संघटित व्हा, कायदा करा, कुष्ठरोग दूर करा!

0
4
  • डॉ. मनाली महेश पवार

कुष्ठरोग अजूनही अस्तित्वात आहे आणि तो बरा होण्यासारखा आहे. प्रत्येक वर्षी दोन लाखांहून अधिक कुष्ठरोगाचे निदान होते, आणि लाखो लोक असे आहेत जे कुष्ठरोगाच्या विलंबित उपचारांच्या हानिकारक परिणामांसह जगत आहेत. अनेक लोकांना वाटते की आता कुष्ठरोग अस्तित्वात नाही. पण अजूनही सुप्त रूपात हा रोग अस्तित्वात आहे आणि त्याचे पूर्ण निर्मूलन होणे आवश्यक आहे.

जागतिक कुष्ठरोग दिवस हा जानेवारीच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो. या मोहिमेचा उद्देश- कुष्ठरोगाबद्दल जागरूकता वाढवणे, कुष्ठरोगाने बाधित व्यक्तींना भेडसावणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकणे आणि कुष्ठरोग दूर करण्यासाठी सहकार्यात्मक कृती करणे. कुष्ठरोग अजूनही अस्तित्वात आहे आणि तो बरा होण्यासारखा आहे. प्रत्येक वर्षी दोन लाखांहून अधिक कुष्ठरोगाचे निदान होते, आणि लाखो लोक असे आहेत जे कुष्ठरोगाच्या विलंबित उपचारांच्या हानिकारक परिणामांसह जगत आहेत. अनेक लोकांना वाटते की आता कुष्ठरोग अस्तित्वात नाही. पण अजूनही सुप्त रूपात हा रोग अस्तित्वात आहे आणि त्याचे पूर्ण निर्मूलन होणे आवश्यक आहे.
कुष्ठरोग हा किमान चार हजार वर्षे जुना रोग आहे. 2035 पर्यंत या रोगाचा शून्य प्रसार हे आमचे लक्ष्य आहे. त्यामुळे या रोगाबद्दल सर्वसामान्यांना मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.

कुष्ठरोग हा कुष्ठजंतूंमुळे (मायक्रो बॅक्टेरिअम्‌‍ लेप्री) होणारा रोग आहे. सर्वसाधारणपणे आपल्यापैकी 98 टक्के जनसामान्यांत कुष्ठरोगाविरुद्ध लढण्याची उत्तम नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती असल्याने आपणास कुष्ठरोग होत नाही. कुष्ठरोगाच्या जंतूंनी आपल्या शरीरात प्रवेश केल्यानंतर कुष्ठरोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती कमी असेल तर 3 ते 5 वर्षांच्या कालावधीनंतर शरीरावर कुठेही कुष्ठरोगाची लक्षणे दिसू शकतात. शंभर नवीन कुष्ठरुग्णांपैकी फक्त 10 ते 15 रोगीच सांसर्गिक असतात.

  • कुष्ठरोगाची सामान्य कारणे
    दुष्ट झालेले दोष (विशेषतः रक्त-पित्त) त्वचादी धातूंचा नाश करून त्वचेच्या ठिकाणी वैवर्ण्य उत्पन्न करून त्वचा व अन्य शरीरधातूंच्या ठिकाणी कोथ करतात, म्हणूनच या रोगाला ‘कुष्ठ’ असे म्हणतात.
    आयुर्वेद शास्त्रात सर्वच त्वचाविकारांना अगदी खरुज, नायटा यांनासुद्धा कुष्ठ म्हटलेले आहे.
  • सर्व प्रकारच्या त्वचाविकारांचे म्हणजेच कुष्ठविकारांचे ‘विरुद्ध अन्नपान’ हे महत्त्वाचे कारण आहे. यामध्ये सर्वप्रकारचे शेक (दुधामध्ये फळे) येतात, फ्रूट सॅलॅड, दुधाच्या चहाबरोबर मीठ घातलेली चपाती खाणे, मांसाहारी जेवणानंतर लगेच आईस्क्रीम खाणे, दूध-मासे, पनीरच्या विविध रेसिपी, त्याचप्रमाणे हिवाळ्यात आईस्क्रीम खाणे (ऋतूविरुद्ध होते), पचनशक्ती कमकुवत असताना पचायला जड अन्नपदार्थ सेवन करणे, तसेच पित्तप्रकृती असलेल्या एखाद्या व्यक्तीने गरम-मसालेदार खाणे, मधासारखा पदार्थ गरम करून सेवन करणे, रात्री दही खाणे हे विरुद्ध अन्न मानले जाते. तसेच अति परिपक्व व कुजलेल्या पदार्थांचे सेवन करणे हेही विरुद्ध अन्न मानले आहे.
  • उलटी, शिंक यांसारख्या उदीरित वेगांना रोखणे, अतिभोजनानंतर लगेच व्यायाम करणे.
  • अग्नीच्या संपर्कात अधिक काळ राहणे.
  • ऊन, परिश्रम व भय असताना विश्रांती न घेता थंड पाणी पिणे.
  • अपक्व पदार्थांचे सेवन करणे.
  • खूप आणि गरज नसताना खाणे.
  • पिष्टमय पदार्थ- उडीद, तीळ, दूध व गूळ एकत्रितपणे खाणे, भोजनाच्या परिपाककालापूर्वीच मैथून करणे.
  • दिवसा झोपणे ही काही महत्त्वाची कुष्ठाची कारणे आहेत.

