फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांचे प्रतिपादन
संतांनी अस्मितेचे, बोली भाषांचे रक्षण करून आत्मभान दिले आहे. स्वधर्म, स्वभाषा व संस्कृतीशी आपण एकनिष्ठ राहिलो त्याचे श्रेय संतांना जाते. संत जगण्यासाठी फार मोठे बळ देत असतात. म्हणूनच संत हे समाजाचे दीपस्तंभ आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक, विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी काल येथे केले.
राजभाषा संचालनालय व संत सोहिरोबानाथ आंबिये त्रिशताब्दी वर्ष समारोह समिती यांच्या विद्यमाने अकादमीत झालेल्या सोहिरोबानाथ आंबिये संत साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात फादर दिब्रिटो सन्माननीय पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सभापती राजेंद्र आर्लेकर, राजभाषा खात्याचे सचिव मॅथ्यू सॅम्युअल, खात्याचे संचालक डॉ. प्रकाश वजरीकर उपस्थित होते.…म्हणूनच जीवनाचा मार्ग सुकर
महाराष्ट्रात, संतांनी टाळकुटेपणा केला, प्राक्तनवाद वाढवला व प्रयत्नवादाला खिळ घातली, असे बोल लावले जातात. परंतु या संतांची मांदियाळी निर्माण झाली म्हणूनच जीवनाचा मार्ग सुकर झाला. त्यांच्या सात्विकतेची समाजाला आज गरज आहे. विज्ञानाच्या बळावर जगाने विजय मिळविला असेल; परंतु मानवी जीवनातील अगतिकता कमी झालेली नाही. प्रगतीबरोबरच अधोगतीपण सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. बुध्दी आणि भावना यांचा संघर्ष चालूच असतो. मनुष्य विरोधा भासाने भरलेला आहे. मात्र सगळे आवाज बंद झाले तरी विवेकाची ज्योत अखंडपणे तेवत असते. विज्ञान आणि अध्यात्म हे दोन पंख असल्याशिवाय माणूस तरू शकणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, विज्ञान अध्यात्माशिवाय आंधळे असते व अध्यात्म विज्ञानाशिवाय पांगळे असते. जगायचे कशासाठी हेच आपण विसरून गेलो आहोत. माणूस आपली ओळख विसरल्याने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
धर्माच्या नावाखाली विभक्त करू नये
धर्माच्या नावाखाली आम्हाला कोणीही विभक्त करता कामा नये. धर्माधर्मात सुसंवादाची गरज निर्माण झाली आहे. याकडे निर्देश करून फादर ब्रिटो यांनी सांगितले की, आर्थिक महासत्ता होण्याआधी भारत ही अध्यात्मिक महासत्ता आहे ती हरवता कामा नये. शोषित, दुर्लक्षित, वंचितांना एकाच पातळीवर आणण्याची गरज आहे. अध्यात्म ही भारताची ओळख आहे. ख्रिश्चनांना भारतीय परंपरेतून धडे घ्यावे लागतील हे पोपनी सांगितले आहे. पोपनी वादग्रस्त विधान केल्याबद्दल त्यांनी क्षमायाचना केली. मात्र सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी या मुद्यावर ठामपणे सांगितले की, इथे जो धर्मच्छल झाला त्याबद्दल पोपनी गोव्यात आल्यावर माफी मागायला हवी होती. विरोधाभास ही पाश्चिमात्यांची देणगी आहे.
संतांच्या वाङ्मयाचा कीस काढत बसण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात आणतो का, जे साध्य करायचे असते त्याकडे दुर्लक्ष करतो आहोत याचा शांतपणे विचार करायची गरज आहे याची जाणीव देवून आर्लेकर म्हणाले, आध्यात्मिकता हे आपले बलस्थान आहे. आपली परंपरा सनातन आहे. तसेच नीतनूतनपण आहे. संतांचे अस्तित्वच मुळी जगाच्या कल्याणासाठी असते. संतांनी विज्ञान व अध्यात्माची सांगड घातली आहे.