संस्कार ः जीवनाचा पाया

0
21
  • अशोक प्रभू-मोये

दुसऱ्याच्या मनात चांगल्या गोष्टी घालणे याला ‘संस्कार’ असे संबोधले जाते आणि ते आमच्या मनावर, अर्थातच मानसिकतेवर उमटलेले एकप्रकारचे ठसेच असतात. आणि असे ठसे नक्कीच माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर जणू आपले स्व-रूप दाखवतात, प्रभाव पाडतात.

‘शब्दांचा वापर खूप विचारपूर्वक करा; कारण ते तुमचे संस्कार दाखवतात!’ व्हॉट्सॲपवर हे बोधवाक्य वाचनात आल्यामुळेच हा लेख लिहावासा वाटला. दुसऱ्याच्या मनात चांगल्या गोष्टी घालणे याला ‘संस्कार’ असे संबोधले जाते आणि ते आमच्या मनावर, अर्थातच मानसिकतेवर उमटलेले एकप्रकारचे ठसेच असतात. आणि असे ठसे नक्कीच माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर जणू आपले स्व-रूप दाखवतात, प्रभाव पाडतात.

बहुतेक संस्कार हे जरी दुसऱ्याकडून केले जात असले तरीदेखील माणूस नक्कीच आपणहून ते आत्मसात करू शकतो आणि दुसऱ्याकडून किंवा आपणहून आत्मसात केलेले संस्कार त्या माणसाच्या जीवनात अखंड वास करतात. संस्कारांवरच माणसाची वागणूक आधारित असते, आणि मुखातून शब्दांद्वारे बोलणे हे वागणुकीवर आधारित असल्याने शेवटी ते संस्कारांवरच आधारित असते. आणि म्हणूनच वरील बोधवाक्यात ‘बोलणे संस्कार दाखवतात’ असे ठळकपणे म्हटलेले आहे.

मुखातून शब्द बाहेर काढणे, अर्थातच बोलणे हे विचारपूर्वक असायला हवे असेही त्या बोधवाक्यात स्पष्टपणे नमूद केलेले आहे. कारण शब्दाद्वारे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. एकदा मुखातून बाहेर पडलेला शब्द माणूस कदापि मागे घेऊ शकत नाही. एखाद्याला उद्देशून वापरलेला शब्द त्याला प्रसन्नता, आनंद देऊ शकतो; तसेच त्याच्या हृदयाला जणू एकप्रकारे इजाही करू शकतो. शब्द आपलेपणा राखून ठेवू शकतो, त्याचप्रमाणे आपलेपणा संपुष्टात आणूही शकतो. शब्दाद्वारे नाती जुळू शकतात, त्याचप्रमाणे ती तुटूही शकतात. शब्द गोड तसेच कटूही असू शकतात. शब्दावाटे आपण अनेकांना वश करू शकतो, त्याचप्रमाणे शत्रुत्वही निर्माण करू शकतो. अशी या अडीच अक्षरी शब्दात जणू जबरदस्त शक्ती दडलेली असते. अर्थातच आमच्या जीवनात या शक्तीद्वारे प्रचंड अशी उलथापालथ अचानकही होऊ शकते. कारण कोकणीतील ‘काडली जीब, लायली टाळ्याक’ या म्हणीनुसार आपण मुखातून अचानकच शब्द बाहेर काढू शकतो. कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास एक उच्चारलेला तसेच लिहिलेला शब्द न्यायालयात एखाद्याची बाजू कमकुवत अर्थात कमजोर करू शकतो आणि तो त्यामुळे हरूही शकतो. अशा अनेक कारणांमुळेच वरील बोधवाक्य एकदमच उद्बोधक असे असून ते प्रत्येकाने आत्मसात करावे असे मला वाटते. बोलणे माणसाचे संस्कार दाखवतात यात दुमत असू शकत नाही.

