- ऍड. रमाकांत खलप
अशा या संताची १५० वी जयंती २ ऑक्टोबर २०२० रोजी जगभर साजरी केली जाईल. सत्याग्रह आणि अहिंसेचे पाईक म्हणूनच त्यांचा जन्मदिवस साजरा केला जावा असा संयुक्तराष्ट्र संघाचा एकमुखी निर्णय झालाय. हजारो नोबेल शांती पुरस्कारांहून हा सन्मान मोठा आहे. बापू आपल्या स्मृतीस प्रणाम!
गुजरातच्या वैष्णवपंथियांत यांचा जन्म झाला. विष्णू अर्थात श्रीकृष्ण याच्या नावावरून त्यांना मोहनदास हे नाव देण्यात आलं असावं. ‘वैष्णव जन तो तेणो कहियो| परपीडा जाने जो’ हे त्यांचं आवडतं भजन. दुसर्याची पीडा जाणून घेणं, ती दूर करण्याचा प्रयत्न करणं ही त्यांची जीवननिष्ठा ठरली. आयुष्यभर या निष्ठेलाच त्यांनी आपलं जीवन वाहिलं. मोहनदास हे आपलं नाव सार्थक केलं. या बिरुदावलीने लोक त्यांना संबोधू लागले. लहानमोठ्यांचे ते आदरणीय बापू झाले. बॅ. मोहनदास करमचंद गांधी. मि. एम. के. गांधी. भि. गांधी, महात्मा गांधी ते बापू ही त्यांची वाटचाल जगाला मोहिनी पाडणारी ठरली. लाखो लोक त्यांचे भक्त झाले. अर्थात एखादा अपवाद असतोच. नाथुराम या नावाचा एक माथेफिरू निघाला. त्याने या संताची इहलोकीची यात्रा संपवली. नाथुरामची गोळी छाताडात मिरवणारे बापू आणि क्रुसावर लटकणारा ख्रिस्त असं एक अद्वितीय साम्य जगासमोर उभ ठाकलं. बापू संतपदी आरुढ झाले. या अढळपदापासून त्यांना आता कोणी हलवू शकणार नाही. दीनदुबळ्यांचे, दुरितांचे, गुलामांचे, काळ्यांचे आणि एकंदर शोपितांचे मसिहा म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय.
काही हजार वर्षांनंतर येशूनंतरचा मसिहा म्हणून बापूला जग ओळखू लागेल. अशा या संताची १५० वी जयंती २ ऑक्टोबर २०२० रोजी जगभर साजरी केली जाईल. सत्याग्रह आणि अहिंसेचे पाईक म्हणूनच त्यांचा जन्मदिवस साजरा केला जावा असा संयुक्तराष्ट्र संघाचा एकमुखी निर्णय झालाय. हजारो नोबेल शांती पुरस्कारांहून हा सन्मान मोठा आहे. बापू आपल्या स्मृतीस प्रणाम!
नाताळ ते प्रिटोरिया हा रेल्वे प्रवास त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. मुळातच बापूंचा स्वभाव हा लाजराबुजरा; साधारण एकलकोंडा पण हट्टी आणि निग्रही. बॅरिस्टर पदवीप्राप्त बापू आपल्या या स्वभावामुळे कोर्टात चमक दाखवू शकले नाहीत. भारतातून ते दक्षिण आफ्रिकेत गेले. तिथल्या कोर्टात पगडी-टोपी घालण्यास जज्जने मज्जाव केल्यामुळे ते केस सोडून कोर्टाबाहेर पडले. इथेच दक्षिण आफ्रिकेत त्यांच्यातला हट्टी स्वभाव उफाळून आला. रेल्वे प्रवासात गोर्यांच्या रोषाला ते सामोरे गेले. रेल्वेच्या डब्यातून त्यांना हुसकावण्यात आले. त्यांचे सामानसुमान फेकून देण्यात आले. हा सारासार अन्याय होता. फक्त आपला वंश आशियाई आहे, वर्ण काळा आहे यास्तव दक्षिण आफ्रिकेतली गोरी राजवट काळ्यांवर अमानुष अत्याचार करीत होती. या प्रसंगातून बापूंना आत्मसाक्षात्कार झाला. फक्त वंश आणि कांतीचा रंग सोडल्यास माणसामाणसांमध्ये कसलाच भेद असू शकत नाही. रंगामुळे, भाषेमुळे, शिक्षणामुळे किंबहुना जन्मसिद्ध गुणधर्मामुळे माणसाने माणसावर अन्याय करणे चुकीचे आहे हे सत्य बापूंना उमगले. या अन्यायाविरुद्ध बापूंनी बंड पुकारले. प्रथम वैयक्तिक पातळीवर पुकारलेले हे बंड सार्वत्रिक झाले. एक अभुतपूर्व असा संघर्ष बापूंनी छेडला. अन्यायाविरुद्ध ते लढले; अन्यायकर्त्याविरुध्द नव्हे!
