– डॉ. सागर देशपांडे, पुणे
एकाच वेळी अनेक आघाड्यांवर यशस्वीपणे कार्यरत असणारी माणसे पाहिली की त्यांच्याविषयीचे कुतूहल कुणाच्याही मनात सहजपणे जागे होते. संत साहित्याचा, संत विचारांचा आणि संत कार्याचा प्रसार हेच आयुष्यभराचे व्रत म्हणून कार्य करणारे प्रा. डॉ. अशोक कामत हे त्यापैकीच एक. त्यांचा विद्यार्थीप्रिय विद्याव्यासंग, बहुश्रृतता, जनसंपर्क, समाजाच्या सर्व थरांत सहजपणे मिसळण्याची प्रवृत्ती, सार्वजनिक कार्यात नेहमी यथाशक्ती सहभागी होण्याचा स्वभाव, निसर्गाविषयीची आपुलकी आणि कुटुंबवत्सल जिव्हाळा अनुभवला की कुणीही अपरिचितसुद्धा त्यांच्या संतभक्तीच्या मेळ्यात सहजपणे सामील होतो.मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये पीएच्.डी., मान्यवर संस्था आणि विद्यापीठांचे सुमारे ६० पेक्षा अधिक पुरस्कार आणि मराठी व हिंदीतील सुमारे ७० ग्रंथांचे लेखन, पीएच्.डी. आणि अन्य पदव्युत्तर संशोधन करणार्या ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, राष्ट्रभाषा सभा आणि अन्य विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी, सुमारे पंधरा हजार पुस्तकांचा स्वतःचा संग्रह आणि आपल्या पुण्यातील निवासाच्या आवारातील मिळेल त्या जागेचा वापर करून शेकडो वृक्षवेलींची निगा राखणारे डॉ. कामत यांच्यासारखे विद्वान-संशोधक ज्या आपुलकीने कुणाही अभ्यागताचे आपल्या घरी स्वागत करतात, ते पाहिले की मुळात आपण पुण्यातच आहोत का, याची खात्री करून घ्यावीशी वाटते. ३७ वर्षे प्राध्यापकी करूनही ते इतके विनम्र कसे, याचेही आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही.
१० जानेवारी १९४२ रोजी कारवारनजीकच्या अवरसे येथे डॉ. कामत यांचा जन्म झाला. बालपणीचा काळ सुखाचा असे गाण्यातले सूर ऐकण्याइतकेही किमान सुखाचे बालपण त्यांच्या वाट्याला आले नाही. तरीही प्रतिकूल परिस्थितीत वेगवेगळ्या गावी, लोकाश्रयाने राहून, पडेल ते कष्ट घेऊन त्यांनी आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पुण्यातील शाहू महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय येथे वीस वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानतंर त्यांनी १९८५ पासून पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली आणि या पदाची जबाबदारी अत्यंत निष्ठेने, समरसतेने सांभाळली. या अध्यासनाला एक वेगळीच प्रतिष्ठा लाभली.
महाविद्यालयात आणि विद्यापीठात शिकवणारा प्राध्यापक म्हणून ‘क्लॉक अवर’ पद्धतीने काम करण्याच्या पठडीमध्ये डॉ. कामत कधीच बसले नाहीत. आपल्या विद्यार्थी-मित्रांसह गावोगावी जाऊन अगदी सामान्य लोकांमध्येही मिसळणे, त्यांचे प्रश्न-समस्या जाणून घेणे, कोणत्याही राजकीय पक्षाची आणि एकाच विचाराची बांधिलकी न मानता सामाजिक जाणीव ठेवून त्या समस्या सोडविण्यासाठी यथाशक्ती कार्यरत राहणे, त्याकरिता भाषणे, लेखन, संशोधन यामध्ये समर्थपणे-विधायक दृष्टीने गुंतणे, संतसाहित्याचा आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास केवळ उदरनिर्वाह, पदव्या आणि प्रतिष्ठेसाठी न करता आजच्या सामाजिक समस्यांचे भान ठेवून या सार्याचा विधायक कार्यासाठी उपयोग करून घेणे, यातील डॉ. कामत यांची हातोटी आणि त्यांचे योगदान विलक्षण आणि अनुकरणीय असेच आहे.
संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास यांच्यासह वीरशैव, शीख संप्रदायातील संत आणि परंपरांचा अभ्यास करताना, संशोधन करताना, व्याख्याने देताना वारकर्यांचा श्रद्धाभाव त्यांनी जपला. पण आपल्या जीवनाचरणात विनाकारण टाळकुटेपणा कधी येऊ दिला नाही. पंजाबमधील आतंकवादाची समस्या ऐन भरामध्ये असताना या प्राध्यापक-संशोधकाने उत्तर आणि वायव्य भारतामध्ये पदयात्रा करून संत नामदेवांच्या पाऊलखुणा शोधल्या आणि त्या माध्यमातून हिंदू आणि शीख यांच्यातील दुभंगलेले ऐक्य साधण्यासाठी अथकपणे, सक्रिय, मूलभूत स्वरुपाचे लेखन आणि अनुषंगिक कार्य केले. संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमान आणि परिसरात अनेक वर्षे भ्रमंती करून त्यांनी आपल्या संशोधनाला राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्याचीही जोड दिली. अनेकविध साधने अभ्यासली. आजही त्यांचे अशा स्वरुपाचे काम प्रामुख्याने गुरूकुल प्रतिष्ठान आणि वेगवेगळ्या माध्यमांतून सुरूच आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, पंजाब, दिल्लीसह देशाच्या कानाकोपर्यात संत साहित्यावरील व्याख्यानांसह अनेकविध सांस्कृतिक आणि संशोधन कार्यासाठी डॉ. कामत यांची अव्याहतपणे भ्रमंती, लेखन, वाचन, संशोधन आज वयाची सत्तरी ओलांडल्यावरही सुरू असते. संतांचे निसर्गविषयक अभंग या प्राध्यापकाने सभान जगून दाखवलेत. पुण्याच्या सहकारनगर परिसरातील ‘शिवश्री’ या आपल्या निवासाभोवती डॉ. कामत यांनी जी विविध प्रकारची वनराई फुलवली आहे, ती अचंबित करणारी आहे. केवळ स्वतःच्याच घराच्या परिसरात नव्हे, तर आपले मित्र आणि आप्तेष्टांच्या घरादाराच्या परिसरातही हौसेने हा वृक्षमित्र प्राध्यापक पावसाळ्यापूर्वी स्वखर्चाने आपल्या बागेतील रोपे नेऊन वृक्षारोपण करतो आणि पुढे केव्हा तरी त्या झाडांच्या तब्येतीचीही विचारपूस करतो.
डॉ. कामत यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांना मिळालेले मान-सन्मान आणि पुरस्कार हा खरे तर स्वतंत्र पुस्तकाचाच विषय असल्याचे त्यांच्या विद्यार्थ्यानी त्यांच्या एकसष्ठीच्यावेळी सिद्ध केले आहे. या सर्व कार्यामध्ये त्यांची पत्नी सौ. जाई कामत आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना दिलेली सक्रिय साथ ही फारच महत्त्वाची म्हणावी लागेल. एकसष्ठीनंतर स्वतःच्या आवडीच्या कामात गुंतून राहण्यासाठी विद्यार्थ्याच्या पुढाकाराने डॉ. कामत यांनी गुरूकुल प्रतिष्ठानची स्थापना करून आपले व्रतकार्य पुढे चालू ठेवले आहे. विशेषतः आज गुरुकुल प्रतिष्ठान, राष्ट्रभाषा सभा, एस. एम. जोशी हायस्कूल आदि संस्थांच्या कामात त्यांनी स्वतःला गुंतून घेतलेले आहे. तुकारामगाथा, ज्ञानेश्वरी, निवडक सार्थ नामदेव यांसारखे ग्रंथ अत्यंत अल्प किंमतीत वाचकांना उपलब्ध करून देण्याचे काम या प्रतिष्ठानमार्फत सुरू आहे. त्यासाठी डॉ. कामत घेत असलेले अविरत परिश्रम पाहिले की, अचंबितच व्हायला होते. एखाद्या कामात झोकून देऊन ते काम उभारणीसाठी सुरू असलेली त्यांची धडपडही आजच्या तरुण अभ्यासकांना खूपच अनुकरणीय अशी आहे. संतसाहित्याशी संबंधित डॉ. कामत यांचे हे अफाट कार्य या क्षेत्रातील अभ्यासकांना एखाद्या दीपस्तंभाप्रमाणेच दिसेल.
संत नामदेवांचे जीवनकार्य, त्यांचे मराठी आणि हिंदी काव्य आणि त्यांच्या निवडक अभंगांचे संपादन असे तीन खंडांमधील ग्रंथ अलीकडेच त्यांनी सिद्ध केले आहेत. त्यापैकी एका ग्रंथाचे प्रकाशन खुद्द संत नामदेवांचे १६ वे वंशज ह.भ.प. कृष्णदासबुवा यांच्या हस्ते नुकतेच पुण्यात झाले. त्यावेळी डॉ. कामत यांनी गेली ५० वर्षे दिलेल्या योगदानाचा कृष्णदासबुवांनी आवर्जून गौरव केला. डॉ. कामत यांच्या आगामी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!