– अंजली आमोणकर
आयुष्याला तो नवेपणाचा सुवास, सुगंध परत मिळवून देणे, त्या नवेपणाच्या आनंदात आयुष्याला मनमुराद डुंबायची संधी देणे हा एकुलता एक पण अति महत्त्वाचा संकल्प आपण या वर्षी सोडू या. मग बघा आपल्याला एकमेकांबद्दल किती ओढ, किती आपुलकी जाणवेल. आयुष्याबद्दल किती ताजेपणा, उत्साह व आनंद वाटेल. आपल्या संस्कारांची, रीतिरिवाजांची, धर्माची किंमत कळेल.
धर्म कोणताही असो, पंथ कोणताही असो, संप्रदाय कोणताही असो- नवीन विचारांचे, नवीन संकल्पनांचे स्वागत हे सर्वांनीच आजपर्यंत मोठ्या उत्साहाने केले आहे. बघता बघता वर्ष संपतं. काळ बदलतो. एकेक वर्ष मागे पडून, नवीन आचार-विचारांचे नवीन वर्ष सुरू झालेले दिसते. परिवर्तन हा निसर्गनियम सर्वांनाच मान्य करावा लागतो. जुन्या घटनांना बुडवून आशेचे नवीन किरण सोबत घेऊन नवे वर्ष येते.
भारत शकांचा, मन्वंतरांचा तसेच इसवींचाही सन मोठ्या उत्साहाने साजरा करताना दिसतो. वर्षाचा प्रारंभ हा नेहमीच महत्त्वाचा असतो. मागील बर्यावाईट गोष्टी मागे सारून, नवनवीन संकल्प सोडणे, त्यांचा अवलंब करणे, निश्चित धोरण आखणे, सत्याची कास धरणे आणि नव्या जोमाने व उत्साहाने कामास लागणे यालाच नववर्षाचे स्वागत म्हणता येईल. जगात निसर्गाकडून माणसाला नेहमीच काही न काही शिकायला मिळत असतं. आपण उगवता व मावळता सूर्य अनेकदा पाहतो. तो मानवाला नेहमीच सांगत असतो की जसं सगळं ‘वाईट’ मागे टाकून, नव्या प्रसन्नतेने दर दिवशी उगवतो, तसेच तुम्हीही आयुष्यात असायला हवे. रात्र तुझी नाही. ती वैर्याची आहे. हा रात्रीचा अंधःकार, तुझ्या चैतन्याला, तेजाला गिळून टाकेल. तू या अंधःकारावर विजय मिळव. सतत क्षमाशील रहा. एकमेकांशी सख्य करून आपसातील कलह संपवून टाक. नवीन वर्षात सत्याची, श्रमाची, तेजाची कास धर. जसा नववर्षाच्या स्वागतदिनी प्रसन्न असशील तसाच वर्षभर निरभ्र अंतःकरणाने झळाळत रहा.
आता नवीन वर्ष आलं म्हणजे ओघानंच संकल्प करणंही आलंच की!! झडझडून उठून नवीन वर्षाचं वेळापत्रक आखण्याचं काम सुरू झालं. खरं तर केलेलं वेळापत्रक कधीही पाळलं जात नाही. पण दरवर्षी नवीन वेळापत्रक तयार करण्याचा उत्साहही कमी होत नाही. यावर्षी मात्र ‘जयबजरंगबली’ थाटात, हिरीरीनं नवीन संकल्प केले (जानेवारी संपता संपता ते मोडीतच निघतात खरं तर …). मित्रमैत्रीणी नातलगांना नव वर्षाच्या शुभेच्छांची पत्र पाठवून झालीत व लक्षात आले की सध्या ‘नवीन वर्ष सुखाचे जावो’ या शुभेच्छांची गरज आहे की ‘रोजचा दिवस नवा होऊन जावो’ची जास्त गरज आहे? आजमितीला लोकांजवळ शिक्षण आहे. जास्तीत जास्त पैसा कमावण्याची अक्कल आहे, भरपूर कष्ट करण्याची तयारी आहे, तयार साधनं, विज्ञान, भरभराट हाताशी आहे. तरीही जीवन इतकं असुरक्षित.., असमाधानी व भयभीत का? आपण जे कमावलंय त्या बदल्यात काय गमावलंय? व त्या गेल्यावर्षीपर्यंत त्या गमावल्याची किंमत किती? मग बारीक विचार केल्यावर लक्षात आलं की आपण मोठ्या समाधानाच्या बदल्यात लहान समाधान, मोठ्या आनंदाच्या बदल्यात लहान- लहान आनंद व मोठ्या श्रीमंतीच्या बदल्यात मनाची लहान श्रीमंतीच हरवून बसलोय. गेलेल्या वर्षांनी या गोष्टी खाऊन पचवूनदेखील टाकल्या आहेत. वडील गणपतीची मूर्ती आणायला निघाल्यावर, मुलांचे फुललेले चेहरे पाहिलेत तुम्ही?? हातात नवा आकाशकंदील घेतल्यावर पोरं प्रकाशाच्या आधी आनंदानं कसे उजळून जातात ते जाणवलंय तुम्हाला??? यत्तेचं नवं पुस्तक, नवी छत्री मिळाल्यावर पोरं कशी उड्या मारतात त्यावर लक्ष दिलंय का तुम्ही???? ‘नवं’ या शब्दातच ती जादू आहे. पोरांनाच कशाला मोठ्यांनादेखील वेडंपिसं करणारी, उत्साहानं भारून टाकणारी! ती जादूच – गेल्या कित्येक वर्षात आपण हरवून बसलोय. कारण एकीकडे आज प्रत्येक पैसा खर्च करताना, होणार्या खर्चाचा ‘हिशेब’ चेहर्यावर आपली कुंडली मांडू लागतो. सुतकी चेहरा करून आणलेल्या वस्तू पोरांवर कसली जादू करणार? त्या वस्तू बाजारातून मिळवून येताना गर्दी, किंमत, प्रतीक्षायादी या सर्व गोष्टी पार करून जग जिंकून आलेल्या सिकंदरच्या थाटात आपण येतो. या सर्वांतून ‘नवा’ शब्दाच्या जादूला, आपला प्रभाव दाखवायला जागा उरते कुठे? त्या ‘नव्या’ शब्दाची नशा चढवून घ्यायला आपल्यात त्राण तरी कुठे उरलेले असतात?
