>> उद्या कार्यभार स्वीकारणार; पुढील 3 वर्षे कार्यकाळ
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)च्या गव्हर्नरपदी केंद्र सरकारने संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली आहे. सध्या ते केंद्रीय अर्थ मंत्रालयात महसूल सचिवपदी कार्यरत होते. मल्होत्रा 11 डिसेंबरपासून गव्हर्नरपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे. ते आरबीआयचे 26 वे गव्हर्नर असतील.
विद्यमान आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास कार्यकाळ 10 डिसेंबर 2024 रोजी संपत आहे. त्यांची जागा संजय मल्होत्रा हे घेतील. 12 डिसेंबर 2018 रोजी शक्तिकांत दास यांना गव्हर्नर बनवण्यात आले होते, त्यानंतर त्यांचा कार्यकाळ आणखी तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला होता.
केंद्रीय मंत्रिमंडळाने काल संजय मल्होत्रा यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. संजय मल्होत्रा हे 1990 च्या राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये ते आरईसीचे चेअरमन आणि एमडी या पदावर नियुक्त झाले. त्याआधी ते उर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत होते. 2022 मध्ये डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसचे सचिव या पदावर ते कार्यरत होते. संजय मल्होत्रा यांना केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदीही नियुक्त केले होते. आता त्यांना आरबीआयचे गव्हर्नर हे पद देण्यात आले आहे. पुढील तीन वर्षांसाठी त्यांचा कार्यकाळ असणार आहे.
मल्होत्रा यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. त्यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी (यूएसए) येथून पब्लिक पॉलिसी या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
संजय मल्होत्रा हे अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले होते. त्यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. त्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात कर धोरण तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.