संघशताब्दी

0
9

काल विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ झाला. शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या रा. स्व. संघाने आजवर वादाच्या अनेक वावटळी आणि टीकेचे असंख्य घण सोसले आहेत, परंतु तरीही समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये वावरणारी एवढी सर्वव्यापी संघटना देशामध्ये दुसरी नाही हेही तितकेच खरे आहे. स्वयंसेवकांच्या पिढ्यांमागून पिढ्या तिने घडवल्या आहेत. भारतीय संस्कृतीचा अभिमान समाजामध्ये जागवला आहे आणि त्यासाठी भगवीकरणाचा आरोपही झेलला आहे. कित्येक वर्षांपूर्वी सामाजिक समरसतेला आपल्या कार्यसूचीवर आणूनही संघावरील ब्राह्मणी छाप पुसली गेलेली नाही अशी टीकाही त्यावर होत असते. संघ परंपरेचा अभिमान बाळगणारे जसे आहेत, तसेच आज समाजामध्ये पसरलेल्या असहिष्णुतेसाठी, अविवेकासाठी संघाला जबाबदार धरणारेही आहेत. परंतु कोणी काही म्हणो, रा. स्व. संघ आजवर देशातील एक प्रबळ शक्ती निश्चितपणे बनलेली आहे. वनवासी कल्याणापासून शिक्षणापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये व्यापक कार्य संघ करतो आहे. संघाने प्रसिद्धीपासून दूर राहून देशामध्ये केलेले सेवाकार्य दुर्लक्षिता येणारे नाही. देशविघातक नक्षलवादी विचारसरणीचा पगडा बसविल्या जाणाऱ्या वनवासींपासून फुटिरतेच्या उंबरठ्यावर पोहोचवल्या गेलेल्या ईशान्येकडील राज्यांमध्येदेखील संघकार्यामुळेच राष्ट्रीय विचार रुजू शकला आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहिली हे विसरता येत नाही. सरसंघचालक दसरा मेळाव्याला काय बोलतात ह्याकडे देशाचेच नव्हे, तर जगाचे लक्ष असते. कालच्या विजयादशमी मेळाव्यात सरसंघचालकांनी व्यक्तिगत आणि राष्ट्रीय चारित्र्यावर केलेले संबोधन विचार करण्याजोगे आहे. ‘मांगल्य आणि सज्जनतेची शक्ती ही व्यक्तिगत चारित्र्यातून निर्माण होत असते’ असे भागवत काल म्हणालेे. स्वामी विवेकानंदांनी ह्या देशातील प्रत्येक समस्येचे मूळ हे चारित्र्याचा अभाव असल्याचे म्हटले होते. त्यामुळे व्यक्तिगत आणि राष्ट्रीय चारित्र्याच्या घडणुकीसाठी रा. स्व. संघाने गेल्या 99 वर्षांत जे काम केलेले आहे, ते अजोड स्वरूपाचे आहे. विशेषतः ब्रिटिशांपासून पोर्तुगिजांपर्यंतच्या परकीय सत्तांनी भारतीय समाजाला संस्कृतिविहिन बनवण्याचे जे अथक प्रयत्न केले, त्या जोखडाला फेकून देऊन समाजामध्ये राष्ट्राभिमान रुजवण्यात संघाने दिलेले योगदान दुर्लक्षिता येणारे नाही. परंतु शेवटी कोणतीही संघटना म्हटली की तिची कितीही उदात्त ध्येयधोरणे असली, तरी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. त्यामुळे ह्या संघविचारातून काही दुष्प्रवृत्तीही जर निपजल्या असतील, असहिष्णुतेचे विष समाजामध्ये कालवत असतील, तर अशा घटकांवर पुरेसा अंकुश बसविणे हीही संघनेतृत्वाची जबाबदारी ठरते. त्यांना मोकळीक देणे संघविचारास मारक ठरेल, कारण संघाने आपल्या ‘हिंदुत्वा’ विषयी अगदी सुरुवातीपासून जाहीरपणे भूमिका मांडली आहे की ‘हिंदुत्व’ हे आपल्यासाठी धार्मिक विषय नसून तो राष्ट्रीयत्वाचा विचार आहे व सर्वसमावेशक आहे. ‘जो जो ह्या देशाला आपली माता मानतो तो हिंदू’ ही व्यापक विचारधारा घेऊन संघ काम करीत असतो. परंतु संघपरिवारातील काही घटकांच्या अतिरेकी कर्मठ, धर्मांध आणि विषारी कार्यपद्धतीमुळे आणि संघनेतृत्वाने त्याला पुरेसा आळा न घातल्याने ह्या मातृसंघटनेकडे संशयाने पाहिले गेले. वेळोवेळी ह्या संघटनेवर बंदीही घातली गेली. तळागाळापर्यंत जाऊन पदरमोड करून निःस्वार्थीपणे काम करणारे लाखो स्वयंसेवक, अत्यंत साध्या राहणीद्वारे निरलसपणे आपले अवघे जीवन संघकार्याला आणि पर्यायाने देशाला वाहणारे प्रचारक यांचे फार मोठे जाळे ह्या संघटनेच्या माध्यमातून देशामध्ये विणले गेले आणि त्याने सर्व जीवनांगांमध्ये राष्ट्रीय रुजवला. ह्या पार्श्वभूमीवर आज सत्ता हाताशी असल्याने संघाची कार्यपद्धती बदलत चालली आहे की काय असा सवालही उपस्थित होत असतो आणि त्याचा विचार संघनेतृत्वाने केला पाहिजे. भारतीय जनता पक्षासारखा संघाचा राजकीय चेहरा आज आपल्याला आता संघाची जरूरी नाही असे सांगू लागला आणि काँग्रेसचाच तोंडवळा घेऊन वावरू लागला असेल, तर कुठेतरी अंकुश बसविण्याची आवश्यकताही निर्माण झालेली आहे. काळाप्रमाणे संघ बदलला, त्याचा गणवेषही बदलला, परंतु जी व्यक्तिगत चारित्र्य, सर्वसमावेशकता आणि सेवाकार्याची मूल्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी घालून दिलेली आहेत, तिच्यापासून मातृसंस्था वा परिवारातील घटकांनी फारकत घेतल्यासारखे वाटत असेल तर ह्या शताब्दी वर्षामध्ये त्यावरही मंथन व्हावे आणि अहितकारी बांडगुळे फेकून देऊन राष्ट्राभिमान आणि चारित्र्यनिर्माण ह्या मार्गाने त्याची यापुढील वाटचाल व्हावी आणि ती देशासाठी हितावह ठरावी, कोणत्याही प्रकारे विघातक ठरू नये.