योगसाधना: ५४५
अंतरंग योग – १३०
- – डॉ. सीताकांत घाणेकर
आपल्या भारतीय संस्कृतीत भाव व बुद्धी यांचा सुंदर समन्वय दिसून येतो. ही संस्कृती समग्र मानवजातीवर प्रेम करायला शिकवते. त्यापुढे जाऊन पशुसृष्टी व वृक्ष-वनस्पतींवरदेखील प्रेम करायला, त्यांचा आदर करायला शिकवते.
विश्वाकडे चौफेर नजर फिरवली की विश्वाची विविधता लक्षात येते. तसेच हे विश्व किती विस्तारलेले आहे हेदेखील समजते. या सृष्टीत स्थूल व सूक्ष्म घटक आहेत, तसेच जड व चेतन घटक आहेत. पंचमहाभूते, पशू, प्राणी, पक्षी, जीव-जंतू, कृमी-कीटक, वृक्ष-वनस्पती… सगळेच आहे. हे सर्व कितीतरी लाखों वर्षांपासून आहेत आणि पुढेही राहणार. सृष्टिकर्त्याचे कौतुक वाटते की या विविधतेत एकसूत्रतादेखील कमालीची आहे. अनेक घटक स्वतःच्या अस्तित्वासाठी दुसर्यावर अवलंबून आहेत, ही गोष्टच हृदयगम्य आहे.
सामान्य मानवाच्या लक्षात ही बाब येत नाही. पण आपले ज्ञानी ऋषी-महर्षी या विषयाचा अभ्यास, चर्चा, सुसंवाद, चिंतन करीत असत. त्यांची विद्यापीठे, आश्रम जंगलात, निसर्गाच्या सान्निध्यात असत. तिथे शांतता असे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी, साधनेसाठी उत्कृष्ट असे वातावरण असे. निसर्गाची छान कंपने असत.
या अशा विचारांमुळेच भारतीय संस्कृतीमध्ये भाव व बुद्धी यांचा एक सुंदर सुलभ समन्वय दृष्टिक्षेपात येतो. त्याअंतर्गत ही संस्कृती सर्वांना समग्र मानवजातीवर प्रेम करायला शिकवते- कसलाच भेदभाव न ठेवता- राष्ट्र, वंश, रंग, वर्ण, वय, लिंग, स्थिती- शैक्षणिक, आर्थिक. त्यापुढे जाऊन ही संस्कृतीमाता पशुसृष्टी व वृक्षवनस्पतींवरदेखील प्रेम करायला, त्यांचा आदर करायला शिकवते.
सारांश- आत्मगौरव, सृष्टिगौरव, प्राणीगौरव… हे सर्व आत्मिक संबंध इथे दिसतात. म्हणूनच तत्त्ववेत्ते भारतीय दर्शनाला भद्रदर्शन मानतात. ही संस्कृती विभूतीयोग समजावते. श्रीमद् भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय ‘पुरुषोत्तमयोग’ आहे. त्यात पहिल्याच श्लोकात संसारावर अश्वत्थ वृक्षाचे सुंदर रूपक आहे.
श्रीकृष्ण भगवान म्हणतात ः
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्|
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्॥
(गीता १५.१)
- ज्या वृक्षाचे मूळ वर (ब्रह्मात किंवा परमात्म्यात) व ज्याच्या शाखा खाली (मानवादिकांत) असून ज्यास अविनाशी म्हणतात, आणि वेद ही ज्याची पाने आहेत असा (संसाररूपी) अश्वत्थवृक्ष जो जाणतो, तो वेदवेत्ता म्हणजे ज्ञानी होय. येथे बोध घेता येतो तो म्हणजे, भगवंतालादेखील संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा द्यावी असे वाटले. पानांनी वृक्ष शोभतो तसे वेदज्ञान संसाराला शोभविते.
अश्वत्थ वृक्ष औषधीयुक्त आहे. त्याचा हा गुण लक्षात घेऊन आपल्या ऋषींनी त्याला वृक्षसृष्टीचा प्रतिनिधी मानून त्याचे पूजन केले. पिंपळात ईश्वर बघितला, त्याचे स्तवन केले.
मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे|
अग्रतः शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः॥
- म्हणजे आपल्या पूर्वजांना तीनही आदिदेवांचे- ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे या अश्वत्थ वृक्षात दर्शन झाले. भगवान श्रीकृष्णदेखील म्हणतात की, पिंपळ हे माझेच रूप आहे. ते त्याची महत्ता गातात-
‘अश्वत्थः सर्ववृक्षाणाम्’
भारतीय स्त्री वटवृक्ष आणि पिंपळ या वृक्षांची पूजा करते. त्यांनी या वृक्षांबरोबर आत्मीयता साधली आहे. वडाला यज्ञोपवित घातले जाते. भारतीय स्त्री एक पतीव्रता नारी आहे. ती वटसावित्रीचे व्रत करते त्यावेळी वडाची पूजा करते. वृक्षाकडे ती मनहृदयापासून विविध गोष्टींची मागणी करते ः - अखंड सौभाग्याची याचना.
- कौटुंबिक जीवनाची दृढता, स्थैर्यता व विस्तार.
- पतीराजासाठी वटवृक्षाएवढे दीर्घायुष्य व गरज तर यमराजाकडून स्वतःच्या पतीला परत जिवंत करण्याचे सामर्थ्य.
