गोव्यातील कालपर्यंतच्या २९२ कोरोना रुग्णांपैकी तब्बल २५१ हे केवळ वास्कोच्या मांगूर हिलमधील स्थानिक संक्रमणाशी संबंधित आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वर्गवारीनुसार जरी त्याला स्थानिक संक्रमण संबोधण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात काही आरोग्य कर्मचार्यांच्या द्वारे हे संक्रमण एव्हाना गोव्याच्या वेेगवेगळ्या तालुक्यांत पोहोचलेले आहे. मांगूर हिलमधील संक्रमणातून संसर्ग झालेले असे ५७ लोक आहेत, जे राज्याच्या इतर भागांतील आहेत. त्यात आरोग्य कर्मचारी, त्यांचे नातलग, कदंबचे कर्मचारी, टपाल खात्याचे कर्मचारी आदींचा समावेश आहे. सत्तरीतील शिरोली, मोर्ले आणि गुळेली याबरोबरच उसगाव, मडगाव, सांगे, काणकोण अशा ठिकठिकाणी कोरोनाबाधित सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे साहजिक आहे. आपल्या गावात हा संसर्ग पसरू नये म्हणून त्या भागातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे लॉकडाऊन पाळले ही सामाजिक जागृती प्रशंसनीय आहे. जनतेच्या अशा सहभागातूनच राज्यापुढील कोरोनाचे आव्हान थोडे सौम्य होऊ शकते.
खुद्द वास्कोच्या खारीवाडा, बोगदा, नवेवाडे, बायणा, ओरुले, मेस्तावाडो, शांतीनगर अशा जवळजवळ सर्व भागांमध्ये एव्हाना कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मात्र, सरकारने वास्को शहरात लॉकडाऊन करण्याचे कसोशीने टाळले आणि केवळ मांगूरच्या दोन प्रभागांपुरताच कंटेनमेंट झोन मर्यादित ठेवला. या मर्यादित कंटेनमेंट झोनमध्येही नागरिकांना किमान जीवनावश्यक सुविधा प्रशासनाला योग्य प्रकारे पुरविता आल्या नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. प्रशासनाकडून खरोखर काही त्रुटी राहिल्या असतील तर मांगूरवासीयांचा या अव्यवस्थेबाबतचा संताप समजण्यासारखा आहे, परंतु त्यांनी सरकारने दिलेला डाळ – तांदुळ गुरांना खाऊ घातला हे खेदजनक आहे. त्यांना दिली गेलेली ही आपत्कालीन मदत आहे आणि तेथे सरकारने उच्च प्रतीचा तांदुळच दिला पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांनी बाळगणेही योग्य म्हणता येत नाही.
आजपासून राज्यात पुन्हा होम क्वारंटाईनयुक्त जुना एसओपी लागू होत आहे. यामध्ये अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्यांचा सहभाग मोठा महत्त्वाचा असणार आहे. या एसओपीचे सारे यशापयश त्यांच्या देखरेखीवर अवलंबून असणार आहे. गोवा सार्वजनिक प्रशासन व ग्रामविकास संस्थेने (जीपार्ड) त्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शिका जारी केलेल्या आहेत, मात्र, त्यांचे प्रत्यक्ष जमिनीवर पालन या लोकप्रतिनिधींकडून झाले तरच त्याला अर्थ राहील. अन्यथा सामाजिक संक्रमणाच्या एका मोठ्या धोक्याच्या दिशेने हा एसओपी गोव्याला घेऊन जाऊ शकतो याचे स्मरण आम्ही पुन्हा एकवार करून देऊ इच्छितो.
