– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव
संरक्षणमंत्रिपदाचा ताबा घेऊन फक्त दोन दिवसांत आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवून मनोहर पर्रीकर गोव्यात आले आणि पणजी दूरदर्शन आयोजित ‘फोन इन’ कार्यक्रमात त्यांनी संबंधितांना जो सज्जड इशारा दिला, त्याचे स्वागत झाले पाहिजे. ‘नवप्रभा’चे संपादक परेश प्रभू यांनी सुयोग्य असे संचालन केलेल्या या चर्चेत पर्रीकर म्हणाले, ‘जे कोणी भारताकडे वाकडी नजर करून पाहतील, कुरापत काढतील त्यांची नांगी ठेचली जाईल.’ प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा व नवनिर्वाचित संरक्षणमंत्र्यांचे कौतुक करावे, असे धीरोदात्त विचार त्यांनी मांडले, याबाबत त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. पर्रीकरांचे हे उद्गार ऐकले आणि मला माजी संरक्षणमंत्री कै. बाबू जगजीवनराम यांचे उद्गार आठवले. भारत – पाक युद्धात भारताची पाकने बळकावलेली भूमी आपल्या ताब्यात घेत त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता, ‘जर भारताच्या वाटेला पुन्हा याल, तर याद राखा. तुमच्या भूमीत येऊन तुम्हाला पराजित करू.’ तसेच बांगलादेशच्या निर्मितीनंतरही तत्कालीन संरक्षणमंत्री बाबू जगजीवनराम यांनी पाकिस्तानला दम भरीत ‘आता बांगलादेशाची निर्मिती झाली आहे. त्यांना सुखाने नांदू द्या. काही गडबड कराल, तर गाठ आमच्याशी आहे.’ असे सुनावले होते.खरे तर, मनोहर पर्रीकर थोडे नाराजीनेच दिल्लीला गेले. त्यांना आपली उरलेली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत देशहिताकडे जायचे होते, पण गोव्यासारख्या छोट्या राज्यात मनोहर गोपाळकृष्ण पर्रीकरांसारखा ‘हिरा’ किंवा ‘हिरो’ आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हेरले आणि त्यांनी थेट देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर त्यांना विराजमान केले. गोवा सोडून जाताना सद्गदित होऊन पर्रीकर म्हणाले, ‘मला गोवा सोडून जायचे नव्हते. पण मला माझ्या राज्यापेक्षा देशहित मोठे वाटले आणि म्हणून मी पंतप्रधानांचा शब्द शिरसावंद्य मानून दिल्लीस जायचा निर्णय घेतला.’ मला पर्रीकरांचे ते उद्गार ऐकून बाबू जगजीवनराम यांच्या उद्गारांची आठवण झाली. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर बाबुजी म्हणाले होते, ‘मी जन-सामान्यांतून आलो आहे, याचा विसर मी पडू दिलेला नाही. दीन-दलित, शोषित-पीडित अशा सर्व समाजाची सेवा करताना जे राजकारण करायचे ते देशहिताआड येऊ देणार नाही. कुठल्याही राजकारण करणार्या माणसाला राष्ट्रहित करून राजकारण करता आले पाहिजे. कारण राष्ट्रहित, राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय अखंडता हेच आपले अंतिम ध्येय असले पाहिजे.’ विद्यमान संरक्षणमंत्री मनोहरपंत व माजी संरक्षणमंत्री बाबुजी यांच्या विचारांमध्ये साम्य आढळले, म्हणून याचा उल्लेख केला. असो.
पर्रीकर यांनी शत्रूंची गय केली जाणार नाही, असे विधान केले आणि पहिला वळवळला तो ड्रॅगन- चीनच्या वर्चस्व आणि विस्तारवादी नीतीला रोखण्याची क्षमता भारत – जपानसारख्या देशातच आहे. व्हिएतनामला सहकार्य करून भारत अप्रत्यक्षपणे आपल्याला शह देत आहे, हे आता चीनला कळून चुकले आहे आणि म्हणून दगाबाज ड्रॅगनने पाकव्याप्त काश्मीरमध्येही आपले सैनिक पाठवून पाकिस्तानच्या लष्कराला शस्त्र प्रशिक्षण देण्यात पुढाकार घेतला आहे. दक्षिण चीनचा समुद्र म्हणजे जणू आपलीच दादागिरी मानून त्या परिसरातील फिलीपिन्स, मलेशिया, तैवान, व्हिएतनाम आदी देशांवर दादागिरी गाजवणार्या चीनची भूमिका वादग्रस्त ठरली असून महासत्तेनेही त्याकडे आपले लक्ष असल्याचे सूचित केले आहे. सागरी सीमावाद परस्पार चर्चेने सोडवावा अशी भूमिका भारताने घेतलेली आहे. त्यामुळे ड्रॅगनचे वळवळणे अधिक जोरात होऊ लागले आहे. अशा पार्श्वभूमीवर कुरापत काढणार्यांची नांगी ठेचली जाईल हा संरक्षणमंत्र्यांनी दिलेला इशारा चीनचे कंबरडे मोडून काढणारा आहे. चीनचे वर्चस्व सगळ्यांनाच खुपत असून असे देश प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या भारतास साथ देतील, याची भीती चीनला आहे व रास्तही आहे.
दुसर्या बाजूने भारतात शिरकाव करण्यासाठी ‘अल कायदा’ आणि ‘आयएसआयएस’ यांनी कसोशीने प्रयत्न चालविल्याचे भारताच्या गुप्तहेर यंत्रणेने हेरले आहे. या गोष्टींना अर्थातच पाकिस्तानचे पाठबळ आहे. दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा पाकिस्तानचा डाव असल्याचे भारताच्या गुप्तहेर यंत्रणेने हेरले असून त्याचा मुकाबला करण्याची तयारी सैन्याने ठेवली आहे. विद्यमान संरक्षणमंत्र्यांनी आपल्या मंत्रालयाचा ताबा घेताच तिन्ही दलप्रमुखांची बैठक घेऊन भारताने भविष्यात करावयाच्या रणनीतीचा आढावा घेतला. चाणाक्ष पर्रीकरांनी शत्रूंचे हे डाव लक्षात घेऊनच कुरापत काढणार्याची नांगी ठेचून काढली जाईल, हे दिलेले प्रत्युत्तर खूप काही सांगून जाते.
संरक्षण सामुग्री उत्पादनास देशातच चालना देऊन टप्प्याटप्प्याने त्यात वाढ केली जाईल, ही संरक्षणमंत्र्यांची भूमिका स्तुत्य अशीच आहे. याबाबत बोलताना पर्रीकर म्हणाले, ‘संरक्षण उत्पादनाच्याबाबतीत संकटांच्यावेळी विदेशावर अवलंबून राहणे घातक ठरू शकते. यासाठी देशांतर्गत संरक्षण उत्पादनात वाढ करण्याचे आपले धोरण राहील. सध्या सत्तर टक्के लष्करी सामुग्रीची परदेशातून आयात करावी लागते. आता आपल्या देशात हे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले असून हळूहळू मग मी आयात कमी करण्याकडे लक्ष केंद्रित करणार आहे.’
संरक्षणमंत्र्यांनी शत्रूंना योग्य तो इशारा देताना शस्त्रसामुग्रीबद्दल आपले म्हणणे मांडून आणि तेही आपल्या मातृभूमीत आमच्या गोव्यात – एक उत्साहवर्धक असे वातावरण तयार केले आहे. त्यांच्या या गोष्टींचे स्वागत करतानाच या गोमंतसुपुत्रास या कार्यास आपण शुभेच्छा देऊया.