– विद्या प्रभुदेसाई
एकूणच निसर्गाकडे पाहण्याची निकोप आणि स्नेहार्द्र दृष्टी या आणि यासारख्या कितीतरी कवितांनी दिली आहे. आज अवतीभवती दिसणार्या नैराश्य, ताण-तणाव, मानसिक आजार या सार्यांना संतुलित ठेवण्याचे काम त्या काळातील अशा कवितांनी नक्कीच केले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही
माणसाचे सृष्टीशी असलेले नाते कोणीही नाकारू शकत नाही. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ हे सूत्र मांडणारे तत्त्वज्ञान असो वा विश्वातील अणू-रेणूचे समीकरण मांडून वैश्विक सिद्धांत मांडणारे अधिभौतिकशास्त्र (मेटाफिजिक्स) असो सर्वांनीच आपापल्या अभ्यास पद्धतीला अनुसरून व्यष्टीचे सृष्टीशी असलेले नाते मान्य केले आहे. या सृष्टीच्या संगोपन, संवर्धनावरच व्यष्टी वा समष्टीचे अस्तित्त्व अवलंबून असते, हा साधा विचार मनात ठेवूनच मानवी जीवनपद्धती रूढ झाली. स्थल-कालानुसार त्यात बदल झाले असले तरी निसर्ग वा सृष्टीचे महत्त्व शाश्वत राहिले. निसर्ग वा सृष्टी सतत देत असते हे जाणून, देणारा तो देव ही संकल्पनाही दृढ झाली. निसर्ग तत्त्वाचे मानवी जीवनातील महत्त्व आणि मांगल्य यांचे संस्कार पिढ्यांनपिढ्या संक्रांत होत राहिले. कुटुंबातील वडीलधार्यांकडून अलगदपणे पुढच्या पिढ्या या विषयाने संस्कारित होत गेल्या. ‘नदिया ना पिये कभी अपना जल, वृक्ष ना खाये कभी अपने ङ्गल’ …अशा काव्यातूनही व्यक्त होणारी निसर्गाची देयवृत्ती बालवयातच मनावर कोरताना तो निसर्ग आणि त्या निसर्गाची ओळख बालकाला सहजपणे होत राहिली. नदी वा वृक्ष आपले पाणी वा ङ्गळ देताना, घेणारा चांगला आहे की वाईट याचा विचार करत नाही असे सांगून सर्वसमभाव अशा वृत्तीचा आदर्श देणार्या निसर्गाच्या सहवासात असणारा बालक कवितेतून आपले निसर्गाशी जोडलेले नाते प्रत्यक्ष अनुभवीत होता आणि नकळतच बालमनावर निसर्गाविषयीची कृतज्ञतेची भावना कोरली जात होती. वनस्पतीचे सजीवत्त्व जरी विज्ञानाने अलीकडे सिद्ध केले असले तरी हजारों वर्षांपासून वनस्पतीचे वा निसर्गाचे वेगळेपण समजून घेऊन निसर्गाशी भावात्मक एकरूपता साधण्यात माणूस यशस्वी झाला आहे.
