संत साहित्य संमेलनात विविध परिसंवाद रंगले

0
145
संत सोहिरोबानाथ आंबिये संत साहित्य संमेलनात आपले विचार मांडताना साहित्यिक विष्णू वाघ. सोबत परेश प्रभू, सचिन परब व फादर आताईद.

विचार दर्शन, जागृती आणि प्रबोधन हा संतांच्या भाषेचा मूळ गाभा आहे. त्यांचे भाषेचे आकलन स्वतःच्या प्रदेशापलीकडे होते. अध्यात्माचा विचार सामान्यांपर्यंत कसा पोहोचवायचा याचा विचार त्यांनी केल्यामुळे संत साहित्याची भाषा ही लोकभाषा आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक विष्णू वाघ यांनी येथे केले.
राजभाषा संचालनालय, गोवा शासन आणि संत सोहिरोबानाथ आंबिये त्रिशताब्दी वर्ष समारोह समिती यांच्या विद्यमाने मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात आयोजित केलेल्या संत सोहिरोबानाथ आंबिया संत साहित्य संमेलनात ‘संत साहित्याची भाषा’ या विषयावरील परिसवंदात श्री. वाघ हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. फादर मोईदीन आताईद, दै. गोवादूतचे संपादक सचिन परब, दै. नवप्रभाचे संपादक परेश प्रभू यांनी परिसंवादात विचार मांडले. श्री. वाघ म्हणाले की, वेदांतून आलेले तत्वज्ञान संतांनी वेगळ्या पद्धतीने मांडले. संतांनी ज्या ऊर्मीने शिव्या-शाप देणारी भाषा वापरली, ती आम्हांला पचली नाही. आजची आपली लिहिण्याची भाषा ही त्यांची जगण्याची भाषा होती.
फादर आताईद यांनी, साहित्याच्या विकासात संत साहित्याचे योगदान फार मोठे आहे. फादर थॉमस स्टीफन यांनी ख्रिस्त पुराण मराठीत लिहून ख्रिस्त पुराणाला मराठीत स्थान मिळवून दिले. मिशनर्‍यांचेही भाषेच्या व धर्माच्या प्रसारात योगदान मोठे असल्याचे सांगितले.
श्री. परब म्हणाले की, सोहिरोबानाथांनी विधवा बहिणीला त्या काळी शिकवून पुरोगामीत्व सिद्ध केले. ते काव्य कोळून प्यायले होते. नाथसंप्रदायाची परंपरा त्यांनी ताकदीने पुढे नेली. त्यांची भाषा वेगळ्या अंगाने फुलली. नामदेवांनी सहा भाषांतून लिखाण केले. मध्यस्थांच्या आणि दलालांच्या विरोधात केलेले बंड म्हणजे संत साहित्य आहे.
परेश प्रभू यांनी, सोहिरोबानाथांचे एकदंर वाङ्‌मय पाहिले तर आत्मजागृतीचा उद्देश जाणवतो, असे स्पष्ट करून त्यांनी सांगितले की, त्यांच्या वाङ्‌मयातून आत्मज्ञानाचा दिवा प्रज्वलित व्हावा हा ध्यास होता. त्यांच्या वाङ्‌मयात ग्रामबोली उत्स्फूर्ततेतून आली आहे. त्यात लोभस शब्दकळा आहे. ज्ञानेश्‍वरांच्या जातकुळीतील शब्दही त्यांच्या वाङ्‌मयात आढळतात. सोहिरोबानाथांच्या पाचही ग्रंथात अमृताचे साठे असल्याचे श्री. प्रभू यांनी स्पष्ट केले.
संतसाहित्य व वैश्‍विक एकात्मता
माणसाला माणूस म्हणून घडविण्यासाठी संतांनी प्रयत्न केले. भारताच्या अध्यात्मिक परंपरेमुळेच देश अनेक संकटांतून तरला आहे, असा सूर ‘संत साहित्य व वैश्‍विक एकात्मता’ या विषयावरील परिसंवादात व्यक्त झाला. या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ. केशव सद्रे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. यात प्रा. अल्ताफ खान, सावियो हर्मन डिसोझा प डॉ. आर. एन. मिश्रा हे वक्ते सहभागी झाले होते.
