अमिरात- इस्रायल करार

0
120
  • दत्ता भि. नाईक

या करारामुळे इस्राएलचे अस्तित्व नाकारणारे अरब व पॅलेस्टाईनचा हक्क नाकारणारे इस्राएल यांच्यात समन्वयाचे वातावरण उत्पन्न होईल व युद्धजन्य परिस्थितीवर नियंत्रण आणता येईल तसेच रक्तरंजित पश्‍चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित होईल अशी आशा आहे.

पर्शियन गल्फ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आखातातील सात स्वायत्त छोट्या-छोट्या देशांनी मिळून २ डिसेंबर १९७१ रोजी ‘संयुक्त अरब अमिराती’ची स्थापना केली. यात अबुधाबी, दुबई, शारजाह, उम्म अल् कैवैन, अजमान, फुजैराह व रास अल् खैमाह या अमिरातींचा अंतर्भाव आहे. अबुधाबी येथे या अमिरातीची राजधानी आहे. इंग्रजांच्या राजवटीच्या अखेरच्या काळात या प्रदेशाला ‘ट्रशल स्टेट्‌स’ म्हणजे समेट राज्ये या नावाने ओळखले जात असे. स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी मिळून एक संघराज्य बनवले होते, तरीही १९७१ साली संयुक्त अरब अमिरातीची स्थापना करून या देशाने आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःच्या अस्तित्वाची नोंद करून घेतली.
या देशातील जनता वंशाने अरब आहे हे ओघानेच आले. इस्लामची स्थापनाच अरब क्षेत्रात झाल्यामुळे येथील शहाण्णव टक्के जनता मुसलमान आहे. त्यातील ऐंशी टक्के शिया पंथाचे आहेत. अमिरातीत भरपूर तेलसाठा असला तरी इतर तेलसमृद्ध देशांसारखे अमिरातीने त्यावरच अवलंबून राहाणे सोडून दिले. अबुधाबी हे बंदर गल्फमधील सर्वात मोठे बंदर आहे. तेलाशिवाय जागतिक बाजारपेठेत मागणी असलेल्या कित्येक वस्तूंचा इथून व्यापार चालतो. मोठ्या प्रमाणात बांधकाम केल्याने जगातील व विशेष करून भारतातील अभियंत्यांपासून गवंडीकाम, सुतारकाम करणारे, नळजोडणी व वीजकाम करणारे अशी कौशल्यपूर्ण कामे करणार्‍यांना हा प्रदेश म्हणजे तुमच्या योग्यतेनुरूप काम करा व योग्य आर्थिक मोबदला घ्या असे आव्हान देणारे क्षेत्र आहे.

बंधू असूनही बंधुभाव नाही
अमिरातीच्या इतिहासाचे कथन करण्याचे कारण हे की, अलीकडे संयुक्त अरब अमिरात व आतापर्यंत अरबांचा परंपरागत शत्रू म्हणून ओळखल्या जाणार्‍या इस्राएल या दोन देशांमध्ये इस्रायलची उपराजधानी असलेल्या तेल अव्हिव येथे राजनैतिक संबंध स्थापन करण्याच्या करारावर शिक्कामोर्तब झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकारामुळे संयुक्त अरब अमिरातीचे युवराज महंमद बिन झायेद आणि इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांच्यात हा करार झालेला आहे. १९४८ साली इस्राएलची पुनर्स्थापना झाल्यापासून, पहिल्या दिवसापासून आक्रमणाला तोंड देत आलेला इस्राएल व त्यानंतर झालेली युद्धे यामुळे अरब व ज्यू अशा दोन वंशांमध्ये सतत कटुता आलेली दिसून येते.

