संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतीसेनेत भारतीय जवान

0
6

>> इस्रायलच्या हल्ल्यात श्रीलंकेचे दोन शांतीरक्षक जखमी

>> शांतीसैनिकांच्या मुख्य तळावर बॉम्बहल्ले

इस्रायल-लेबनॉन सीमेवरील युद्धजन्य परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्र संघाने चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतीसेनेत भारतीय जवानांना पाठवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. शनिवारी लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत भारतीय सैनिक सामील झाले. दरम्यान, इस्रायलने लेबनॉनमध्ये केलेल्या हल्ल्यात संयुक्त राष्ट्र संघाचे दोन शांतीरक्षक जखमी झाले आहेत.

न्यू यॉर्क येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या भारताच्या स्थायी मिशनने, संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतीसेनेत योगदान देणारा एक प्रमुख देश म्हणून भारत युनिफिलच्या 34 लष्करी देशांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनाच्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे. शांतता रक्षकांची सुरक्षा महत्वाची असल्याचे म्हटले आहे.

इस्रायलचा हल्ला
दक्षिण लेबनॉनमधील नाकोरा येथील वॉचटॉवरजवळ इस्रायलने केलेल्या हल्ल्यात श्रीलंकेचे दोन शांतीरक्षक जखमी झाल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली आहे. गेल्या 48 तासांत दुसऱ्यांदा या भागातील शांतीसैनिकांच्या मुख्य तळावर बॉम्बहल्ले करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाचे कर्मचारी आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेची हमी देण्यात यावी, असे या दलाने म्हटले आहे.

लेबनॉनमध्ये शांतीसेनेत 12 पेक्षा अधिक देशांचे तब्बल 10,000 हून अधिक शांतीरक्षक तैनात आहेत. यात भारतीय सैनिकांची संख्या दुसऱ्या क्रमांकाची आहे. तब्बल 900 भारतीय सैनिक या ठिकाणी तैनात आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याला लक्ष्य करणाऱ्या इस्रायलच्या कारवायांबाबत भारतही अस्वस्थ आहे. गेल्या वर्षभरापासून भारत हमास आणि हिजबुल्लाहविरोधात इस्रायलच्या कारवाईच्या विरोधात तटस्थ भूमिका घेत आहे. मात्र, पहिल्यांदाच भारताने इस्रायलविरोधात भूमिका घेतली आहे. दक्षिण लेबनॉनमधील लढाईत संयुक्त राष्ट्रांचे शांतीरक्षक अडकले असून येथील शांतीसेनेच्या जवानांच्या सुरक्षेवर भारताने चिंता व्यक्त केली आहे.

इराणची अमुबॉम्बची धमकी

इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर मिसाईल हल्ला केल्यानंतर इस्रायल इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करण्याची इस्रायलची योजना असल्याचे मानले जाते. कोणत्याही क्षणी इस्रायलची एअरफोर्स इराणच्या आण्विक स्थळांवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे मानले जाते. त्यामुळे इराणचे सुप्रीम लीडर आयतुल्लाह खेोमेनी यांनी इस्रायलला धमकी देत जर इराणवर हल्ला झाला तर याचे गंभीर परिणाम इस्रायलला भोगावे लागू शकतात असे म्हटले आहे.