प्रा. खान यांनी, सुफी संतांविषयी विवेचन केले. ते म्हणाले की, सुफींचा इस्लाम धमाईशी संबंध आहे. कुराणातील भाष्याशी सुफीचा संबंध येतो. मुस्लीम रहस्यवाद असेही त्याला म्हटले जाते. भारतात आल्यानंतर कितीतरी सुफींनी काव्यरचना केली. त्यात हिंदूविषयक रचनाही आहेत, असे सांगितले.
डिसोझा यांनी विसाव्या शतकात झालेल्या दोन महायुद्धांनी आम्ही काही धडा घेतला का असा सवाल करत नाव, प्रसिद्धी, कीर्ती, पैसा यामागे लागणारा माणूस शांती आणू शकत नाही. संत आकाशातून खाली पडले नाहीत, तर ते आपल्या कर्तृत्वाने संतपदी पोहोचल्याचे सांगितले. डॉ. मिश्रा यांनी, आमच्या विचाराला, आत्म्याला शुद्ध करावे म्हणून संतांनी शिकवण दिली. त्यांनी माणसातले माणूसपण जागवले. आपले काम प्रामाणिकपणे करणे हीच ईश्‍वराप्रती पूजा आहे. हा बोध संतांनी दिला. अंधाराकडून प्रकाशाकडे संत साहित्य नेते अहंकार, लोभ, क्रोध, मोह. ईर्षा या शरिरातील आतील कुरूप गोष्टी साफ करा म्हणजे बाह्य शरीर उजळेल हा विचार संतांनी दिल्याचे सांगितले. नाथपंथ विदेशातही गेला याकडे निर्देश करत डॉ. सद्रे यांनी, आपल्याला नाथपंथांचा विसर पडलेला आहे. जागतिकीकरणामुळे जग जवळ आले पण माणसे दुरावली आहेत. इतरांसाठी काही करू ही संतांची वृत्ती आपण जागवली तरच संतांच्या वाङ्‌मयातील वैश्‍विक एकात्मता आपल्याला कळेल असे विचार मांडले.
संत परंपरा आणि सामाजिक बांधिलकी
समाजाला दिशा दाखवण्याचे काम सगळ्या संतांनी आयुष्यभर केले. ते जीवनाचे अपरिहार्य कार्य त्यांनी मानले. माणसातील संतत्व जागे करण्याचे कार्य संतपरंपरेने केले आहे. संत परंपरा आणि सामाजिक बांधिलकी वेगळी करता येत नाही, असे प्रतिपादन ज्ञानेश्‍वरीचे व्यासंगी विद्वान प्राचार्य गोपाळराव मयेकर यांनी केले. ‘संत परंपरा आणि सामाजिक बांधिलकी’ या विषयावर झालेल्या परिसंवादात मयेकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या परिसंवादात शेख हानिफ, सोहिरोबानाथांचे वंशज ऍड. रामनाथ आंबिये व चंद्रशेखर गावस यांनी आपले विचार मांडले.
प्राचार्य मयेकर पुढे म्हणाले की, तेराव्या शतकात संतांनी हरिभक्तीचा नामस्मरणाचा मार्ग दिला. तोच मार्ग सोहिरोबानाथांना १७ व्या शताकत सामान्यांना दिला. ज्ञानेश्‍वरीच्या शिकवणीप्रमाणे प्रत्येकात संताचे बीज असते व संधी मिळाली की ते रूप प्रकट होते.
शेख हानिफ यांनी, संतांनी आपल्या पद्धतीने मानवतेसाठी योगदान दिले आहे सुफीनी भक्ती चळवळीचे महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. मुस्लीम-हिंदू ऐक्यासाठी सुफी संतांनी महत्त्वाचे कार्य बजावल्याचे सांगितले. ऍड. आंबिये यांनी, ३४ व्या वर्षी सोहिरोबानाथांनी ‘सिद्धांत संहिता’ ग्रंथ लिहिला. मनुष्य जीवनाचे कार्य ईश्‍वरी भजन व मोक्ष मिळविणे हे आहे, हे त्यांनी सांगितले. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची महती सांगितली. वेगळ्या प्रकारच्या योगसाधना त्यांनी सांगितल्या आहे, असे आपले विचार मांडले.
यावेळी चंद्रशेखर गावस यांनीही आपले विचार मांडले. भाषा संचालनालयाच्या साहाय्यक संचालक उर्मिला गावडे यांनी पुष्पगुच्छ दिले.