दुसरीकडे आय- व्यय, क्रय- विक्रय यांचे प्रमाण कमालीबाहेर व्यस्त झालंय. ही गरीब देशाचीच जनता आहे का, अशी शंका येत रहावी इतकी तूफान शॉपिंग करताना, जनता दिसते. बाजारात नवीन येणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला हवीच- अशी मानसिकता सध्याच्या युवा पिढीत तर दिसतेच पण प्रौढ पिढीही ती मानसिकता पुरवण्यात धन्य मानताना व तोच हव्यास आपणही बाळगताना दिसते. बाजारात येणारा प्रत्येक मॉडेल मग ते मोबाइलचे असो, गाड्या, टी.व्ही., फ्रीज, टू-व्हीलर, बूट, कपडे… कशाचंही असो… पटकन् विकत घेतलं जातं. जुनं गेलं भंगारात…. ही वृत्ती कमालीची वाढीस लागलेली दिसतेय.
गणपती आणणं, पाडव्याला गुढी उभारणं, दुसर्याला आपट्याची पानं वाटून विद्येची पूजा करणं, दिवाळीला पणत्या लावणं… याची लाज आताच्या पिढीला वाटू लागलेय. यात लोकांना पैशाचा व वेळेचा अपव्यय जाणवू लागला आहे. स्वतःच्या धर्माची लाज तर केव्हाच वाटू लागली आहे. असं असेल तर पैशाचा व वेळेचा चांगला व्यय कोणता? ब्यूटीपार्लरवर न चुकता पैसे खर्च करणं हा? व्हिडिओवर व थिएटरमध्ये आलेला प्रत्येक पिक्चर बघितले गेले नाहीत तर आजार्यागत होणे हा? निमित्त काढून दिवस-रात्र ड्रिंक पार्ट्या अरेंज करणं- त्यात मुली व महिलांनीही सर्रास पिणं, हा? ‘न्यू इयर’ला सबंध रात्र धांगडधिंग्यात ‘सेलिब्रेट’ करणं हा? ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’… म्हणताना अगदी चोरी केल्यागत कावरेबावरे होऊन इकडे-तिकडे चोरून बघितले जाते. गणपती विसर्जनाच्या वेळी सणसणीत आवाजात आरत्या म्हणायच्या ऐवजी तोंडावर रूमाल फिरवीत फिरवीत त्या एकदाच्या उरकून टाकल्या जातात. कसले कॉम्प्लेक्स, कसली फॅडं आपल्या हिंदू समाजात घुसली आहेत? अशा विचारांनी डोकं पार पोखरून जातं. तेव्हा एक संकल्प हा करुया की आपले सण लाज न मानता, मान उंच करून दणदणीतपणे सर्वांना साजरे करायला लावायचे. दणदणीतपणाचा अर्थ- गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत बेभानपणे झिंगझिंगझिंगाट नाचणं नव्हे; किंवा गटारी अमावस्या – गटारी अमावस्या करत त्या निमित्ताने पी- पी पिणं नव्हे, आनंद देणार्या, सच्चा- सात्विक-पवित्र गोष्टी जपायच्या; त्या आचरणात आणायच्या.
तसे अनेक संकल्प दरवर्षी सोडले जातात. डायरी लिहिणे, हिशेब लिहिणे, संबंधितांना वेळच्यावेळी फोन कॉल करणे, रोज व्यायामाला वेळ काढणे इ. इ. पण ज्या गतीने ते सोडले जातात, त्याच्या दुप्पट गतीने ते मोडले जातात.
