>> चित्रपटसृष्टीवर शोककळा; आज होणार अंत्यसंस्कार
आपल्या आवाजामुळे आणि संगीतबद्ध केलेल्या गीतांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवणारे ज्येष्ठ गायक बप्पी लाहिरी यांचे मुंबईत निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून बप्पी लाहिरी यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया आजार होता. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
बप्पी लाहिरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला होता. बॉलिवूडमध्ये ‘बप्पीदा’ या नावाने ते परिचित होते; परंतु ते त्यांचे मूळ नाव आलोकेश लाहिरी असे होते. १९७३ सालच्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाद्वारे बप्पी लाहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले; पण त्यांना खर्या अर्थाने यश मिळायला १९८२ साल उजाडावे लागले. १९८२ मध्ये आलेल्या मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटामुळे बप्पी लाहिरी प्रकाशझोतात आले.
१९८६ मध्ये बप्पीदांनी ३३ चित्रपटांतील १८० गीते रेकॉर्ड केली होती. त्यांच्या या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यांनी सुमारे साडेसहाशे चित्रपटांना संगीत दिले. हिंदी, बंगालीसह जवळपास सर्व भाषांमध्ये त्यांनी गीते गायली. तसेच, ५००० हून अधिक गीते त्यांनी रचली.
बप्पी लाहिरी यांच्या पश्चात पत्नी चित्रानी लाहिरी, मुलगा बप्पा लाहिरी आणि त्यांची मुलगी – गायिका रेमा लाहिरी बन्सल असा परिवार आहे.
बप्पी लाहिरी यांचे संगीत सर्वसमावेशक आणि विविध भावना सुंदरपणे व्यक्त करणारे होते. पिढ्यानपिढ्या लोक त्यांच्या संगीताचे चाहते राहिले आहेत. त्यांचा जिंदादिल स्वभाव सर्वांच्या लक्षात राहणारा आहे. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रति माझ्या संवेदना व्यक्त करतो.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान.