संवेदनशील विषयांवर मंत्री, आमदारांशी चर्चेतून तोडगा

0
1

>> सत्ताधारी गटाच्या संयुक्त बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

राज्यातील संवेदनशील विषयांवर मंत्री आणि आमदारांकडून सूचना मागविण्यात आल्या असून, त्या विषयांवर विचारविनिमय करून तोडगा काढला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सत्ताधारी गटाच्या संयुक्त बैठकीनंतर बोलताना येथे काल दिली.

राज्य विधानसभेच्या गुरुवार दि. 6 आणि शुक्रवार दि. 7 फेब्रुवारीला होणाऱ्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाच्या मंत्री आणि आमदारांची संयुक्त बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एका हॉटेलच्या सभागृहात काल घेण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

या बैठकीत गोवा विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनावर चर्चा करून रणनीती निश्चित करण्यात आली. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत सविस्तर माहिती राज्यातील मंत्री आणि आमदारांना देण्यात आली आहे. मंत्र्यांना अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार योजनांसाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्य सरकारचा अर्थसंकल्प मार्च 2025 मध्ये सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाची तयारी सुरू करण्यात आली आहे. मंत्री, आमदारांना अर्थसंकल्पासाठी आपापले प्रस्ताव सादर करण्यासंबंधी सूचना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या बैठकीला मंत्री, भाजपच्या आमदारांबरोबरच मगोपचे नेते व मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार जीत आरोलकर, अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि आंतोन वाझ यांची उपस्थिती होती.