संसद प्रवेशद्वारासमोर सत्ताधारी-विरोधी खासदारांत धक्काबुक्की

0
3

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह व अपमानकारक विधानाचे पडसाद काल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात देखील पाहायला मिळाले. त्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या खासदारांनी कालही आंदोलन छेडले होते. आंदोलनानंतर संसदेत जाणाऱ्या विरोधी खासदारांचा संसदेच्या मकर प्रवेशद्वारावर सत्ताधारी भाजप खासदारांनी मार्ग रोखून धरला. त्यावेळी सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यावेळी भाजपचे खासदार प्रताप चंद्र सारंगी व मुकेश राजपूत आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना दुखापत झाली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर सारंगी यांना धक्का देऊन पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका अपमानकारक वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद वाढत चालला आहे. ‘आजकाल एक फॅशन झाली आहे, आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर… नाव घेण्याची. एवढे नाव जर परमेश्वराचे घेतले असते, तर सात जन्म स्वर्ग लाभला असता, असे आक्षेपार्ह विधान अमित शहांनी मंगळवारी राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान केले होते. या विधानामुळे उद्भवलेला वाद कायम असून, अमित शहांनी माफी मागावी, तसेच त्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेससह विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. काल इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून संसदेच्या मकर प्रवेशद्वारापर्यंत निषेध मोर्चा काढला होता. मोर्चा संपल्यानंतर इंडिया आघाडीचे खासदार संसदेच्या आत जाण्यासाठी निघाले, त्यावेळी भाजप खासदारांनी प्रवेशद्वार ठाण मांडून काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी विरोधी खासदारांनी आत जाण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही बाजूने धक्काबुकी झाली.

>> भाजप खासदाराकडून झालेल्या आरोपांवर राहुल गांधींनी स्पष्टीकरण दिले आहे. मी संसदेच्या मकर प्रवेशद्वारातून आत जात होतो, तेव्हा भाजपच्या खासदार माझ्यासह अन्य विरोधी खासदारांनी वाट अडवली. त्यांनी मला धमकी देत धक्काबुक्की केली, असे त्यांनी म्हटले आहे.

>> काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी या संपूर्ण प्रकारणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच खर्गे यांनी त्यांच्या पत्रात आपल्याला भाजप खासदारांनी त्यांना ढकलल्याचा आरोप केला.