पर्रीकर दिल्लीत डेरेदाखल : लवकरच सूत्रे स्वीकारण्याची शक्यता
केंद्रीय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची संरक्षण मंत्री म्हणून वर्णी लावण्यासंदर्भातील बोलणी सध्या अंतिम टप्प्यात आहेत. याविषयी जवळ जवळ शिक्कामोर्तब झालेले असून पुढील दोन-तीन दिवसांत ते केंद्रीय संरक्षणमंत्री म्हणून सूत्रे हाती घेणार असल्याचे काल भाजपमधील सूत्रांनी सांगितले. पर्रीकर हे सध्या दिल्लीत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काल त्यांची वरील प्रश्नी बोलणी झाली. पर्रीकर यांनी दिल्लीत येऊन संरक्षण मंत्री म्हणून सूत्रे हाती घ्यावीत अशी मोदी यांची इच्छा असून त्या अनुषंगाने त्यांनी त्यांना तातडीने दिल्लीत बोलावून घेतले होते, असे सूत्रांनी सांगितले.सध्याचे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्याकडे संरक्षण खात्याबरोबरच अर्थ खातेही आहे. या पार्श्वभूमीवर पर्रीकर यांची वरील खात्याचे मंत्री म्हणून वर्णी लावण्यासाठी हालचाली सुरू आहेत. खरे म्हणजे लोकसभा निवडणुका झाल्यानंतरच मोदी यांनी पर्रीकर यांना संरक्षण अथवा अर्थमंत्री होण्यासाठीचा प्रस्ताव दिला होता. पण पर्रीकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीत जाण्यास रस न दाखवल्याने नंतर जेटली यांची संरक्षण मंत्री व अर्थमंत्री म्हणून वर्णी लावण्यात आली होती.
पुढील दोन-तीन दिवसांत मनोहर पर्रीकर हे केंद्रीय मंत्रिमंडळातील तिसर्या क्रमांकाचे मंत्री म्हणून पदभार स्वीकारणार असल्याचे समजते. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा क्रमांक लागणार आहे. त्यामुळे केंद्रातील एवढ्या मोठ्या वजनदार खात्याचे मंत्री बनणारे मनोहर पर्रीकर हे गोव्यातील पहिलेच नेते ठरणार आहेत.
यापूर्वी एदुआर्द फालेरो, रमाकांत खलप व सध्याचे केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे. मात्र, वरील तिघांपैकी कुणालाही असे तिसर्या क्रमांकाचे मंत्रीपद प्राप्त झालेले नाही.
मी अजून गोव्याचा मुख्यमंत्रीच : पर्रीकर
संरक्षणमंत्रीपदाबाबत पंतप्रधानांशी चर्चाच नाही
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्रीपदी वर्णी लावली जाण्याविषयी तर्कवितर्कांना उधाण आले असले तरी दस्तुरखुद्द पर्रीकर यांनी मात्र पत्रकारांशी बोलताना काल रात्री पंतप्रधानांशी आपली या विषयावर चर्चाच झाली नसल्याचे सांगितले. आपण अजूनही गोव्याचा मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पर्रीकर यांनी काल दिल्लीत प्रथम भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेेऊन त्यांच्याशी चर्चा केली व रात्री ८ वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची चर्चा झाली.
काल संध्याकाळी पर्रीकर यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातील त्यांच्या समावेशाविषयी विचारले असता आपण या विषयावर पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतरच प्रतिक्रिया देऊ असे सांगितले. आपण रात्री ८ वा. मोदींना भेटणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र पंतप्रधानांना भेटून आल्यानंतर पर्रीकर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाविषयी पंतप्रधानांबरोबर चर्चा झाली नसल्याचे सांगितले.