्यावरही! केवढी शक्ती…! एवढा उत्साह कोठून बरे येत असेल…? स्मरणशक्ती तर एवढी तल्लख की वाचलेले सगळेच लक्षात, अगदी संदर्भासकट! ही व्रतस्थ साधनाच आहे! आजही बाई सांगलीत शहराच्या मध्यवर्ती एकट्याच राहतात. अर्थात त्यांची विशाल ग्रंथसंपदा त्यांच्या सोबत आहे तो त्यांचा मूलाधार. भेटायला येणारे-जाणारे अभ्यासक, विचारवंत आहेत.

संशोधनाला समर्पित केलेल्या या विदुषीला त्यांच्याच निवासस्थानी जाऊन मला भेटता आले हे माझे भाग्य. खूप वर्षांची इच्छा होती त्यांना भेटण्याची. सांगलीचेच इतिहास संशोधक, ललित लेखक, म्हणी-उखाण्यांचे गाढे अभ्यासक आणि ताराबाईंच्या सहवासात असलेले सदानंद कदमजी यांच्यामुळेच तो योग जुळून आला. मी, शुभदा आणि समृद्धी… तिघींशीही त्यांनी भरभरून संवाद साधला… स्वतः चहा करून दिला… आम्ही भरून पावलो. यापेक्षा भाग्य म्हणतात ते कोणते? नीटनेटकी नेसलेली सुती साडी.. धवल केस.. कपाळावर मोठी ठळक बिंदी… टिकली आणि चेहऱ्यावर प्रसन्न हास्य! वयपरत्वे थोडी थरथर जाणवत असली तरी त्यांचा व्यासंग त्यांच्या व्यक्तित्वातून गडद होत होता. या महान व्यक्तिमत्त्वाची मी इतकी वर्षे का भेट घेतली नाही याची चुटपूट लागून राहिली. नवता आणि परंपरा यांचा तो सुयोग्य संगम होता. नाही म्हटले तरी गोव्यात त्यांच्या भेटीचा दोनदा योग जुळून आला होता. त्यावेळी मी लोकसाहित्याच्या क्षेत्रात नवीनच होते. गोवा विद्यापीठात त्यांचे व्याख्यान ऐकता आले. आणि एकदा महेश आंगले यांच्या घरी पद्मश्री विनायक खेडेकर यांच्या सहवासात त्यांची भेट घडून आली तो दिवस. सहवास काही तासांचा, पण जीवनजाणिवांना समृद्ध करून गेला.

लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड ही बातमीच लोकसाहित्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मनात ऊर्जा निर्माण करणारी आहे. ताराबाईंची निवड हा लोकसाहित्याचा गौरव आहे. बाईनी आजपर्यंत त्यांच्या मनाच्या गाभ्याला जे पटलो, रूचले तेच त्यांनी लिहिले, तेच त्या बोलल्या. स्त्री-जातीच्या सनातन वेदनेला वास्तवाचे परिमाण लावून त्यांनी त्यांच्या सोशिकतेमागच्या प्रचंड ऊर्जाशक्तीला, अनुभवविश्वाला, परंपरेतील शहाणपणाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आकार दिला. नवीन तंत्रज्ञानाच्या युगाला सहजतेने सामोऱ्या गेल्या. लोकप्रतिभा निरक्षर असेल पण अडाणी नाही हे उदाहरणासह पटवून दिले. या स्त्रियांजवळ असलेली मातृत्वशक्तीच तिला तिनं जीवनभर भोगलेल्या यातनांचा, वेदनेचा वेद करण्याची शक्ती प्रदान करते. लोकसाहित्य याचसाठी वेगळे ठरते. डॉ. तारा भवाळकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी केलेली निवड हा लोकसाहित्याचा, लोकसाहित्यावर मनस्वी प्रेम करणाऱ्यांचा आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीतही लोकवेद प्रवाहीत ठेवलेल्या तमाम ज्ञात-अज्ञात लोककलाकार, लोकमानसांचा गौरव आहे. निसर्गसन्मुख जीवनशैलीचा,
माती आणि संस्कृती संचिताचा गौरव आहे…