>> राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार सदानंद तानावडे यांचा विश्वास
कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या जीवनात यश आणि अपयश येत असतेच, परंतु त्याच्यापाशी संयम आणि सहनशीलता असेल तर त्याला पुढील राजकीय जीवनात यश निश्चित मिळते असा विश्वास राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. सदानंद तानावडे यांनी व्यक्त केला. आपल्यासारखा ग्रामीण कार्यकर्ता आज खासदारपदापर्यंत पोहोचू शकलो तो केवळ पक्षनिष्ठा आणि बाळगलेल्या संयमामुळेच असे ते उद्गारले. दैनिक नवप्रभाला दिलेल्या अनौपचारिक मुलाखतीत ते काल बोलत होते. राज्यसभेचे खासदार म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी नवहिंद प्रकाशन समूहाला सदीच्छा भेट दिली.
पक्षातून बाहेर गेलेल्या नेत्यांविषयी बोलताना, त्यांची जर उमेदवारीच्या अपेक्षेविना पक्षात परतायची तयारी असेल तर त्यांचे पक्षात अवश्य स्वागत करू, मात्र, त्यांना जर निवडणुकीत स्वारस्य असेल तर मात्र पक्षाच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा करूनच त्याबाबत काही निर्णय होऊ शकतो, अशी स्पष्टोक्तीही तानावडे यांनी यावेळी केली. जे नेते पक्ष सोडून गेले, त्या सर्वांशी आपले वैयक्तिकरीत्या जिव्हाळ्याचे संबंध आहेत व ते आपल्या खासदारपदी झालेल्या निवडीनंतर भेटून आपले अभिनंदनही करून गेले असे तानावडे यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची आपली मुदत पुढील वर्षी जूनमध्ये संपते. त्याच्या आधी लोकसभेची निवडणूक होणार असल्याने तोपर्यंत आपल्याकडे प्रदेशाध्यक्षपद कायम राहील अशी माहितीही श्री. तानावडे यांनी दिली. पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना जेथे फेरबदल करायचे होते, ते यापूर्वीच केले गेले आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
राज्यसभेचा खासदार म्हणून तेथे आपण गोव्याचे प्रश्न हिरीरीने मांडू असे अभिवचनही श्री. तानावडे यांनी यावेळी दिले. म्हादईचा प्रश्न, दाबोळी विमानतळाचा प्रश्न अशा गोव्याच्या संदर्भातील विषयांवर जेव्हा आवाज उठवायची वेळ येईल तेव्हा राज्यसभेत तो निश्चित उठवू असे तानावडे यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या आपल्या साडेतीन वर्षांच्या काळामध्ये आपण पक्षाची संघटनात्मक बांधणी करू शकलो व पक्षाला पुन्हा विजयाप्रत नेऊ शकलो, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांशी या काळात जवळीक साधता आली. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची मार्गदर्शन मिळाले, असे सांगून ते पुढे म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आपल्या संघटनकौशल्याचा कस लागला. तिसऱ्यांदा पक्ष ही निवडणूक जिंकणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात साशंकता होती. पक्षनेतृत्वाकडूनही वारंवार विचारणा होत होती. अँटि इन्कम्बन्सीचाही विषय होता, परंतु भाजपच सत्तेवर येईल याची आपल्याला पूर्ण खात्री वाटत होती असे तानावडे म्हणाले. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत काम करताना योग्य समन्वय साधता आला असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
संघाचा सामान्य स्वयंसेवक ते राज्यसभा खासदार या आपल्या प्रवासाविषयी त्यांना बोलते केले असता, त्यांनी आपल्या या सामाजिक व राजकीय जीवनातील टप्पे सांगितले. आपल्या या साऱ्या प्रवासाकडे मागे वळून पाहत असताना आपण आजही भावूक होतो असे ते उद्गारले. पिर्णसारख्या गावामध्ये आपले बालपण गेले. पणजीत बोक द व्हाक परिसरात शिक्षणासाठी मावशीच्या घरी राहिलो. अभ्यासासाठी निवांतपणा मिळावा म्हणून आपण तेव्हा पणजीतल्या बागांमध्ये बसून अभ्यास करायचो. याच दरम्यान आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आलो. संघ कार्यालयात बसून नीट अभ्यास करता येईल ही भावनाही तेव्हा मनात होती, मात्र संघाच्या संपर्कात आल्याने आपली पुढील जडणघडण झाली असे श्री. तानावडे म्हणाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो. पुढे राजकीय जीवनात आपला प्रवेश ग्रामपंचायतीपासून झाला. आपल्या गावी पंचायत निवडणुकीत उभा राहिलो व जिंकलो व सरपंचही बनलो, मात्र तेव्हा आपले वय कमी होते, त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराने आपल्याविरुद्ध तक्रार केली व त्यामुळे काही महिन्यांनी आपली ती निवड रद्द केली गेली, मात्र त्यानंतर पुन्हा पुढच्या निवडणुकीत निवडून येऊन आपण सरपंच बनलो अशी आठवण तानावडे यांनी सांगितली. पुढील राजकीय प्रवासही त्यांनी विस्तृतपणे विशद केला.
भारतीय जनता पक्षाच्या कार्याकडे वळण्यास आपण ज्या कंपनीत काम करायचो तेथील कंत्राटदार श्री. दत्ता खोलकर कारणीभूत झाले. राजकीय जीवनाचे एकेक टप्पे पार करीत इथवर आलो. ज्या शाळेत शिकलो तिचाच आज मी अध्यक्ष आहे. ज्या कंपनीत काम केले त्या कंपनीवर ताबा असलेल्या आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषवता आले, अशा अनेक आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. विधानसभा निवडणुकीत थिवी मतदारसंघातून आपण एकदा आमदार झालो. नंतर पराभूत झालो, परंतु आपण पक्ष सोडला नाही. पक्षावर विश्वास ठेवून काम करीत राहिलो. भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्याने जर थोडा धीर धरला तर त्याचा पक्षनेतृत्वाकडून नक्कीच विचार होतो, आपल्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभा खासदारकी दिली गेली यातूनच हे दिसून येते असे श्री. तानावडे म्हणाले.