संग्रहणी

0
1239
  •  वैदू भरत नाईक

‘संग्रहणी’ म्हणजे थोडक्यात ‘हगवण’. विशेषतः या विकाराचे स्त्रीरोगीच जास्त आढळतात. आमांश, अतिसार बरेच दिवसांचा असला की लहान आतड्यातील त्वचेची आतील बाजू बिघडते व त्यामुळे अन्न नीट न पचता बाहेर पडते. आमांश व अतिसार बरा झाल्यावर पचनास जड, तेलकट पदार्थ खाण्यात आल्यास आतड्याला त्याचे पचन करणे लगेच शक्य नसते. कारण ते अगोदरच आमांशाने दुर्बल झालेले असते. व्हिटॅमिन्सचा अभाव, क्षारांची कमतरता यामुळे हा विकार होतो.

वरचेवर अजीर्ण, पोट फुगणे व जास्त खाण्यात आले तर वरचेवर शौचास होणे, पोटात कळा येणे, आम पडणे, त्याला घाण वास येणे, तोंड लाल होणे, जीभ लाल होणे, तिखट पदार्थ जिभेला झोंबणे अशी लक्षणे आढळतात. एवढेच नव्हे तर पाणीही जिभेला लागले तर आग होते. जिभेवर दोन्ही बाजूना पुरळ येते. अन्ननलिकाही सुजते. लाल होते, तिच्यावर तांबडे पुरळ दिसतात. अशक्तपणा येतो. माणूस आळशी बनतो. शरीर फिकट दिसू लागते. गुदद्वाराची आग होते.
सुरुवातीलाच योग्य औषधोपचार झाला तर रोग बरा होतो. पण ध्यानात ठेवण्याची गोष्ट म्हणजे हा विकार लवकर बरा होणारा नाही. दीर्घकाळपर्यंत औषधे घ्यावी लागतात. रोग्याला कोणत्याही प्रकारचे अन्न देऊ नये. दूध, ताक, दही, केळी, आंबे एवढेच द्यावे.

रोग्याला जरा आराम वाटू लागल्यावर रव्याची खीर, पेज खावी असे वाटू लागले की मग तोंड आलेले असेल तर तवकिलाची लापशी करून द्यावी. रोग्याची प्रकृती सुधारली असली तरी तोंड आल्यास लगेच अन्न देणे बंद करावे. प्रकृती अगदी ठणठणीत झाली तरी पचण्यास जड असे पदार्थ खाण्यास देऊ नये.
औषधे ः- १) कुड्याचे साल ताकात वाटून त्यात थोडा मध घालून द्यावे
२) लसूणादिगूटीच्या २ गोळ्या ताकातून द्याव्यात.(दिवसातून ३ वेळा)
३) चिंच भिजत घालावी. ते पाणी दिवसातून ३ वेळा रोग्यास द्यावे.
४) गरूडवेल, सुंठ, अतिविष व नागरमोथा यांचा काढा करून त्यात साखर घालून द्यावा.