सरकार यापुढे स्वतःहून केवळ कोरोनाची बाह्य लक्षणे दिसणार्यांच्याच चाचण्या करणार असल्याने आजवरची चाचण्यांची बाकी संपुष्टात आल्यानंतर रुग्णांची आकडेवारी स्वाभाविकतः येणार्या दिवसांत कमी कमी दिसत जाईल. कोविड इस्पितळात सरकारच्या व्याख्येनुसार सध्या केवळ २१ ‘रुग्ण’ आहेत. बाकी सगळ्या लक्षणविरहित व्यक्तींना राज्य सरकार यापुढे ‘रुग्ण’ मानणार नाही. त्यामुळे बाह्यतः जरी राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी यापुढे कमी दिसू लागली, तरी प्रत्यक्षातील सामाजिक संक्रमणाचा धोका मात्र वाढताच राहील हे लक्षात घेणे जरूरी आहे.
बाह्य लक्षणे न दिसणार्या रुग्णांपासून कोरोना संक्रमण होत नाही असा एक निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने काढल्याचे काही घटकांकडून छातीठोकपणे सांगितले गेले. त्यासाठी डब्ल्यूएचओच्या मारिया करखॉव्ह यांच्या पत्रकार परिषदेतील प्रतिपादनाचा दाखला दिला गेला. वास्तविक, पत्रकार परिषदेत एका पत्रकाराच्या प्रश्नावर त्या तसे बोलून गेल्या, परंतु नंतर त्यासंदर्भात मोठे वादळ उठले. लक्षणविरहित रुग्णांकडून कोरोनाचा प्रसार होत नसेल तर ‘मास्क’ का वापरायचे असा सवाल जगभरातून उपस्थित केला गेला. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेला २४ तासांच्या आत पुन्हा खास पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा लागला. लक्षणविरहित रुग्णांपासूनही कोरोनाचा सामाजिक संसर्ग होऊ शकतो या आपल्या आधीच्या भूमिकेपासून जागतिक आरोग्य संघटना मुळीच हटलेली नाही असे स्पष्टीकरण त्यात दिले गेले. काही वैद्यकीय संशोधनांतून, लक्षणविरहित रुग्णांमार्फत ४५ टक्के संसर्ग पसरू शकतो असेही निष्कर्ष आलेले असल्याचे त्यात सांगण्यात आले.
स्क्रीप्स रीसर्च ट्रान्झिशनल इन्स्टिट्यूटच्या ताज्या अहवालामध्ये तर लक्षणविरहित रुग्ण हे खरे तर कोरोनाचे ‘सायलंट सुपर स्प्रेडर्स’ असू शकतात असा निष्कर्ष अभ्यासाअंती काढलेला आहे. चौदा दिवसांपलीकडे हा संक्रमणाचा काळ राहू शकतो असेही त्यांचे म्हणणे आहे. म्हणजेच लक्षणविरहित रुग्ण विषाणूचे अजिबात संक्रमण करीत नाहीत या प्राथमिक स्वरूपातील संशोधनावर विसंबून गाफील राहणे आपल्यासाठीही अतिशय धोक्याचे ठरू शकते हाच याचा सरळ अर्थ आहे. लक्षणविरहित रुग्णांतून संसर्ग होत नसता तर आज जगभरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना पसरूच शकला नसता. त्यामुळे अशा अर्धवट माहितीवर जनतेनेही विसंबू नये आणि सरकारनेही.
एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची बाह्य लक्षणे न दिसणे याचा अर्थ अनेकदा ती कोरोना संसर्गाची प्राथमिक पातळी असू शकते व नंतरच्या काळात त्या व्यक्तीमध्ये तीव्र लक्षणे दिसून येऊ शकतात. वास्कोतील डॉक्टर आधी पॉझिटिव्ह निघाला, नंतर निगेटिव्ह निघाला व पुन्हा पॉझिटिव्ह झाला हे ताजे उदाहरण तर समोर आहेच. कोरोना हा असाच गनिमी काव्याने घाला घालत असतो, त्यामुळे त्याच्याविरुद्धची लढाईही तितक्याच निर्धाराने आणि ठामपणाने लढली गेली पाहिजे. तेथे तळ्यात मळ्यात उपयोगाचे नाही हाच या सार्याचा संदेश आहे. किमान जनतेने कोरोनाच्या विरोधात ठाम राहावे, जागरूक राहावे, तरच येणार्या काळात आपल्याला हे आव्हान पेलता येईल!