योग साधक संकटकाळात धैर्य सोडत नाही. कोरोनाच्या सावटाखाली सुद्धा जगभरातील लोकांनी ‘माय लाइफ, माय योगा’ या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेत सहभाग घेतला. यावर्षीचा योग दिन हा घरातच साजरा होत असल्याने कुटुंबातील स्नेहभाव त्यामुळे वाढीस लागणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशाला संबोधित करताना ते बोलत होते. यावर्षी कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन सरकारने योग दिनाचे कुठलेही सामूहिक कार्यक्रम केले नाहीत. परंतु ‘घरी योग, कुटुंबासमवेत योग’ अशी थीम यावर्षीची होती.
एकाचवेळी घरातील कुटुंब योग साधनेत जोडले गेल्यास घरात ऊर्जेचा संचार होतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यामुळेच कौटुंबिक प्रेम वाढविण्यासाठीच हा दिवस महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांती गीतेतील अनेक श्लोक बोलून दाखविले. भगवान श्रीकृष्णाने योगाची व्याख्या केलेली आहे, ‘योग: कर्मसु कौशलम्’, म्हणजेच कर्माची कुशलता हा योग आहे. ‘युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्ना-व-बोधस्य, योगो भवति दु:खहा॥ हा श्लोक त्यांनी सांगितला.
आपल्या जीवनातल्या योग्य सवयी, खाणे, पिणे, खेळणे, बागडणे, झोपणे, जागे होणे, आपले कार्य, कर्तव्य योग्य प्रकारे करणे म्हणजेच योग असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंदांचा उल्लेख करताना सतत एकांतात देखील क्रियाशील राहणारी व्यक्ती आदर्श असते, ती व्यक्ती व्यग्र काळातही शांतीचा आनंद अनुभवते, असे ते म्हणाले.