संतांना लावलेले चमत्कार ही समाजाची मर्यादा

0
202
कार्यक्रमात बोलताना अशोक कामत. सोबत प्राचार्य अनिल सामंत. (छाया : किशोर नाईक)

डॉ. अशोक कामत यांचे प्रतिपादन
विलक्षण व्यक्तीमत्वाचा माणूस समाज बदलू शकतो हे संतांनी दाखवून दिले. मात्र संतांना लावलेले चमत्कार ही समाजाची मर्यादा आहे, संतांची नव्हे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा संत साहित्याचे गाठे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी येथे केले. डॉ. कामत ८८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवारही आहेत.जात-पात, भाषिक अभिनिवेशाच्या पलिकडे जायला संत साहित्य शिकवते. मी भक्तिसाहित्याचा विचार करतो तेव्हा नीतीशास्त्राचा विचार करतो. मला महाराष्ट्र ही कर्मभूमी करावी लागली तरी मी गोव्याचा आहे आणि गोव्याचा प्रतिनिधी म्हणून मी ८८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभा आहे. मी तुमचे मत कौल म्हणून स्वीकारीन, असे भावोद्गार ज्येष्ठ साहित्यिक तथा संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी येथे काढले.
गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे डॉ. कामत यांच्याशी वार्तालापाचा कार्यक्रम सोमवारी मंडळाच्या सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. पंजाब येथील घुमान या संत नामदेव महाराजांच्या कर्मभूमीत ८८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन भरत आहे आणि संत नामदेव अध्यासनाचे अजोड कार्य मराठी हिंदीतून केलेले तसेच दोन्ही भाषातून लेखन-संशोधन-मार्गदर्शन-प्रकाशन-समाज प्रबोधन केलेले आणि पंजाब व महाराष्ट्र जोडण्यासाठी आयुष्यभर कार्य केलेले डॉ. कामत हे संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत याला वेगळे महत्त्व आहे. डॉ. अशोक कामत यांनी वार्तालाप कार्यक्रमात आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले, की मला महाराष्ट्र आणि पंजाबचे नाते कायम जोडायचे आहे तुम्ही मत कोणालाही द्या पण मला दिलेत तर महाराष्ट्र – पंजाबचे नाते मी घट्ट करीन. गुरुग्रंथ, बायबलवरही मी अत्यंत आनंदाने लिहिले आहे. राष्ट्रभाषेचे मूळ मराठी संतांच्या कवितेत आहे हे सोदाहरण स्पष्ट करून डॉ. कामत म्हणाले, संत नामदेव हे देशाला विलक्षण शक्ती देणारे पुरूष होते. विलक्षण व्यक्तिमत्वाचा माणूस समाज बदलू शकतो हे संतांनी दाखवून दिले. मात्र संतांना लावलेले चमत्कार ही समाजाची मर्यादा आहे संतांची नव्हे. नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम यासारखे संत झाले नसते तर मराठी भाषा इथवर पोचली नसती. प्राचीन साहित्य, संस्कृतीशी समाजाची नाळ तुटली ती जोडण्याचे कार्य संतांनी केले.
५० वर्षे पुण्यात राहून आपण पंजाबशी कसा संबंध ठेवला याबद्दलही स्पष्ट करून एका प्रश्‍नावर डॉ. कामत म्हणाले, मी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आलो तर त्या पदाला न्याय देईन, दुसरा निवडून आला तर त्याचे आनंदाने स्वागत करीन साहित्याची चळवळ अखंड असली पाहिजे छोटी छोटी साहित्य संमेलनेही व्हायला हवीत माणसे जोडण्याची शक्ती साहित्यात आहे.
गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांनी गोमंतकीय बा. भ. बोरकरांना अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद न मिळाण्याचे पाप घडले ते डॉ. अशोक कामत याना निवडून निस्तारण्याची संधी आज आली आहे. मंडळाचे अध्यक्ष सुरेश नाईक यांनी स्वागत केले.