सर्वसाधारण कुष्ठाची लक्षणे

  • कुष्ठरोगाची सुरुवात एक किंवा अनेक डागांनी होऊ शकते. शरीरावरील त्वचेच्या रंगापेक्षा फिकट किंवा लालसर रंगाचा, सपाट किंवा उठावदार असलेला डाग/चट्टा कुष्ठरोगाचा असू शकतो.
  • अशा डागावर बऱ्याचदा बधीरता असते, सुन्नपणा असतो, संवेदनेचा अभाव असतो.
  • हळूहळू/मंदगतीने आकाराने व संख्येने वाढत जाणाऱ्या, पसरणाऱ्या बऱ्याच दिवसांपासूनच्या डागांकडे दुर्लक्ष करू नका. त्वचा तेलकट, लालसर, जाडसर, सुजलेली दिसणे, याबरोबरच कानांच्या पाळ्या जाड होणे/सुजणे, भुवयांचे केस विरळ होणे, झडणे, अंगावर गाठी येणे हीसुद्ध कुष्ठरोगाची लक्षणे असू शकतात.
  • शरीराच्या बऱ्याच भागांवर व बऱ्याच संख्येने पसरलेले, संवेदनेचा अभाव- बधीर असलेले, कमी प्रमाणात सुन्न किंवा संवेदना कायम असलेले डागसुद्धा कुष्ठरोगाचे लक्षण असू शकते.
  • शंभर नवीन कुष्ठरुग्णांपैकी फक्त 1 ते 3 रुग्णांना शारीरिक विकृती असू शकते.
  • हातापायातील चेतातंतू खराब झाल्यास, हातापायांना मुंग्या येणे, झिणझिण्या येणे, हाता-पायांत बधीरता/सुन्नपणा व त्वचा कोरडी पडणे अशी लक्षणे आढळतात. स्नायू अशक्त होऊन नीट कार्य करू शकत नाहीत. परिणामी हाता-पायाची बोटे वाकडी होतात.
  • शरीरातील चेतातंतू खराब झाल्यास संबंधित भागावर, अवयवांवर परिणाम होतो. जसे हातापायांना वारंवार जखमा होणे, डोळ्याची पापणी मिटता न येणे, बोटे वाकडी होणे, हात किंवा पाय लुळा पडणे इत्यादी.
  • त्वचेवर लहान-मोठे चट्टे, हर्ष आणि दाह ही लक्षणे दिसतात. ही लक्षणे प्रामुख्याने नासिका, भ्रूप्रदेश, कान, गाल, हस्त वा पाय यांतील स्नायूंत आढळतात. त्वचा शुष्क असून भेगा पडणे हे लक्षण उत्पन्न होते. केस गळू लागतात. विशेषतः भुवयांचे केस गळतात.

आयुर्वेदानुसार चिकित्सा

  • आयुर्वेद शास्त्रानुसार कुष्ठामध्ये शोधन चिकित्सा महत्त्वाची आहे. कुष्ठ ही चिरकाली व्याधी आहे, म्हणूनच शोधनोपक्रमही वारंवार करावे लागतात.
  • मृदुशोधन द्यावे, पण ते वरचेवर देत राहावे.
  • वातप्रकोप होऊ नये म्हणून शोधनानंतरही स्नेहन चालू ठेवावे. वमन दर 15 दिवसांनी तर विरेचन महिन्यातून एकदा करावे. शिरोविरेचन दर तीन दिवसांनी द्यावे, तर दर सहा महिन्यांनी रक्तमोक्षण करावे. तीक्ष्णलेप दर तीन दिवसांनी लावावेत. औषधी शमन द्रव्यात कफघ्न, क्लेद कमी करणारी व त्वच्य औषधे वापरावी. बावची, खदीर, करंज, निंब, कुटज, गुडूची, शिलाजतू, त्रिफळासारख्या औषधी द्रव्यांचा उपयोग होतो.

पथ्यापथ्य

  • जुने तांदूळ, जुने गहू, मूग, मसूर, जांगल मांस, पडवळ, दुधीभोपळा, दोडका हे विशेष पथ्यकर पदार्थ आहेत.
  • अतिप्रमाणात तिखट, तेलकट, आंबट, लवणयुक्त, दही, गूळ, गुरू भोजन, मिष्टान्न, आंबवून तयार केलेेले पदार्थ, अन्य विदाही पदार्थ हे वर्ज्य समजले पाहिजेत.
  • दररोज स्नान करणे आवश्यक आहे. स्नानासाठी गरम पाणी वापरावे. साबणाचा वापर शक्यतो टाळावा. कारण त्यातील क्षारयुक्त पदार्थांनी त्वचेची हानी होते, रुक्षता वाढते. निरनिराळी तेले, अत्तरे, सुगंधी तेले किंवा अशाप्रकारचे अन्य पदार्थ टाळावेत. शरीराचा चिकटपणा कमी होण्याकरिता चंदन चूर्ण किंवा हरभऱ्याच्या डाळीचे पीठ यांचा वापर करावा.
  • वापरावयाचे कपडे हे साधे, सुती वा रेशमी असावेत.
  • अतिश्रम आणि अतिमैथून टाळावे.
  • विशेषतः लवण (मीठ), दही, मासे किंवा तत्सम अन्य पदार्थ टाळणे हे पथ्य सर्वच कुष्ठ प्रकारात फार महत्त्वाचे आहे.
    शारीरिक विकृती व विद्रूपता हेच कुष्ठरोगाबद्दलच्या भीतीचे व सामाजिक कलंकाचे मूळ कारण आहे. लवकर निदान व नियमित उपचाराने कुष्ठरोगामुळे येणाऱ्या विकृती टाळता येतात. त्याचप्रमाणे कुष्ठरोगीचे निर्मूलनसुद्धा सहज शक्य आहे.
    कुष्ठरोगाचे मोफत निदान, वड्लविध औषधोपचार, (एम.टी.डी.) प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका, महानगरपालिका रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये येथे उपलब्ध आहेत.