संसदेसह विधानसभांमध्येही महिलांना ३३ टक्के आरक्षणाची मागणी

0
55

>> महिला कॉंग्रेसचे राज्यपालांकडे निवेदन

महिला कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन लोकसभा, राज्यसभा व राज्य विधानसभा यात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मांडावी, अशी विनंती निवेदनाद्वारे त्यांच्याकडे केल्याचे महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुष्मिता देव यांच्या सुचनेनुसार राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सदर मागणी केल्याचे कुतिन्हो यानी यावेळी सांगितले. सदर मागणीसाठी १६ हजार महिलांनी केलेल्या सह्यांचे एक निवेदन डॉ. सिन्हा यांना देण्यात आल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले.
वरील मागणीबरोबरच नगरपालिका, जिल्हा पंचायती व पंचायतींत महिलांना मिळणारे ३३ टक्के आरक्षण वाढवून ५० टक्के एवढे करण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

लाडली लक्ष्मी योजनेत
दुरुस्तीची मागणी
दरम्यान, लाडली लक्ष्मी योजनेखाली मिळणार्‍या पैशांसाठी मुलीच्या सासरच्या लोकांकडून नववधूचा छळ करण्यात येत आहे अशा वाढत्या तक्रारी आहेत व ह्या पार्श्‍वभूमीवर वरील योजनेखाली नववधुला जे पैसे मिळतात ते लग्नानंतर न देता युवती १८ वर्षांची झाल्यानंतर ते तिला शिक्षणासाठी देण्यात यावेत अशी महिला कॉंग्रेसची मागणी असल्याचे कुतिन्हो यांनी यावेळी सांगितले.