तसे पाहता अरब व ज्यू हे मूळ सेमेटिक म्हणजे एकाच वंशाचे. अरेबिक व हिब्रू या दोन्ही भाषांच्या लिपी उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. काही पिढ्यांपर्यंत त्यांचे महापुरुष समान आहेत. इस्राएल ज्या डेव्हिडचे चिन्ह राष्ट्रध्वजावर मिरवते त्या डेव्हिडला अरबी भाषेत दाऊद म्हणतात. जेकब-याकुब, जोजेफ-युसुफ, मोझेस-मुसा अशी कित्येक उदाहरणे दिली जाऊ शकतात. एकमेकाचे बंधू असूनही आपापसात बंधुभाव नसलेले हे दोन समाज. रोमन कॅथोलिक चर्चची स्थापना झाल्यानंतर ज्यू समाज येशू ख्रिस्ताच्या मृत्यूला जबाबदार आहे असे ठरवून ‘शांतीचा संदेश’ देण्यासाठी ज्यूंची ससेहोलपट करण्यात आली. आजही ज्यूदेव हा शब्द शिवी म्हणून वापरला जातो. इस्लामची स्थापना झाल्यानंतर त्यांना मूळ भूमीवरून परागंदा व्हावे लागले. जगातील भारत सोडला तर सर्व देशांत ज्यूंचा छळ झाला. याची नोंदही जागतिक पातळीवरच्या इतिहासकारांनी घेतली आहे.

संवेदनशील प्रश्‍न
पॅलेस्टाईन ही अरबांची भटकी जमात. ती बरीच वर्षे जेकबच्या म्हणजे इस्राएलच्या भूमीवर स्थिरावली. दोन महायुद्धांच्या काळात या प्रदेशाला पॅलेस्टाईन म्हणूनच ओळखला जातो. येशू ख्रिस्ताचा जन्म पॅलेस्टाईन देशातील बेथलहेम येथे झाला असा शालेय इतिहासाच्या पुस्तकात उल्लेख असायचा. इस्राएलची पुनर्स्थापना या भूमीवर झाल्यामुळे पॅलेस्टाईन अरबांच्या आतापर्यंत वहिवाटीने चालत आलेल्या भूमीवर ज्यूंच्या वसाहती वाढू लागल्या. पॅलेस्टाईन अरबांसाठी भूमी आखली गेली, परंतु त्यांच्या सार्वभौमिकतेला मान्यता मिळाली नाही. जॉर्डन नदीच्या पश्‍चिम किनार्‍यावरच्या प्रदेशाला वॅस्ट बँक असे म्हणतात. याच वॅस्ट बँकवर इस्राएलने ज्यूंना पूर्ण संरक्षणाखाली बसवून पेलेस्टाईनला पूर्णपणे वेढले आहे. त्यामुळे हे वैर दिवसेंदिवस वाढत चालले.

इस्राएलमधील कट्टर राष्ट्रवाद्यांचा या कराराला मुळातच विरोध आहे. जॉर्डनमधील जनता आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये कोणताही फरक नाही. म्हणूनच त्यांनी जॉर्डनमध्ये स्थलांतरित व्हावे असे त्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर संपूर्ण अरब जगत कराराचे स्वागत करेल असे मानणे चुकीचे ठरेल. इस्राएलशी वैर मांडण्याचा कोणताही मार्ग पॅलेस्टिनी लोकांनी सोडला नाही. मुनिच येथील ऑलिंपिकसाठी गेलेल्या इस्राएलच्या खेळाडूंना जिवंत मारण्यापर्यंत यांची मजल गेली होती व या घटनेचा निषेध न करता अरब जगत शांत बसले होते. पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याचा मुद्दा केवळ राजकीय नाही. एका इस्लामिक राष्ट्राची व अरब वंशाची गळचेपी केली जाते असा भाव जागवणारा हा संवेदनशील विषय आहे.

बिडेनही कराराच्या बाजूने
इस्राएलने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात डोळ्यात भरण्यासारखी प्रगती केली आहे. ज्यू व अरब हे एकाच वंशाचे असले तरी ज्यू अरबांपेक्षा शतपटीने बुद्धिमान आहेत. युरोपमधील युद्धशास्त्र, शस्त्रास्त्र निर्मिती, निरनिराळ्या सुखसोयी उत्पन्न करणारी उपकरणे, इतकेच नव्हे तर इतिहास, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी विषयांतही ते मूळ युरोपीय समाजाच्या दोन पावले पुढे आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात इस्राएलशी भागीदारी केल्यास जागतिक स्पर्धेत टिकाव धरून राहण्याचे सामर्थ्य लाभेल असे संयुक्त अरब अमिरातीच्या राज्यकर्त्यांना वाटते. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण अरब जगत खडबडून नसले तरीही हळूहळू जागे होऊ लागले आहे. अमिरातीने राजकीय संबंध प्रस्थापित होण्यापूर्वीच इस्राएलकडून अंतर्गत सुरक्षेकरिता आवश्यक असलेले सहाय्य घेण्यास सुरुवात केली होती.

इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू सध्या अंतर्गत समस्यांनी ग्रस्त झालेले आहेत. दीर्घकाळ सत्तेवर राहिल्याचा परिणाम असेल, परंतु त्यांनाही दिलासा देणारा हा करार आहे. सतत युद्धजन्य वातावरणात देश स्वस्थ राहू शकत नाही, मानसिक समाधानासाठी सामाजिक शांतता हवी असते याची त्यांनाही जाण आहे.

ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी जागतिक पातळीवरील काही समस्या सोडवल्याचे मतदारांना दाखवून द्यायचे आहे. यादृष्टीनेही या कराराकडे पाहिले जात आहे. चीनशी व्यापारयुद्धाची घोषणा करतानाच अरब-ज्यूंच्या जुन्या जखमेवर मलमपट्टी करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाईल या भीतीने राष्ट्राध्यक्षपदाचे विरोधी डॅमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार बिडेन यांनाही या कराराचे स्वागत करावे लागेल.

दोन पर्याय ः तलवार की सुई
सौदी अरेबिया व अमेरिकेची अरब मित्रराष्ट्रे यांनी या कराराचे स्वागत केलेले आहे. इस्राएलचा सर्वात मोठा शत्रू म्हणून ओळखल्या जाणार्‍या इजिप्तने १९७९ साली कॅम्प डॅबिड येथे शांतता करार करून शत्रुत्वाला पूर्णविराम दिलेला आहे. १९९४ मध्ये जॉर्डननेही इस्राएलशी शांतता करारावर सही करून समेट घडवला. मोरोक्को व ओमानसारखे देशही याच वाटेवर आहेत.

शत्रुत्वाची बिजे अरब व ज्यू यांच्या संघर्षात आहेत. परंतु इराण व तुर्कस्तानने या कराराला विरोध दर्शवलेला आहे. पॅलेस्टाईन ऑथॉरिटीच्या नेत्यांनी या कराराचा अर्थ आमच्या पाठीत खंजीर खुपसणे असाच होतो, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. ती त्यांच्या हितसंबंधांचा विचार करता ठीक आहे. परंतु वंशाने अरब नसलेल्या इराण व तुर्कस्तानने या कराराला विरोध करावा याचे कारण केवळ अमेरिकाविरोध आहे. देशावर झालेल्या प्रत्येक आक्रमणाबद्दल अभिमान बाळगणार्‍या पाकिस्तानने आपण अरबांपेक्षा अरबनिष्ठ व पॅलेस्टिनींपेक्षा पॅलेस्टाईननिष्ठ असल्याचे सिद्ध करून या कराराला कडाडून विरोध केलेला आहे.

प्रश्‍न कोणताही असो, तो वाटाघाटींच्या मार्गे सोडवावा हाच युद्ध टाळण्याचा सोपानमार्ग आहे. या करारामुळे इस्राएलचे अस्तित्व नाकारणारे अरब व पॅलेस्टाईनचा हक्क नाकारणारे इस्राएल यांच्यात समन्वयाचे वातावरण उत्पन्न होईल व युद्धजन्य परिस्थितीवर नियंत्रण आणता येईल तसेच रक्तरंजित पश्‍चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित होईल अशी आशा बाळगणे रास्त आहे. तलवार आणि सुई या दोन्ही वस्तू एकाच प्रकारच्या लोखंडापासून बनवल्या जातात. तलवार तुकडे पाडते तर सुई दोन तुकड्यांना तोडते. कोणत्या उपकरणाचा वापर करावा हे जागतिक नेतृत्वाने ठरवायचे आहे.