आयुष्याच्या रोजच्या धकाधकीत पाच मिनिटंही स्वतःकरता काढायला मिळत नाहीत. मग स्वतःकरता वेळ देणारे संकल्प अमलात आणणे म्हणजे ‘तोबा – तोबा!’ रोज रोज तीच ती धावपळ. तीच ती दिनचर्या, त्याच काळज्या, तीच दगदग. लोकांचं आयुष्य नुसतं एकसुरी व कंटाळवाणं बनून गेलेलं आहे. त्यातला नवेपणा- ताजेपणा गोठून गेला आहे. आयुष्याला तो नवेपणाचा सुवास, सुगंध परत मिळवून देणे, त्या नवेपणाच्या आनंदात आयुष्याला मनमुराद डुंबायची संधी देणे हा एकुलता एक पण अति महत्त्वाचा संकल्प आपण या वर्षी सोडू या. मग बघा आपल्याला एकमेकांबद्दल किती ओढ, किती आपुलकी जाणवेल. आयुष्याबद्दल किती ताजेपणा – उत्साह व आनंद वाटेल. आपल्या संस्कारांची, रीतिरिवाजांची, धर्माची किंमत कळेल.
तसा नवीन वर्षाच्या संकल्पांना तोटा नाही. ते अगदी मंत्र्याच्या आश्वासनासारखे – ढिगांनी सोडता व मोडता येतात. ‘संकल्प’ हा शब्द दिसायला साधासुधा व भोळाभाबडा असला तरी त्याच्याठायी एक फार मोठी जादुई शक्ती आहे. सर्वांना एकत्र बांधून ठेवायची, मरगळलेल्यांना टवटवीत करण्याची, कंटाळलेल्यांना उत्साहित करण्याची, ती संधी आपण त्या येणार्या नव्या वर्षात घेऊन घडलेल्या सर्वच बर्या-वाईटमधून धडे शिकायला हवेत. नुसते शिकायला नकोत तर त्यानुसार आपली मतं आपली वागणूक बदलायला हवी. निर्भिडपणे सत्याची कास धरलेल्यांची पाठपुरवणी करायला हवी. या ना त्या क्षेत्रांत ज्यांनी देशाची मान उंचावली आहे त्यांच्याबद्दल अभिमान – कृतज्ञबुद्धी बाळगून त्यांना निर्विवाद आर्थिक स्थैर्य द्यायला हवे. आपला धर्म- देश चालीरीती – सणउत्सव, भाषा- संस्कृती याबद्दल काडीचीही आस्था- अभिमान न बाळगणार्यांना – वेचून बाहेर काढून समाजव्यवस्थेतून बाहेर काढायला हवं. केवळ स्वतःच्याच भोवती असलेलं कुरण हिरवंगार असून कसं चालेल? देशच हिरवागार व्हावा ह्यासाठी झटायला हवं. हे तूफान आलेले पूर … ज्यामध्ये बहुतांशी कचरा करणारा मानवच जबाबदार ठरतो… आपल्या डोळ्यात काहीच अंजन घालत नाहीयेत का? निवडणुकीनंतर राजकारण्यांनी सत्तेकरता दाखवलेला हव्यास, मतदारांना कसलेच फटके मारून गेला नाहीये का? ग्लोबलायझेशनच्या जगात, पाश्चात्त्य गोष्टींच्या किती आहारी जायचं व कुठे आपल्याच गोष्टींवर पाय रुतवून कणखरपणे उभं रहायचं हेपण नीट ठरवता आलं पाहिजे. कणखरपणे विंदा म्हणूनच गेलेत- ‘‘असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून अत्तर, रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…’’
बलात्काराच्या घडलेल्या घटनांनंतर आपण फक्त मेणबत्त्या घेऊन आणि आरोपींना एन्काउंटर करणार्यांना सुप्रीम कोर्टात खेचूनच जगणार का? धर्माच्या नावाखाली, दहशतवादी हल्ले सोसतच राहणार का? नाही, निदान एवढा संकल्प तरी सोडूया की येणार्या वर्षात् असं काहीएक सोसलं जाणार नाही. स्वतःत विरोध करायची, आवाज उठवायची हिंमत नसेल, तर निदान जी माणसं असे दंड थोपटून अन्यायाला सामोरं जाण्याचं धैर्य दाखवत आहेत त्यांच्या पाठीशी तरी समर्थपणे उभं राहूया. ज्येष्ठ कवियित्री कै. शांताबाई शेळक्यांची एक कविता मला इथे आठवते……
‘‘कुठले पुस्तक, कुठला लेखक
लिपी कोणती कसले भाकित
हात एक अदृश्य उलटतो
पानामागून पाने अविरत
गतसालाचे स्मरण जागत
दाटून येते मनामध्ये भय
पान हे नवे, यात तरी का
असेल काही प्रसन्न आशय
स्वतः स्वतःला देत दिलासा
पुसते डोळे हंसता हंसता
उभी इथे मी पसरून बाहू
नवीन वर्षा तुझ्या स्वागता…
………………………….