निसर्गाने हिशेब न करता माणसाला भरभरून दिले. याविषयीचा व्यक्त केलेला कृतज्ञतेचा भाव, निसर्गावर केलेले भाव-भावनांचे आरोपण त्यातूनच निसर्गाकडे गुरू, सखा म्हणून पाहताना निसर्गाच्या गूढ आणि अनाकलनीय स्वरूपाचेही येणारे अनुभव वेदवाङ्मयातून, लोकसाहित्यातूनही शब्दबद्ध केलेले आहेत. आपल्या परंपरेत निसर्ग हा माणसाच्या प्रत्यक्ष जगण्याचा भाग कसा आहे हे समजावून बालवयातच निसर्गाच्या संगोपन संवर्धनाची जबाबदारी ही आपली म्हणजे माणसाची आहे या विषयाचे बीज बालमनात अशा विविध माध्यमांच्या द्वारे रोवले जात होते. आधुनिक काळात एकूणच मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. मानवी जीवनातील या बदलाचा परिणाम मानवी जीवनदृष्टीवर आणि जीवनशैलीवरही झाला आहे. त्यात भूमंडलीकरण वा जागतिकीकरणाच्या गोंडस आवरणाखाली माणूस भूमिनिष्ठतेपासून दूर जाऊ लागला आहे. यातच भर म्हणून बालवयात,
‘सदा सर्वदा सत्य-वादी, विवेकी न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा’ या संत रामदासांच्या मनाच्या श्लोकांतून मिळणार्या ‘सत्यं वद’च्या बाळकडूची जागा आधुनिकतेच्या नावाखाली आजच्या औपचारिक शिक्षणात ‘टेलिंग लाय.. ओपन युवर माऊथ.. हा..हा..हा’ यासारख्या कवितांनी घेतली. कारणे कोणतीही असली तरी मुलाने खोटे सांगितल्यानंतर होणारी बापाची प्रतिक्रिया बदलली. सत्य बोलण्यातील गांभीर्यही हळूहळू कमी झाले. तसेच डोळ्यासमोर दिसणार्या हिरव्यागार हरिततृणांच्या मखमली गालिच्यावर लोळणार्या ‘ङ्गुलराणी’ची जागा आपल्या बापजाद्यानीही न पाहिलेल्या ‘डॅफोडिल’ने घेतली. नकळतच कवितेतून, एकूणच साहित्यातून मिळणार्या अनुभवाधिष्ठित शिक्षणाकडे पाठ होत राहिली. एक काळ होता जेव्हा औपचारिक शिक्षणातून शिकलेल्या मराठी कविता जीवनाला दिशा देत होत्या. जीवनाकडे पाहण्याची निकोप दृष्टी देत होत्या. आजही आपल्यामध्ये असे कितीतरी लोक आहेत की ज्यांनी अशा कित्येक मराठी कविता त्या वयात अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून अभ्यासल्या असल्या तरी त्या कवितांनी त्यांच्या मनावर कोरलेले संस्कार आजही तसेच आहेत. उदाहरणादाखल अशा काही कवितांचा विचार करता येईल. त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवींची ‘आनंदी आनंद गडे’ ही कविता माहीत नसलेला मराठी माणूस शोधावा लागेल. जीवनातील आनंदाला अधोरेखित करीत मुलांच्या मनावर सकारात्मकतेचे संस्कार करणार्या या कवितेचे आकलन ‘त्या’ वयात जरी शब्दार्थांपुरते मर्यादित झाले असले तरी या कवितेतील ध्वन्यार्थाने केलेले दूरगामी संस्कार आजन्म विसरता येणारे नाहीत. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या संत तुकारामांच्या आध्यात्मिक अनुभूतीचाच प्रत्यय देणारी ही निसर्गानुभूती आहे. म्हणूनच तर हा आनंद नकळत ‘मोद’ होतो. सोनेरी सूर्यकिरण, हसणारी कौमुदी, प्रेमाने ङ्गुललेली संध्या सारेच आनंद गीत गात आहेत. मंद गतीने वाहणारे निर्झर, डोलणारे वृक्ष-वेली, मनोहारी कूजन करणारे पक्षी, विकसित कमल आणि गुंग झालेले भ्रमर हे सारेच निसर्गाचा आनंद लुटत आहेत. ब्रह्मानंद निसर्गाच्या कणाकणात भरून राहिला आहे तरीही, या मोदाला म्हणजे ब्रह्मानंदाला शोधण्यात तो निसर्गच गुंग आहे. माणूस मात्र द्वेष, मत्सर, स्वार्थ यांत इतका गुंतला आहे की त्याला हा आनंद दिसूच शकत नाही.
