संगणक वापरताना काय काळजी घ्याल?

0
1300
  • डॉ. पांडुरंग र. गावकर

डोळ्यांवरचा ताण, डोळे जळजळणं, डोळ्यांची खाज, डोळे लवकर थकणे, पाणी येणं आणि याचाच पुढचा परिणाम म्हणजे डोकेदुखी, सततचा थकवा, एकाग्रता न होणे आणि सतत चिडचिड. उपाय – शक्यतो मॉनिटरवर ‘ग्लेअर फिल्टर’ परावर्तित प्रकाश कमी करणारा फिल्टर बसवावा.

गेल्या ३० – ४० वर्षांत संगणक म्हणजेच कॉंप्युटरनं विविध क्षेत्रात सावकाश प्रवेश करून आता सर्वच क्षेत्रात पाय पसरले आहेत. कॉंप्युटर आधी लहान आकार घेऊन टेबलावर बसला नंतर लॅपटॉप होऊन मांडीवर आला. आणि आता तर लोक हातात धरून फिरू लागले आहेतच (पामटॉप). ब्लॅकबेरी, जी३, वगैरे. माणूस कुठेही गेला तरी उर्वरित जगाशी त्याला जोडून ठेवतो आणि बसल्याठिकाणीसुद्धा कमाल करून दाखवू शकतो.

खाजगी कंपन्या, सरकारी कचेर्‍या, बँका, रुग्णालये, शाळा, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी संगणक शिरजोर होत आहे. संगणक साक्षरता ही काळाची गरज होऊन बसली आहे. कुठल्याही प्रकारची नोकरी मिळवण्याआधी कॉम्प्युटर प्रशिक्षण घेतले आहे का असे विचारले जाते आणि कांप्युटर कोर्स केलेल्या व्यक्तीला प्राधान्य दिले जाते. इंटरनेटद्वारा आता आपल्याला पाहिजे असलेल्या क्षेत्राची माहिती घरबसल्या शीघ्रगतीने मिळते. सेवानिवृत्त मंडळी विरंगुळा म्हणून कॉंप्युटरकडे वळत आहेत. परदेशी असलेल्या मुलांशी ई-मेल, नेटफोनवरून संपर्क साधता येतो. प्रचंड मोठ्या प्रमाणावर माहिती आणि मनोरंजनाचं भांडार या सगळ्या पिढ्यांसमोर दत्त म्हणून उभं आहे.

पण या संगणकाच्या अयोग्य वापरामुळं विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात आणि काही प्रतिबंधक उपायांनी त्या सहज टाळतासुद्धा येतात. मात्र त्यासाठी कॉंप्युटर अर्गोनॉमिक्सची जाण असणंसुद्धा आवश्यक आहे.
रोज सतत कॉंप्युटरवर काम केल्यानं – मान भयंकर दुखते, कीबोर्ड व माऊस अनेक तास वापरल्यामुळे मनगटाला सूज येते. तेथील ऊतींचा दाह होतो. अंगठा आणि बोटं यात बधिरता, मुंग्या येणे, हातापासून कोपरापर्यंत चमका, वेदना सहन कराव्या लागतात. वेदना नाहिशा करण्यासाठी गरम पाण्याचा शेक, वेदनाशामक आयुर्वेदिक औषध कामी पडतात.

डोळ्यांवरचा ताण, डोळे जळजळणं, डोळ्यांची खाज, डोळे लवकर थकणे, पाणी येणं आणि याचाच पुढचा परिणाम म्हणजे डोकेदुखी, सततचा थकवा, एकाग्रता न होणे आणि सतत चिडचिड. उपाय – शक्यतो मॉनिटरवर ‘ग्लेअर फिल्टर’ परावर्तित प्रकाश कमी करणारा फिल्टर बसवावा. संगणकावर जास्त वेळ काम करायचं असेल तर अधूनमधून खिडकीशी जाऊन बाहेरचं दृश्य, दूरवरची झाडं, इमारती, आकाश यांच्याकडे नजर टाकणे, हाही व्यायाम डोळ्यांना विश्रांती देणारा आहे. त्याशिवाय इंटरनेट सर्फर्समध्ये मानसिक विकारसुद्धा होऊ शकतात. संगणकाच्या जगात सातत्याने राहणार्‍यांची लैंगिक क्षमता कमी होते, असे अहवाल आहेत. संगणकाचे तंत्रज्ञान तर खूप वेगाने विकसित होत आहे. नियमितपणे केवळ १५ मिनिटे तरी योगिक ध्यान-धारणा केली तरच परिस्थितीत सुधारणा घडून येईल, यात काहीही संशय नाही.

कॉंप्युटर ऑपरेटर्सनी पुढील व्यायामाचा सराव करणे हिताचे आहे…
– काम करताना वरचेवर डोळ्यांची उघडझाप करा.
– प्रत्येकी दोन तास काम केल्यानंतर उठा, पाणी प्या, येरझारा घाला. थंड पाण्याने डोळे धुवा.
– धूम्रपान व मद्यपान टाळा. रात्रीच्या पार्टीज टाळा.
– तज्ज्ञांच्या देखरेखीखाली व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करा. डोळ्यांचे यौगिक व्यायाम करा.
– काहीवेळ पोहायला जा किंवा बॅडमिंटन, टेबल-टेनिससारखा खेळ खेळा.
– कोणतीही तक्रार उद्भवल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.
– दर १० मिनिटांनी डोळे मिटून घ्या. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासून नंतर डोळ्यांवर ठेवा.
– डोळ्यांचे सर्वांगसुंदर व्यााम करा.
– कमी वेळात शास्त्रशुद्ध व्यायाम रोज करण्यासाठी सर्किट किंवा चक्राकार पद्धत उपयोगी पडते. यामध्ये विविध व्यायाम जसे एरोबिक, वेट ट्रेनिंग आणि ताण व्यायामाचा एक सुयोग्य क्रम या सर्किटमध्ये बसवलेला असतो. प्रत्येक व्यायाम विविध स्नायुगटांचा असतो. अशा प्रकारे थोड्या वेळात अत्यंत उपयुक्त व्यायाम करता येतात.