संविधानविरोधी काँग्रेसला गोमंतकीय जनता धडा शिकविणार

0
20

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे उद्गार

>> कुंकळ्ळी येथे भाजपच्या सभेला समर्थकांची गर्दी

संविधानविरोधी काँग्रेस पक्षाला गोव्यात लोक अजिबात थारा देणार नाहीत. यावेळी विक्रमी मतदान करून मतदार भाजपच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देतील असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. कुंकळ्ळी येथे भाजपच्या जाहीर प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

कुंकळ्ळी येथील सभेला भाजप समर्थक नागरिकांची प्रचंड गर्दी होती. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा मतदारसंघ असताना समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या सभेत आमदार दिगंबर कामत, सुभाष फळदेसाई, उमेदवार पल्लवी धेंपो, माजी आमदार क्लाफास डायस, दीपक खरंगटे, सुदेश भिसे, संतोष फळदेसाई यांची भाषणे झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या गोव्यात सभा झाल्या. पण काँग्रेसचे कोणीही नेते गोव्यात आले नाहीत. त्यांनी ह्या दोन्ही जागा गंभीरपणे घेतलेल्या नाहीत. काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी संविधानाचा अपमान केला आहे. तसेच स्वातंत्र्यसैनिकांचाही अपमान केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा देशभर वाईट परिणाम होईल. कुंकळ्ळीच्या ऐतिहासिक उठावाचा पाठ्यपुस्तकात समाविष्ठ करून कुंकळ्ळीच्या उठावाला राजमान्यता देण्याचे काम भाजप सरकारने केले. 60 वर्षे राज्य केलेल्या काँग्रेसला ते शक्य झाले नाही, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
कुंकळ्ळी मतदारसंघाचा जो विकास झाला त्याचे श्रेय भाजप सरकारला आहे. त्याचे श्रेय काँग्रेसने लाटण्याचा प्रयत्न करू नये. काँग्रेस दिशाहीन पक्ष असल्याची टीका मुख्यमंत्र्यानी केली.

उमेदवार पल्लवी धेंपो यांनी सांगितले की, आपले कुटुंब आधीपासून समाजसेवेत आहे. राजकारणापासून समाजसेवा व देशसेवा करणे याच उद्देशाने राजकारणात आले आहे. भाजपने महिला सशक्तीकरणाचा विडा उचलला आहे. आपणास खासदार म्हणून निवडून देऊन पंतप्रधान मोदींचे हात बळकट करावेत असे आवाहन त्यांनी केले.