- कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)
पाकिस्तानने चीनकडे आठ एआयपी प्रणालीच्या पाणबुड्यांची मागणी केली असून, चीनने त्या देण्याची तयारी दर्शवली आहे. काश्मिरमधून ३७० व ३५ अ कलम हटवल्यानंतर पाकिस्तानी सेनाध्यक्ष जनरल कमर बाजवांनी युद्धाच्या शक्यतेबाबत संबंधात, जे तारे तोडले त्याच मूळ यात आहे असे म्हटलं तर ते वावगे होणार नाही.
कुठल्याही युद्धात नौदलाला आपल्या बंदरांची सागरी सुरक्षा, समुद्री वाहतुकीचे मार्ग मोकळे ठेवणे, मालवाहू जहाजांचे रक्षण करणे, शत्रूच्या समुद्री मार्गात अडथळा आणणे, स्वतःच्या समुद्री किनार्यावर शत्रूचे सागरी आक्रमण रोखणे आणि शत्रू प्रदेशात स्वतःच्या लष्कराला नदीकाठच्या कारवायांची मोकळीक देणे या जबाबदार्या देण्यात येतात. ही कामगिरी बजावणार्या नौदलाच्या सागरी सुरक्षेसाठी पाणबुड्यांची आवश्यकता असते. पाण्याखालून लढण्याची व त्यानुसार शत्रूला नकळत प्रच्छन्न युद्ध करण्याची क्षमता असलेल्या पाणबुड्या म्हणजेच सबमरिन्स या समुद्री लढाईसाठी अतिशय महत्वाच्या असतात. त्या खोल पाण्यात विद्ध्वंसक सामरिक हत्यार नेऊ शकतात आणि दीर्घ काळ पाण्याखाली तेथे राहू शकतात. त्यामुळे नौदलाचा सामरिक कणा असतात. पाणबुड्यांना ‘सी डिनायल वॉर मशीन’ म्हणतात, कारण समुद्रातील कोणत्याही विवक्षित भागामधे, एका विवक्षित कालावधीसाठी, शत्रूला येण्यास मज्जाव करणे आणि त्याच वेळी स्वतःसाठी तो भाग मोकळा ठेवणे हे काम त्या करतात. किंबहुना तीच त्यांची उपयुक्तता असते असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही.
पाणबुड्यांचा उपयोग समुद्राच्या, कोणत्याही भागावर, एका विशिष्ट कालावधीसाठी वर्चस्व स्थापन करण्यासाठीही केला जातो. त्याला ‘सी कंट्रोल’ असे म्हणतात. अशा समुद्री वर्चस्वामुळे स्वतःच्या लष्कराला, त्या भागात लष्करी हालचालींची मुभा मिळते. असे वर्चस्व स्थापन करणार्या कॅरियर ग्रुपच्या रक्षणासाठी पाणबुड्यांची नितांत आवश्यकता असते. कुठल्याही सामरिक संसाधनांप्रमाणेच यांची कमांड कंट्रोल सिस्टीम अतिशय सदृढ असणे आवश्यक असते. हत्यारे नेण्याची क्षमता आणि प्रेरक प्रणालीमुळे पाणबुड्यांचे वर्गीकरण मुख्यतः डिझेल पॉवर्ड अटॅक सबमरिन्स, न्यूक्लियर पॉवर्ड अटॅक सबमरिन्स, न्यूक्लियर पॉवर्ड गायडेड मिसाईल्स कॅरिंग सबमरिन्स आणि न्यूक्लियर पॉवर्ड बॅलेस्टिक मिसाईल कॅरिंग सबमरिन्स या चार वर्गांमधे केले जाते.
अ) पाण्या पृष्ठभागावर आल्यानंतर डिझेलवर, तर पाण्याच्या आत असताना बॅटर्यांवर चालणार्या डिझेल पॉवर्ड अटॅक सबमरीन्स ज्यांना बॅटरी रिचार्जिंगकरता शुद्ध हवा घेण्यासाठी (स्नॉर्कलिंग) पाण्याच्या पृष्ठभागावर, पाणबुडीच्या परिदर्शकीय स्तरावर यावे लागते. सतत पाण्यावर येण्याच्या आवश्यकतेमुळे अशी पाणबुडी, शत्रूच्या मेरीटाईम पेट्रोल एयरक्राफ्ट्स, हेलिकॉप्टर्स, सर्फेस प्लॅटफॉर्म्ससारख्या अँटी सबमरीन वॉरफेयर फोर्सेसला सहजरित्या बळी पडू शकते. कुठल्याही पाणडुबीपाशी विमानाविरुद्ध हत्यार नसते. अशा पाणबुडीची पाण्याखाली राहण्याची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी त्यांच्यात एयर इंडिपेन्डन्ट प्रॉपल्शन सिस्टीम बसवण्यात येते. त्यांची कमाल गती प्रतिघंटा १५ नॉट्सची असली तरी पाण्याखाली असताना, बॅटरी लाईफ वाचवण्यासाठी त्या ३-५ नॉट्सपेक्षा जास्त वेगाने जात नाहीत. बॅटरीवर चालत असल्यामुळे या फारच कमी आवाज करतात आणि म्हणूनच सोनार सिस्टीमद्वारे यांना शोधणे कठीण असते. या पाण्यात जास्तीतजास्त ३०० मीटर खोलीवर जाऊ शकतात. यांचे वजन १०००-३५०० टन असते. त्यांच्यावर अँटिसबमरिन टॉरपेडो आणि समुद्री सुरुंग, त्याच प्रमाणे ८०० किलोमीटर पल्ला असलेली मिडीयम रेंज अँटीशीप आणि लँड अटॅक क्रूझ मिसाईल्स बसवलेली असतात.