हे व्रतच अत्यंत भावपूर्ण व ज्ञानपूर्ण आहे. या भारत देशाचे व भारतीय संस्कृतीचे दुर्भाग्य म्हणून हे व्रत केले तरी ते एक कर्मकांड म्हणून करतात. त्यावेळी एका पतीव्रतेचे पावित्र्य व सामर्थ्य किती असू शकते याबद्दलचे तत्त्वज्ञान समजून घेतले जात नाही. अनेक मंदिरांच्या प्राकारांत वड-पिंपळ हे वृक्ष हजारो वर्षांपासून आहेत. त्याची कारणे अनेक आहेत ः - ते वृक्ष फार मोठे असतात, त्यामुळे आसपासच्या लोकांना सावली, शीतलता मिळते. प्राणवायू भरपूर प्रमाणात मिळतो. निसर्गाचे दर्शन होते.
- पिंपळाच्या सळसळणार्या पानांतून संगीत निघते.
- पक्ष्यांना घरटी बनविण्यासाठी चांगली जागा मिळते.
आपल्या संस्कृतिपूजकांनी वृक्षांच्या पूजेबरोबर लहान वनस्पतींची, रोपट्यांची पूजादेखील शिकवली. त्यांचा प्रतिनिधी म्हणून तुळशीच्या रोपाचे पूजन केले. तुळसी- हे रोप लहान जरी असले तरी आयुर्वेदाप्रमाणे त्याला फार महत्त्व आहे. - तुळशीची पाने खाल्ली तर रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
- तुळशीची कणसे सर्दी-खोकल्यासाठी औषध म्हणून अत्यंत उपयुक्त आहेत.
- तुलसी चोवीस तास प्राणवायू देते.
- प्रत्येक संस्कारी कुटुंबात तुळसी-वृंदावन असते. सकाळ-संध्याकाळ तिथे निरंजन पेटवून तुळशीची पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीचे ते प्रतीक आहे.
आपल्या देशावर हजारो वर्षे कितीतरी परकीयांनी आक्रमणे झाली. त्यांनी येथील मंदिरे उद्ध्वस्त केली. ग्रंथांची नासधूस केली. मूर्ती मोडून-तोडून टाकल्या. पण तरीदेखील आपल्या श्रेष्ठ सनातन संस्कृतीचे प्रतीक म्हणून गावागावांत, खेड्याखेड्यांत तुळशीवृंदावन ताठ मानेने उभे आहे.
आताच्या फ्लॅट-ब्लॉक संस्कृतीमध्येदेखील अनेक व्हरांड्यात तुलसी-वृंदावनाचे दर्शन मोठमोठ्या शहरांमध्येदेखील घडते.
तुलसीमातेला नमस्कार करताना ः
तुलसि! श्रीसखि शिवे पापहारिणि पुण्यदे|
नमस्ते नारदनुते नमो नारायणप्रिये॥ - लक्ष्मीची भगिनी, कल्याणकारी, पाप दूर करणारी, पुण्यकारक अशी जिची स्तुती करतात ती विष्णूलाही अतिशय प्रिय आहे. अशा तुलसीमातेला मी नमस्कार करतो. कोणाच्याही घरी-खेड्यात किंवा शहरांत तिन्हीसांजेच्या वेळी गेलो व तुलसीकडील पेटते निरांजन व अगरबत्ती बघितली की मन प्रसन्न होते. पावित्र्याचा भाव आपोआप मनात उत्पन्न होतो.
तथाकथित प्रगतीच्या काळात हे दृश्य कमी दिसते. पण काही हरकत नाही. कालाय तस्मै नमः!
विष्णूपूजेत तुलसीमातेचे महत्त्व पुष्कळ आहे. तुलसी विवाहाच्यावेळी त्यांचा आवर्जून उपयोग केला जातो. देवपूजेत इतर पानांचेदेखील महत्त्व आहे. - शिवपूजेत- बेलाचे
- गणेशपूजेत- दुर्वांचे
तसे बघितले तर दुर्वा म्हणजे एक सामान्य गवत; पण आपल्या पूर्वजांनी त्यालाही महत्त्वाची जागा दिली. दुर्वांशिवाय गणपतीपूजन होऊच शकत नाही. दुर्वांत औषधी गुणदेखील आहेत. दुर्वा चावून खाल्ल्या अथवा उकळून त्याचे पाणी प्राशन केले तर आयुर्वेदाप्रमाणे रक्तशुद्धी होते. त्याशिवाय दुर्वांना चुंबकीय शक्तीदेखील आहे. म्हणून ज्या पटांगणात दुर्वा असतात त्यावर चप्पल न घालता थोडावेळ चालावे. मज्जातंतूच्या क्षीणतेचे रोग (न्युरोपथी) बरे होण्यास मदत होते असे तज्ज्ञ सांगतात.
वृक्ष-वनस्पतीशी संबंधित अनेक श्लोक बालपणी मुलांना शिकविले जात असत. आताच्या तथाकथित ‘प्रगत’ समाजामध्ये त्यांचे स्थान थोडे कमीच आहे.
आयुर्बलं यशो वर्चः प्रजाः पशून् वसूनि च|
ब्रह्म प्रज्ञां च मेधां च त्वं नो देहि वनस्पते॥
- हे वनस्पते! तू आम्हाला आयुष्य, बळ, यश, तेजस्विता, प्रजा, पशू, संपत्ती आणि त्याचप्रमाणे ब्रह्माला जाणण्याची व आकलन करण्याची उत्कृष्ट तर्हेची तेजस्वी बुद्धी दे.
खरेच, हे सगळे वाचले की आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान वाटतो. चराचरावर प्रेम करायला शिकवणारी ही थोर भारतीय संस्कृती.
(संदर्भ ः प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले- ‘संस्कृतीपूजन’)