‘स्वार्थाच्या बाजारात, किती पामरें रडतात त्यांना मोद कसा मिळतो सोडुनी स्वार्था तो जातो’
हे कवीचे जीवन निरीक्षण आहे. मॅथ्यू अर्नोल्ड ज्याला संस्कृतीटिका म्हणतो ती हीच! जीवन हे आनंदमय आहे, निसर्गाकडे पाहून माणसाने आपल्या जीवनाला दिशा दिली तर माणूस खर्या अर्थाने निरामय आनंदी जीवन जगू शकतो. स्ट्रेस, टेंशन हे शब्दही जीवनापासून दूर नेण्याची क्षमता या निसर्गरूपांत आहे. कवितांनी दिलेली ही संस्कारांची शिदोरी बहुधा आजच्या साठोत्तरी वयोगटातील लोकांच्या मनात खोल रुजली असेल यात शंकाच नाही. या कवितेप्रमाणेच भा.रा. तांब्यांच्या ‘या बालांनो’ या कवितेकडेही पाहता येईल.
‘खळखळ मंजूळ गाती झरे; गीत मधुर चहुंबाजुं भरे, जिकडे तिकडे ङ्गुले ङ्गळे, सुवास पसरे, रसही गळे.
अशी ही या नगराला लागून असलेली दुसरी सुंदर दुनिया पाहण्यासाठी, तेथील आनंद लुटण्यासाठी ‘धावून या’ असे कवी सांगतात. पण हे सांगताना, ‘स्वस्थ बसे तोचि ङ्गसे’ असा इशारा द्यायलाही कवी विसरत नाही. वास्तविक ही कविता ब्राउनिंगच्या ‘पाइड पायपर ‘या काव्यावरून केलेल्या ‘पुंगीवाला!’ या रूपांतरित कथाकाव्यातील एक गीत. पाठ्यपुस्तकात स्वतंत्रपणे ही कविता म्हणून समाविष्ट केली होती. या कवितेने त्या काळातील कितीतरी मुलांच्या भावविश्वात आपले स्थान निर्माण केले होते. ‘ङ्गुलांची विनंती’ ही कुसुमाग्रजांची कविताही मागच्या पिढीतील अनेकांनी निश्चितच पाठ्यपुस्तकातून अभ्यासली असेल. कवीने या कवितेत ङ्गुलांच्यावर मानवी भावना आरोपित केली आहे. माणसाला जणू ही ङ्गुले विनंती करीत आहेत, ‘हळूंच या हो हळूंच या!’सकाळी पडणारे गोड ऊन, दवबिंदूंचे सडे पाहून त्याचा आनंद घ्या. आपणही हिरव्या पानातून हळूच वर येऊन ङ्गुलल्याचेही ही ङ्गुले सांगतात. आमचे हृदय इवलेसे असले तरी त्यात गंधाच्या राशी आहेत. या सुगंधाचा अलगद अनुभव घेण्यासाठी हळूच या असे सांगणारी ही ङ्गुले जीवनातील आनंद कसा घेतात हे सांगून शेवटी, ‘निर्मल सुंदर अमुचे अंतर’ असेही सांगतात. याशिवाय ‘ङ्गुलपाखरू’ कवितेतूनही निसर्गातील अशाच अनुभूतीची अभिव्यक्ती आली आहे. छान किती दिसते ङ्गुलपाखरू म्हणून आलेले ङ्गुलपाखराचे वर्णन मुलांच्या मनात जितक्या प्रभावीपणे ठसविले गेले तितक्याच परिणामकारकतेने ङ्गुलांवर उडणार्या ङ्गुलपाखरांचे नाजूक गोजिरवाणे पंख त्यांना धरल्यास तुटून जातील म्हणून ‘धरू नका ही बरे ङ्गुलांवर उडती ङ्गुलपाखरे’ असा संदेश देणार्या कवितांचाही त्याकाळातील पाठ्यपुस्तकांत समावेश होता. एकूणच निसर्गाकडे पाहण्याची निकोप आणि स्नेहार्द्र दृष्टी या आणि यासारख्या कितीतरी कवितांनी दिली आहे. आज अवती भवती दिसणार्या नैराश्य, ताण-तणाव, मानसिक आजार या सार्यांना संतुलित ठेवण्याचे काम त्या काळातील अशा कवितांनी नक्कीच केले आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.