माणूस हा एक सामाजिक प्राणी असल्यामुळे समाजात त्याचे स्थान मुख्यत्वे त्याच्या वागणुकीवरच आधारित असते; आणि वागणूक ही मुख्यत्वे त्याच्या बालपणातील संस्कारांवर आधारित असल्याने प्राचीन काळात बालकावर चांगल्या संस्कारांद्वारे चांगले वळण लावणे हाच त्याच्या आईवडिलांचा एक मुख्य असा दिनक्रम असायचा. ज्याप्रमाणे एक वृक्ष जमिनीत खोलवर तसेच आजूबाजूस रुतलेल्या पाळामुळांद्वारे वादळ-वाऱ्याची सहजासहजी पर्वा न करता ताठ उभा असतो, त्याचप्रमाणे एक बहुमजली इमारत तिच्या मजबूत अशा पायाद्वारेच डौलदारपणे उभी असलेली दृष्टीस पडते. माणूसही असाच संस्कारांच्या आधारावर समाजात डोके वर काढून ताठपणे उभा राहून समाजात वावरू शकतो, नावलौकिक प्राप्त करू शकतो, सफलता प्राप्त करू शकतो, एकप्रकारे चलबिचल न होता चांगल्या-वाईट प्रसंगांना सामोरे जाऊ शकतो. कारण संस्कार हाच त्याच्या जीवनाचा पाया असतो आणि त्यामुळेच तो शांत असेच जीवन जगू शकतो.

एखाद्या बालकावर जन्मानंतरच नव्हे तर ते नऊ महिने आईच्या पोटात असतानाच त्याच्यावर जणू नैसर्गिकरीत्या, आईच्या नकळतच संस्कार होत असल्याचे एका ग्रंथात वाचनात आले, आणि त्याचमुळे एक स्त्री पहिल्यांदाच गरोदर असताना आमच्या समाजात बहुतेककरून तिचे हरप्रकारे अनेक निमंत्रित सुवासिनींच्या उपस्थितीत विशिष्ट अशा संस्कारांद्वारे अनेक प्रकारे कौतुक केले जाते, त्या संस्कारांना कोकणीत ‘फुला माळणे’ असे संबोधले जाते. अशा कौतुकामुळे जणू त्या गरोदर स्त्रीच्या जीवनात त्या चार महिन्यांच्या काळात एकप्रकारे आनंद निर्माण होत असतो. प्रसन्नता निर्माण होत असते. अर्थातच त्याद्वारे ती जणू शांत अशीच राहून तो जीवनकाल घालवीत असते आणि त्याचे पडसाद त्या चार महिन्यांच्या काळात पोटातील बालकावर होत असतात असे मला एका वयस्क विद्वान व्यक्तीने मी त्या संस्कारांचे कारण विचारताच उत्तर दिल्याचे आठवते.

परवाच्या दिवशी एका हॉलमध्ये असे संस्कार चालू असताना त्या हॉलच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला ठेवलेल्या एका मोठ्या स्वागत बोर्डावर ‘वेलकम टू मिसेस रितास्‌‍ बेबी शॉवर सेरेमनी’ असे लिहिलेले वाचनात येताच, ब्रिटनमध्येही अशी प्रथा नक्कीच असेल असा विनोदी भास निर्माण झाला आणि त्याचबरोबर त्या वयस्क विद्वान व्यक्तीचीही आठवण झाली. कारण तो बेबी शॉवर समारंभ असल्याचे कळून आले, ज्याला कोकणीत आपण ‘फुले माळणे’ असे संबोधित असतो.
वास्तविक पाहता संस्कार बालक चालते-बोलते होतानाच्या सुरुवातीपासूनच केले गेले पाहिजेत आणि ते मुख्यतः आईद्वारेच केले जात असतात. कारण बालक बहुतेक काळ आईच्याच सान्निध्यात घालवत असते. संस्कार हे बालकावर फक्त करायचे नसतात तर बालक आपणहून सभोवताली वावरणाऱ्या व्यक्तीद्वारे, त्याच्या वागणुकीद्वारे अनेक संस्कार आत्मसात करत असते. असे अनेक संस्कार विशेषकरून त्याच्या आईवडिलांच्या वागणुकीवर, बोलण्याच्या आधारावर बालक त्यांच्या नकळतच आत्मसात करत असते आणि त्यामुळेच बालकासमवेत पालकांनी आपली वागणूक, आपले बोलणे योग्य असेच ठेवायचे असते.
विद्याभ्यास सुरू होताच बालक गुरुजनांद्वारे, वर्गसहकाऱ्यांद्वारे अनेक संस्कार आपणहून आत्मसात करत असते आणि गुरुजन संस्कारांद्वारेच बालकाला विद्या-ज्ञान देत असतात. कारण मुख्यत्वे संस्कारांच्याच पायावर बालक विद्या-ज्ञान सहजासहजी मिळवू शकते. विद्यार्थिजीवनातही आईवडिलांनी बालकावर संस्कारांच्याच आधारे लक्ष केंद्रित करायचे असते.