त्यांच्यासाठी सत्य हाच परमेश्वर होता. ‘शुद्ध केवळ सत्य म्हणजेच माझा परमेश्वर. केवळ वाचिक सत्य म्हणजे सत्य नव्हे; तर वैचारिक सत्य, किंबहुना विश्वाची धारणा करणारे सत्य म्हणजेच परमेश्वर’ अशा शब्दांत गांधीनी सत्याची आणि परमेश्वराची व्याख्या ‘माझ्या सत्यविषयक प्रयोगांची कथा’ या आपल्या आत्मकथेच्या प्रस्तावनेत लिहून ठेवलेली आहे.
सत्य आणि त्यासाठी आग्रह म्हणजेच सत्याग्रह या तत्त्वाचा त्यांच्या जीवनातील आत्मसाक्षात्कार होता. हा साक्षात्कार त्यांना दक्षिण आफ्रिकेत झाला. लिओ हॉलस्टॉय, थोरो आणि रस्कीन यांच्या ग्रंथांनी त्यांच्या मनोनिग्रहाची जोपासना आणि वाढ केली. भगवद्गीतेने त्यांना त्यांच्या आयुष्याचे ध्येय निश्चित करण्यासाठी अधिष्ठान दिले. ख्रिस्ती, मुसलमान, बौद्ध इत्यादी धर्मियांच्या धर्मग्रंथांच्या अभ्यासाने त्यांना वैचारिक बळ मिळाले. सविनय कायदे भंगाची कल्पना त्यांना ‘थोरो’ या अमेरिकन तत्त्वज्ञाच्या विचारधारेतून मिळाली. कोणत्याही अन्यायाशी तडतोड करू नका, त्यासाठी कायदा मोडावा लागला तरी चालेल, असा विचार ‘थोरो’ यांनी मांडला. प्रसिद्ध मिठाचा सत्याग्रह या गांधींच्या लढ्यामागे थोरोंची प्रेरणा होती. सविनय कायदेभंगाच्या या चळवळीची सुरुवात म. गांधींनी दक्षिण आफ्रिकेतच केली.
हिंदू मजुरांचा छळ तिथल्या गोर्या राजवटीने चालविला होता. त्यांना मतदानाचा हक्क नाकारला होता, दरडोई तीन पौंडाचा कर बसवला होता. शिवाय प्रत्येक हिंदी माणसाच्या दहाही बोटांचे ठसे पोलीस चौकीत देण्याचे बंधन घातले होते. हिंदी लोक हा अत्याचार निमुटपणे सोसत होते. गांधीने या अन्यायाविरुद्ध चळवळ उभी केली. त्यासाठी तुरुंगवासही सोसला आणि शेवटी गोर्या सरकारला हे अमानुष नियम मागे घेण्यास भाग पाडले. ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढणाफर्या बॅ. गांधीनी ‘बोअर’ युद्धात ब्रिटिशांना साहाय्य केले. नामदार गोखले यांनी गांधी म्हणजे पृथ्वीतलावरील निर्मल, निर्भय आणि उदात्त जीव असं वर्णन केलं. दक्षिण आफ्रिकेतल्या हिंदी मजुरांप्रमाणेच चंपारणातील नीळ उत्पादन करणार्या शेतकर्यांची स्थिती होती. म. गांधीनी त्याविरुद्ध आंदोलन करून नीळ शेतकर्यांना न्याय मिळवून दिला. हिंदू-मुस्लीम ऐक्य व्हावे, दलितांना न्याय मिळावा अशा तत्त्वांसाठी गांधी लढले. देशाचे स्वातंत्र्य म्हणजे एक अन्यायकारी शासनव्यवस्था जाऊन त्याचप्रकारची अन्यायकारी दुसरी व्यवस्था त्याना कशीच मान्य नव्हती.
ब्रिटिश जाऊन त्याजागी जर्मनी-जपानची अधिसत्ता त्यांना मान्य नव्हती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी आदर असूनही दुसर्या महायुद्धात नेताजींनी हिटलरबरोबर केलेला संग त्यांना आवडला नाही. देशाची फाळणी त्यांना मान्य नव्हती, परंतु एकदा फाळणी झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये झालेल्या वाटणीनुसार पाकिस्तानला देणे असलेले रु. ५५ कोटी त्यांना देऊन टाकावेत हा त्यांचा आग्रह त्यांच्या सच्छील, संयमी व सत्यप्रिय जीवनाचा परिपाक होता.
आजकाल शांती, अहिंसा वगैरे शब्द लोकांना शेळपट वाटतात. पण ज्यांच्याजवळ अणुबॉबसारखी विध्वंसक अस्त्रे आहेत, त्यांनाही शांती व अहिंसेची कास धरावी लागते. हाच गांधी तत्त्वज्ञानाचा विजय आहे. सत्य आणि अहिंसा ही तत्त्वे सनातन आहेत. डोंगरदर्या जेवढ्या पुरातन आहेत तेवढीच सत्य आणि अहिंसा ही तत्त्वे पुरातन आहेत, असा गांधीजींचा संदेश आहे. म्हणूनच ते फक्त महात्मा नव्हे तर संत आहेत, संत मोहनदास आहेत.