- सौ. दीपा जयंत मिरिंगकर
श्रावणातील झिम्मा फुगडीत आपल्या माहेरचे वर्णन अगदी मनापासून केले जायचे. आणि नागपंचमीला, नाहीतर राखी बांधायला माहेरी जायला मिळणार हा आनंद तिच्या मनात भरलेला असायचा. आता सगळी जीवनपद्धती बदलली. नोकरीच्या व्यापात मालन माहेरी कधी जाणार? पण त्या आठवणी, ती माया मात्र अजून दाटून येते तिच्या डोळ्यांत…
माझ्या माहेरीच्या वाक्या गुजरीच्या
तुझ्या गं माहेरच्यांनी तुला काय दिलं?
माझ्या गं माहेरच्यांनी मला दिला हत्ती
असला कसला हत्ती बाई उधळीतो मोती…
माझ्या माहेरीच्या वाक्या गुजरीच्या
तुझ्या गं माहेरच्यांनी तुला काय दिलं?
माझ्या गं माहेरच्यांनी मला दिली म्हैस
असली कसली म्हैस बाई पाण्यात बैस…
फुगडी घालत आपल्या माहेरचं वर्णन मालन करत होती, माहेरचं मोठेपण सांगत होती, मैत्रिणीला विचारत होती… श्रावणातील झिम्मा फुगडीत आपल्या माहेरचे वर्णन अगदी मनापासून प्रेमाने केले जायचे. आणि नागपंचमीला, नाहीतर राखी बांधायला माहेरी जायला मिळणार हा आनंद तिच्या मनात भरलेला असायचा. आता सगळी जीवनपद्धती बदलली. नोकरीच्या व्यापात मालन माहेरी कधी जाणार? पण त्या आठवणी, ती माया मात्र अजून दाटून येते तिच्या डोळ्यांत.
रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचा, मायेचा आविष्कार. आपल्या संस्कृतीचे प्रतीक. आपल्या संस्कृतीत पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि अग्नी या सार्यांना महत्त्व आहे. वृक्ष, प्राणी या सार्यांना पुजले जाते. तसेच वेगवेगळ्या नात्यांना विशिष्ट दिवशी महत्त्व दिले जाते. पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे हे ‘डे’ नसतील कदाचित, पण त्याहीपेक्षा अगदी साध्या पद्धतीने हे व्यक्त होते.
गेल्या चार महिन्यांत अगदी गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी… सगळेच सण सुनेसुने गेले. उत्साही आणि उत्सवप्रिय गोवेकरांना आता मनातच टाळ, घुमट आणि आरती ऐकावी लागेल अशी चिन्हे दिसताहेत. तरीही आपले रक्षाबंधन घरात जमेल तसे आनंदाने साजरे करायला हवे.
आजूबाजूचे वातावरण बदलणे आपल्याला शक्य नाही. आपल्या आणि समाजाच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतल्यास आपल्याला हा सण घरात राहून, सरकारी नियम पाळून नक्कीच साजरा करता येईल. कारण रक्षाबंधन हा एक कौटुंबिक सोहळा आहे. त्यात घरात अगदी लहान भाऊ-बहीण असतील वा अगदी दूरदेशी राहात असलेला भाऊ. आजकाल राखी पोस्टाने पाठवतात. पत्रलेखन होतच नाही. मॅसेज आणि मेलच्या जमान्यात पत्राचे महत्त्व उरले नाही. पण तरीही राखीबरोबर पत्र लिहिण्याची मजा काही औरच होती!
भारतीय संस्कृतीत प्रमुख सणांमध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीच्या स्नेहाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. देशभरात या सणाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, तर पश्चिम भारतात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो. रक्षाबंधनाशी अनेक कथा जोडल्या आहेत.
एकदा राजस्थानच्या दोन राजांमध्ये भांडण चालू होते. त्यातील एका राजावर मोगलांनी आक्रमण केले. आक्रमणाची संधी ओळखून दुसर्या राजाने मोगलांना मदत करण्यासाठी सैन्य तयार ठेवले होते. पन्ना पण या मोगलांच्या वेढ्यात अडकली होती. तिने दुसर्या राजाला (म्हणजे मोगलांची मदत करणार्या राजाला) राखी पाठवली. राखी मिळाल्यानंतर त्याने उलट मोगलांवरच आक्रमण करून त्यांचा पराभव केला. अशा प्रकारे रक्षाबंधनाच्या धाग्याने दोन राजांच्या मैत्रीचे पक्के सूत्र बांधले गेले.
एकदा भगवान श्रीकृष्णाच्या हाताला जखम झाल्याने रक्ताची धार वाहू लागली. हे पाहून द्रौपदीला राहावले नाही. तिने लगेच आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या हाताला चिंधी बांधली. हाताला बांधलेली चिंधी हीचेच रूप राखीत झाले अशी ही कथा आहे. कृष्ण- द्रौपदीत बहीण-भावाचा बंध निर्माण झाला. त्यामुळे नंतर जेव्हा दु:शासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण केले त्यावेळी श्रीकृष्णाने तिच्या हाकेला ओ देऊन तिची लाज राखली. हा प्रसंग रक्षाबंधनाचेच महत्त्व दर्शवतो.
चित्तौढगडची राणी कर्मावतीने बहादुरशाहपासून स्वत:ची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. हुमायूने राणीच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावली होती.
आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले जाते. अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार व सद्बुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष, राग इत्यादींकडे भावाने आपल्या या तिसर्या डोळ्याने पाहावे या हेतूने बहीण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते. इतका त्या टिळ्याचा खोल अर्थ आहे.
एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात, संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्त्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते, असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे. हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा, बोरांवरून ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा आता परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगतात.
आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध दत्तक्षेत्र पिठापूर या श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानी रक्षाबंधन उत्सव खूप उत्साहात साजरा होतो. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या चरित्रात राखी बांधल्याचा उल्लेख आढळतो. ‘श्रावण शुद्ध पौर्णिमेला नक्की बृहत शिलानगरीत मी येणार. माझी बहीण श्रीवासनी कन्यकांबा माझ्या हाती राखी बांधणार,’ असे प्रत्यक्ष श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या शिष्यांना सांगितल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात आहे. म्हणूनच त्या दिवशी त्यांचे प्रतीक असलेल्या औदुम्बर वृक्षाला भक्त राखी बांधतात आणि आपली मनोकामना व्यक्त करतात. दरवर्षी येथे नारळी पौर्णिमेच्या दिवशी खूप लोक जमतात. या दिवशीच्या दर्शनाला विशेष महत्त्व आहे असे दत्त संप्रदायात मानतात.
नारळी पौर्णिमा आणखी एका दृष्टीने महत्त्वाची असते ते म्हणजे जल-पूजन. समुद्र हे वरुण देवाचे स्थान समजले जाते. वरुणदेव हा पश्चिम दिशेचा रक्षक आहे. त्याला या नारळीपौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.
कोळीबांधवांचे संपूर्ण जीवन सागराशी निगडित असते. त्यामुळे सागराची आपल्यावर कायम कृपा राहावी याकरिता त्याची प्रार्थना करून उतराई होण्याच्या हेतूने नारळीपौर्णिमेचा हा उत्सव मोठ्या उत्साहाने कोळीबांधव साजरा करतात.
नारळीपौर्णिमेच्या बर्याच अगोदर कोळी बांधवांनी समुद्रात जाणे थांबवलेले असते. एकतर तो काळ माशांच्या प्रजननाचा असतो आणि दुसरे म्हणजे, पावसाळा असल्याने समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे कोळीबांधव त्या दरम्यान समुद्रात जात नाहीत. सागराची देवता म्हणजे वरुणदेवतेची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे हे शुभसूचक फळ आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानले जाते. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. ‘सागरे सर्व तीर्थानि’ असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. एकदा ही पूजा अर्पण केली की वरुणराजा तृप्त होतो, समुद्र शांत होतो, असे मानले जाते. आपल्या धन्याला सुखरूप परत आण अशी विनंती कोळी भगिनी समुद्राला करतात. त्यासाठी पूजन आणि नमस्कार करतात. आता आपले सुगीचे दिवस आले म्हणून नाचून-गाऊन हा आनंदोत्सव साजरा केला जातो.
आजकाल नियमाप्रमाणे मासेमारीला या काळात बंदी असते. परंतु आपल्या संस्कृतीत ही बंदी पूर्वापार चालू आहे. धोकादायक समुद्र आणि माशांच्या पैदासीचा हा काळ आपल्या पूर्वजांनी ओळखला होता. सोन्याची अंडी देते म्हणून तिला मारू पाहणारी आपली संस्कृती कधीच नव्हती. ओरबाडून, लुटून न खाता जेवढे सहज मिळेल तेवढे जमवणे, आहे त्यात समाधान मानणे हा आपल्या संस्कृतीचा गाभा. अलीकडे यांत्रिक मासेमारीच्या बोटींनी हे ताळतंत्र सोडलेले दिसते. मनाईच्या काळातही बोटी आत खोल समुद्रात नेल्या जातात. पण खरा कोळी समुद्रदेवतेची नारळी पौर्णिमेला पूजा करूनच आपली होडी दर्यात सोडतो.
या दिवशीची पक्वान्ने नारळाचा भरपूर वापर असलेलीच असतात. एक तर नारळाची बर्फी, किंवा नारळी भात. या नारळी भाताचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून परत कधीही हे पक्वान्न करत नाहीत. फक्त नारळी पौर्णिमेचा हा खास मान!
आताच्या या महामारीत सगळ्या उत्सवांना मरगळ आलीय. शिवाय सामाजिक दुरीही पाळायची आहे. संपर्क, फिरणे सगळे टाळून या परंपरा कशा पाळाव्यात हा प्रश्न आहेच. तरीही भाऊ-बहीण यांचे प्रेम दुरून व्यक्त करणे आणि याही परिस्थितीत मानाने जवळ राहणे शक्य आहे. वेळप्रसंगी ‘हाक मार, मी आहे!’ एवढ्या आधारावर बहीण मोठमोठ्या संकटांना पार करू शकते. त्याचबरोबर बहिणीनेसुद्धा गरज असेल तेव्हा ‘मी आहे’ असे सांगायला काहीच हरकत नाही. ही समानता अशीही व्यक्त व्हायला करोना काही बंधन घालू शकत नाही.
अशा अनेक रोगांना तोंड देत आमच्या मागील कित्येक पिढ्या घट्ट उभ्या राहिल्या. प्रसंगी अर्धंपोटी राहूनही आपला धर्म, संस्कृती टिकवली. त्यांचा वारसा आम्ही पुढेही सांगणार आहोत.