संगीतात भारतीय शास्त्रीय संगीत श्रेष्ठ आहे, असे प्रख्यात ज्येष्ठ गायक पं. सुरेश वाडकर यांनी सांगितले. स्वस्तीक संस्थेतर्फे आयोजित ‘स्वरमंगेश’ संगीत संमेलनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज दिवसभर होणार्या या संमेलनात श्री. वाडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. फिल्म संगीत थोडे कमी करून शास्त्रीय संगीताकडे वळण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. यावेळी स्वस्तीक संस्थेचे अध्यक्ष प्रवीण गावकर, प्रायोजक स्लिपवेल कंपनीचे राकेश चाहेर, राजदीप बिल्डर्सचे राजेश तारकर, ग्रँड हयातच्या विद्या शंकर यांची उपस्थिती होती. दरम्यान, यंदा या संगीत महोत्सवाचे चौथे वर्ष आहे. आज सकाळच्या सत्रात पं. सुरेश वाडकर यांच्या शास्त्रीय व नाट्यगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दुसर्या सत्राची सुरूवात संध्याकाळी ४ वा. होईल. यात पं. अजय चटर्जी यांचे शिष्य अमोल चटर्जी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यानंतर शाहीद परवेझ यांचे सतार वादन असेल. महोत्सवाची सांगता उस्ताद रशीद खान यांच्या गायनाने होणार आहे.