साध्या विमानाने आगमन;
पुढील चार दिवस भरगच्च कार्यक्रम
केंद्रीय संरक्षणमंत्री बनल्यानंतर प्रथमच गोव्यात आलेले मनोहर पर्रीकर यांचे काल भाजप कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले. काल संध्याकाळी दाबोळी विमानतळावर आगमन झाले. तेथे दुपारपासून गर्दी केलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर भव्य मिरवणुकीने पर्रीकर राजधानी पणजीत दाखल झाले. पणजीत भाजप कार्यालय परिसरात त्यांना पाहण्यासाठी खचाखच गर्दी होती. तेथेही त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.विशेष म्हणजे संरक्षणमंत्री म्हणून हवाई दलाच्या खास विमानाने प्रवास करण्याचा विशेषाधिकार असलेले पर्रीकर साध्या विमानाने तेही इकोनॉमी वर्गाने प्रवास करून गोव्यात पोचले. पर्रीकरांचा गोवा दौरा थोडा खासगी – थोडा शासकीय अशा स्वरुपाचा असून पुढील चार दिवस त्यांचे राज्यात वास्तव्य असेल. गोव्यात ते गोवा शिपयार्ड, नौदल सुविधांना तसेच तटरक्षक दल अधिकार्यांची भेट घेतील व पाहणी करतील. दरम्यान, आज मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व भाजप नेत्यांसोबत मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी बैठकीत ते उपस्थित असतील.
दिल्लीत पदाचा ताबा घेतल्यानंतर सुरुवातीलाच, आपण मर्यादित सरकारी वेळेत काम करणारा नसल्याचे, त्यांनी बिंबवले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर सलग दोन दिवस सकाळी ८.३० वा. कार्यालयात पोचून ते अधिकार्यांच्या बैठका घेताना दिसत होते. रोज सुमारे १२ तासांचे त्यांचे कामकाज होते.