ब) न्यूक्लियर पॉवर्ड अटॅक सबमरिन्स, न्यूक्लियर पॉवर्ड गायडेड मिसाईल कॅरिंग सबमरिन्स आणि न्यूक्लियर पॉवर्ड बॅलेस्टिक मिसाईल कॅरिंग सबमरिन्समध्ये न्यूक्लियर पॉवर प्लॅन्टची प्रेरक प्रणाली असल्यामुळे पाण्याखाली रहाण्याची त्यांची क्षमता अमर्याद असते. पाण्याखाली राहण्यात मानवी थकव्याचीच मर्यादा असते. यांचा पाण्यावर आणि पाण्याखालील वेग ३० नॉट्सचा असतो. त्या पाण्यात ५०० मीटर खोल प्रवास करू शकतात. एसएसकेपेक्षा त्या खूपच वजनी असतात. त्यांचे टनेज,४०००-१८ टन एवढे असते. एसएसएन आणि एसएसजीएन पाणबुड्या लढाऊ जहाजांचा कॅरियर ग्रुप आणि मालवाहू जहाजांच्या रक्षणार्थ, अँटि सबमरिन वॉरफेयर प्लॅटफॉर्मचे काम करतात. एसएसबीएन सबमरिन्सवर बॅलेस्टिक मिसाईल्स असतात आणि त्यांचा वापर सामरिक फलाटासारखा केला जातो. त्यांच्या खोलवर कार्यरत असण्यामुळे त्या ‘सेकण्ड स्ट्राईक’साठी आणि तणावाचे वातावरण आणि शांतीकाळात समुद्री टेहळणीसाठी अतिशय उपयुक्त मानल्या जातात.
जून १९६४ मध्ये दक्षिण आशिया उपखंडात पाकिस्तानने पहिल्यांदा त्याच्या नौदलासाठी अमेरिकन पाणबुडी डीआल्बो विकत घेऊन तिचे नामकरण ‘पीएनएस गाझी’ केले.१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात पश्चिमी क्षेत्रात तैनात असलेले आयएनएस विक्रांत विमानवाहू जहाज आणि दिल्ली व म्हैसूर या क्रुझर्सचा विद्ध्वंस करण्यासाठी, पीएनएस गाझीला ५ सप्टेंबर १९६५ ला त्या क्षेत्रात पाठवण्यात आले. मात्र त्यावेळी आयएनएस विक्रांत आणि दिल्ली ‘रिपेयर अँड रिफिट’साठी मुंबईच्या माझगाव डॉक्समध्ये गेले होते आणि आयएनएस म्हैसूर दक्षिणेत कोचीन बंदरात उभे होते. संपूर्ण युद्धकाळात बहुतांश भारतीय नौदल बंदरांमध्येच होते. पीएनएस गाझीच्या भीतीमुळे ती जहाजे समुद्रात गेलीच नाहीत. त्यामुळे ०७/०८ सप्टेंबरला सहा फ्रिगेट्स आणि डिस्ट्रॉयर्ससह पीएनएस बाबरने गुजराथमधील द्वारका बंदराच्या सहा किलोमीटर्स दूरपर्यंत येऊन बंदरावर प्रचंड गोळीबार केला. केवळ एका पाकिस्तानी पाणबुडीच्या भीतीने भारतीय नौदल बंदरांच्या बाहेरही निघू शकले नाही.ही एका पाणबुडीची सामरिक ताकद होती. भारतीय नौदलाने पीएनएस गाझीला विशाखापट्टणम बंदराच्या जवळील कारवाईत त्यांच्या ८४ नाविकांसह १२ डिसेंबर १९७१ रोजी जलसमाधी दिली.