प्राचीन काळात तर सोडाच, परंतु माझ्या बालपणात 1950 ते 1960 च्या काळात आमच्यावर अनेक संस्कार लादले जायचे आणि असे बहुतेक संस्कार विशेषकरून धर्म, स्वच्छता, आरोग्य, वागणूक यांच्यावरच आधारित असायचे. उदा. घरात प्रवेश करताना चप्पल, बूट मुख्य दरवाजाच्या एका कोपऱ्यात ठेवणे, तिन्हीसांजेचे 7 वाजण्याच्या पूर्वी घरात हात-पाय धुऊन प्रवेश करणे, देवघरात एकत्र प्रार्थना करणे, वडीलधाऱ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद स्वीकारणे, जेवणापूर्वी, झोपण्यापूर्वी न चुकता हात-पाय धुणे अशा अनेक प्रथा संस्कार म्हणूनच आमच्यावर लादले जायचे आणि त्याच आधारे आम्ही यशस्वी असाच जीवनकाळ घालवू शकलो. कारण ते संस्कार जणू आमच्या जीवनाचा पायाच होय, आणि त्याच्यावरच आपण यशस्वी झाल्याचा प्रत्येकाला नक्कीच भास होईल.
आमच्या समाजात मुलगा आठ वर्षांचा होताच मुंज, उपनयन संस्कार करण्याची प्रथा होती आणि अजूनही आहे. प्राथमिक स्वरूपातील धार्मिक ज्ञान मिळावे हाच त्यामागील मुख्य हेतू असायचा आणि आहे. अशा संस्कारांच्या वेळी ब्राह्मण गायत्री मंत्राद्वारे मंत्रीत केलेले जानवे मुंजाच्या उजव्या बाजूस मानेच्या आधारे घालून त्याला संध्या करण्याचे ज्ञान पण देत असतात. कारण त्यामुळे एकप्रकारे मुंजाला त्याच्या जीवनात धार्मिक संरक्षण प्राप्त होत असते असा समज होता आणि आहे. वास्तविकतेकडे पाहता अशा अनेक संस्कारांमुळे जीवनात एकप्रकारे धार्मिक आधार, स्वास्थ्य, नीटनेटकेपणा, शांती, आनंद, आरोग्य, प्रेम, आपलेपणा अशा अनेक गोष्टींची साथ मिळत असे/असते.

सध्याच्या अतिप्रगतशील युगात संस्कारांना पूर्वीसारखे महत्त्व दिले जात नसून त्याचे जणू समाजात वाईट परिणाम दृष्टीस पडत असतात. उदा. उपनयन संस्कारांच्या अवघ्या काळानंतर, दिवसांनंतरच म्हणा, बहुतेकजण जानवे खुंटीवर टांगतात. गायत्री मंत्र या शब्दाचा उच्चारही करत नसतात. अनेकजण चप्पल, बूट घालूनच घरात प्रवेश करतात, हात-पाय न धुताच जेवण घेतात, झोपी जातात आणि त्यामुळे आमचा संस्कारांवर आधारित जीवनाचा पाया जणू कमकुवत होत असल्याचा भास होत असतो. कारण त्यामुळे माणसाची वागणूक बिघडलेली असल्याचे दृष्टीस पडत असते. तो निरोगी राहू शकत नसतो, जीवनातील प्रसन्नता, आनंद गमावून बसलेला असतो आणि त्यामुळे अशांत असेच जीवन घालवीत असतो.
वर्तमानकाळात हळुवारपणे माणसाला संस्कारांचे महत्त्व कळून चुकल्यामुळे आता गावोगावी मुलाची संस्कार-शिबिरे आयोजित केली जातात आणि वर्तमानपत्रांद्वारे त्यांना जबरदस्त अशी प्रसिद्धी देऊन पालकांना त्यांच्या मुलांना संस्कारित करण्यासाठी एकप्रकारे उत्तेजित केले जाते आणि असे उपक्रम नक्कीच स्वागतार्ह असून पालकांनी त्यांचा लाभ घ्यावा असे वाटते. पालकांनी अशा उपक्रमाचा लाभ घेतल्यास त्याच्या बालकांना जीवनात सुख, शांती, आनंद, प्रसन्नता प्राप्त होऊन त्याचे समाजावर नक्कीच चांगले परिणाम दिसून येतील आणि त्याद्वारे समाजात एकप्रकारे धार्मिक भावना, आपलेपणा निर्माण होईल.
आमच्या देशातील अनेेक संस्कारांद्वारे परदेशी नागरिक प्रभावित होऊन अनेकजण मुलांवर आमचे संस्कार घडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कित्येकदा वाचनात येत असते.
संस्कार हा जीवनाचा पाया असतो याची प्रत्येकाने जाण ठेवणे गरजेचे आहे.