जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत कॉंग्रेसला पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला असून, पक्षाला बुथ स्तरापासून पक्ष संघटना बळकट करण्याची गरज असल्याचे या निकालाने दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया काल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिली. आता आम्ही प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पक्षबांधणीचे काम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजपला त्यांच्या आमदारांचा फायदा झाला, तर कुठ्ठाळीत विजयी झालेल्या उमेदवार ह्या भाजपला पाठिंबा देणार्या आमदाराच्या पत्नी असल्याचे पाटकर म्हणाले. जिल्हा पंचायत निवडणुका तोंडावर आलेल्या असताना कॉंग्रेसचे साळगाव येथील आमदार भाजपमध्ये गेले आणि त्याचा फायदा रेईश मागूश भाजपला झाल्याचे युरी आलेमाव यांनी सांगितले. आता आम्ही नव्या जोमाने पक्षबांधणीचे काम हाती घेणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.