पीएनएस हँगोर या दुसर्या पाकिस्तानी पाणबुडीने भारतीय फ्रिगेट, आयएनएस कुकरीला काठियावाडपासून ३० मैलावर टॉरपेडो फायर करून ९ डिसेंबर १९७१ ला जलसमाधी दिली. हँगोरचा टॉरपेडो भारतीय जहाजाच्या ‘एक्सप्लोझीव्ह मॅगझीन’ वर जाऊन आदळल्यामुळे प्रचंड मोठा स्फोट होऊन आयएनएस कुकरी काही मिनिटांच्या आतच समुद्रतळाला गेली. कुकरीवर त्यावेळी १८ ऑफिसर आणि १७६ नाविक होते. कुकरीच्या कमांडिंग ऑफिसरांनी सर्वांना समुद्रात बुडून जीव वाचवण्याचा हुकूम दिला. भारतीय नौदलाने आपले जहाज त्यांना वाचवण्यासाठी पाठवले आणि १६ ऑफिसर्स व १७२ नाविकांना वाचवण्यात यश आले. नौदलाच्या उज्वल व ज्वलंत परंपरेनुसार आयएनएस कुकरीचा कमांडिंग ऑफिसर, कमांडर मुल्ला शेवटपर्यंत जहाजावरच थांबला आणि आयएनएस कुकरीसह समुद्राच्या तळाशी गेला. दुसर्या महायुद्धानंतर सध्या पाणबुडीद्वारे शत्रूचे जहाज ध्वस्त होण्याची ही पहिलीच वेळ होती. ब्ल्यू वॉटर नेव्हीसाठी पाणबुडीचे काय महत्त्व असते हे या दोन घटनांमधून स्पष्ट झाले. म्हणूनच १९८० पासून भारताने देशातच साध्या आणि आण्विक पाणबुड्या बनवण्याची मोहीम सुरु केली. १९८४-९४ दरम्यान मुंबईच्या माझगाव डॉक्समध्ये जर्मन २०९ (शिशुमार) क्लासच्या दोन पाणबुड्यांची निर्मिती करण्यात आली. त्याच प्रमाणे यांनी २०१०-१९ दरम्यान दोन स्कॉर्पियन (कलवरी) क्लासच्या पाणबुड्यांची सफल बांधणी केली. याच वर्गाच्या तिसर्या पाणबुडीचे निर्माण कार्य याच डॉकयार्डमध्ये जोमाने सुरु आहे.
१९८० मध्येच न्यूक्लियर सबमरीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी व्हेसलच्या निर्मितीचाही ओनामा करण्यात आला होता. राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर आर्मी, नेव्ही व एयरफोर्समध्ये सबमरीन लॉन्चड बॅलॅस्टिक मिसाईल्स हे सर्वांत जास्त प्रभावी हत्यार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, कोणत्याही आण्विक पाणबुडीला- ज्यांना नौदलात ‘बूमर’ म्हणतात- समुद्रात हुडकून काढणे (डिटेक्शन), त्यांचा मागोवा घेणे (ट्रॅकिंग) आणि त्यांचा विद्ध्वंस करणे (डिस्ट्रक्शन) अशक्य नसले तरी अतिशय कठीण असते. भारतीय नौदलात आयएनएस अरिहंत ही देशात निर्माण झालेली पहिली आण्विक पाणबुडी कार्यरत झाली असून, आयएनएस अरिन्दम ही दुसरी आण्विक पाणबुडी लवकरच कार्यरत होण्याची शक्यता आहे. आयएनएस चक्र ही सोव्हिएट नेरपा क्लासची तिसरी आण्विक पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात १९८८ पासूनच आहे. भारतीय नौदलाला आण्विक पाणबुडी बनवण्याची आणि वापरण्याची शाश्वती व सवय आहे.
पाकिस्तानकडे सध्या दोन ऑगस्टा क्लास, तीन ऑगस्टा ९० (खालिद) क्लासच्या एआयपी प्रणालीच्या पाणबुड्या आहेत. दोन पाणबुड्यांची निर्मिती, कराची शिपयार्ड अँड इंजिनियरिंग वर्क्समध्ये चालू आहे. या सर्वांमध्ये न्यूक्लियर वॉरहेड असणारी मिडीयम रेंज, लँड अटॅक क्रुझ मिसाईल्स तैनात करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त,पाकिस्तानने चीनकडे आठ एआयपी प्रणालीच्या पाणडुब्याची मागणी केली आहे. तसेच चीननेही त्या देण्याची तयारी दर्शवली आहे. यापैकी चार आण्विक पाणबुड्यांची निर्मिती कराचीच्या डॉकयार्डमध्ये केली जाईल. आजमितीला भारताच्या सेकण्ड न्यूक्लियर स्ट्राईक कॅपेबिलिटीला तोंड देण्यासाठी पाकिस्तानकडे एकही आण्विक पाणबुडी नसली तरी पाकिस्तानने आपले नौसैनिक आण्विक पाणबुडीसंबंधी प्रशिक्षणासाठी चीन व रशियात पाठवले आहेत. यापुढील भारत-पाक युद्धात नौदलाची भूमिका सर्वार्ंत महत्वाची असणार आहे. सध्या यात भारताचा वरचष्मा असला तरी नजीकच्या भविष्यात पाकिस्तान भारताच्या बरोबरीत येईल आणि चीनच्या मदतीने भारताच्या पुढेही निघून जाईल.
काश्मीरमधून ३७० व ३५ अ कलम हटवल्यानंतर पाकिस्तानी सेनाध्यक्ष जनरल कमर बाजवांनी युद्धाच्या संभावनेच्या संबंधात, जे तारे तोडले त्याचे मूळ यात आहे असे म्हटले तर ते वावगे होणार नाही.