संस्कृतला उज्ज्वल भवितव्य

0
109

– गंगाराम म्हांबरे,  पणजी
‘संस्कृत भारती’ ही संस्कृतच्या प्रचार आणि प्रसारासाठी झटणारी देश पातळीवरील संस्था आहे. संस्कृत ही आतापर्यंत देववाणी मानली गेली. संस्कृतची संपन्नता आणि पुरातत्व यामुळे ही भाषा काही लोकांपुरतीच मर्यादित राहिली आणि इंग्रजांच्या सत्ताकाळात तर ती अस्तंगत होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. प्रादेशिक भाषांचे वाढलेले महत्त्व, हिंदीला मिळालेला राष्ट्रभाषेचा दर्जा आणि इंग्रजीचे वर्चस्व यामुळे स्वातंत्र्यानंतरही, देशात संस्कृतला मानाचे स्थान मिळाले नाही. एखादी भाषा ज्यावेळी लोकांमध्ये स्थान मिळवते, तेव्हाच ती वाढते. संस्कृतचा वापर ज्यावेळी सामान्य माणूस करील, त्यावेळीच ती जनवाणी बनेल. त्या दिशेने संस्कृत भारती प्रयत्नशील असल्याचे सध्याच्या वाटचालीवरून दिसून येते.संस्कृत भारतीच्या अनेक उपक्रमांपैकी ‘संस्कृत संभाषण शिबिर’ या उपक्रमांतर्गत दहा दिवस रोज दोन तास संस्कृत संभाषण शिकवले जाते. नोंदवही हातात नसताना, लेखन न करता केवळ शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये संभाषणातून ही भाषा बोलण्यास शिकवले जाते. दहा दिवसांत विद्यार्थी लहान वाक्ये बोलून एकमेकांशी संवाद साधू शकतात. ही या शिबिराची उपलब्धी आहे. गोव्यात पणजी आणि इतर ठिकाणीही अशी शिबिरे आयोजित केली जातात, ज्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
संस्कृत भाषाबोधन वर्ग – अर्थात जेथे प्रारंभिक व्याकरण, सुभाषिते, भाषेची वैशिष्ट्ये शिकवली जातात, ज्यामुळे संभाषण व लेखन करण्याची तयारी विद्यार्थी करतो. अशी शिबिरे निवासी स्वरुपाची असतात. संस्कृत संभाषण शिबिरे चालवण्याची क्षमता असलेले कार्यकर्ते तयार करण्यासाठी संस्कृत शिक्षक प्रशिक्षण वर्गही आयोजित केले जातात. यावेळी सर्व कार्यक्रम संस्कृतमधून होतात. गीताशिक्षण केंद्रम् हा आणखी एक उपक्रम असून १८ महिन्यांत चार भागांत गीतेच्या माध्यमातून संस्कृत व संस्कृतच्या माध्यमातून गीता शिकण्याचा हा उपक्रम अभिनव आहे.
प्रवेश, परिचय, शिक्षा व कोविद अशा चार सत्रांमध्ये दोन वर्षांत घरबसल्या संस्कृत शिकण्याचा उपक्रम म्हणजे ‘पत्राचाराद्वारा संस्कृतम’. याशिवाय संभाषण संदेश हे संस्कृत मासिक, बालकेंद्रम, पुस्तक प्रकाशनम, संस्कृत-विज्ञान-प्रदर्शिनी असे उपक्रम संस्कृत भारतीतर्फे गोव्यासह देशाच्या सर्वच भागांत चालविले जातात.
संस्कृत शिकणे म्हणजे एखादी नवी भाषा शिकणे असे मानणे चुकीचे ठरेल. आपण लहानपणापासून घरात व देवळांमध्ये कथा, प्रवचनात श्‍लोक ऐकत असतोच. देशातील सर्वच भाषांमधील ५० टक्के शब्द संस्कृत आहेत, त्यामुळे ही भाषा शिकणे कठीण आहे, असे समजण्याचे कारण नाही. देशात कुठेही संस्कृतला विरोध नाही. उलट या भाषेविषयी आदर आणि श्रद्घा आहे. इंग्रजीसारखी परकी भाषा बोलण्यात आपण एका वर्षभरात तयार होतो, मग स्वदेशी आणि सोपी असलेली संस्कृत शिकण्यात अडचण ती कोणती? देशात सध्या १५ संस्कृत विद्यापीठे आहेत. पाच हजार शाळा आहेत. एकूण एक कोटीहून अधिकजण संस्कृत शिकत आहेत. संस्कृत ही संवादभाषा बनावी, असे प्रत्येक भारतीयाला वाटले तर, संस्कृत घरोघरी बोलली जाईल, यात शंकाच नाही. ‘संस्कृत वदतु, न तु संस्कृतविषये’ असे म्हटले जाते. याचा अर्थ असा की, संस्कृतमधून बोला, संस्कृतविषयी नव्हे! संस्कृत शिकणे ही अभिमानाची बाब आहे, आधुनिकतेचे लक्षण आहे, देशभक्तीचे द्योतक आहे, असे ज्या दिवशी वाटेल, त्या दिवशी आपले पाय संस्कृत वर्गाकडे निश्‍चितपणे वळतील.
कला अकादमी, पणजी येथे ७ डिसेंबर रोजी आयोजित ‘राज्यस्तरीय संस्कृत संमेलना’ला उपस्थित राहून आपण संस्कृतीची माहिती व महती जाणून घेऊया.