कोरोना विषाणूंमुळे संपूर्ण क्रीडाविश्व हादरलेले असतानाच राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने आपली ऑलिपिंक तयारी सुरूच ठेवली आहे. असोसिएशनने तुघलकाबाद येथील डॉ. कर्णी सिंग रेंजवर नेमबाजांसाठी चाचणीचे आयोजन केले होते. ऑलिंपिकसाठी किमान पात्रता गुण मिळविलेले खेळाडूसुद्धा या चाचणीचा भाग होते. पुरुष व महिलांचा समावेश असलेल्या १० एअर रायफल नेमबाजांमध्ये श्रेया अगरवाल ६३१.२ गुणांसह पहिल्या स्थानी राहिली. केवळ ०.१ गुण कमी मिळवून दीपक कुमारने दुसरा क्रमांक मिळविला. मागील मोसमात विश्वचषक स्पर्धांमध्ये दोन सुवर्णपदके जिंकलेल्या अपूर्वी चंडेला हिला आपला नैसर्गिक खेळ दाखवता आला नाही. तिला केवळ ६२४.४ गुण मिळवता आले. महिलांच्या २५ मीटर स्पोटर्स पिस्तोल विभागात आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती राही सरनोबत हिने ५८३ गुणांचा वेध घेतला. यानंतर चिंकी यादव व मनू भाकरने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक आपल्या नावे केला. अंतिम फेरी न घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून पात्रता फेरीतील कामगिरीच्या आधारे ऑलिम्पिकसाठी अंतिम खेळाडूंबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात कायनन चेनाय व पृथ्वीराज तोंडायमन ७१ गुण घेऊन संयुक्त आघाडीवर आहेत. माजी विश्वविजेता मानवजीत सिंग संधूचे ६६ गुण झाले आहेत. तीन फेर्यांअंती ही स्थिती असून उर्वरित दोन फेर्या आज होणार आहेत. स्कीट प्रकारात अंगद वीर सिंग बाजवाचे ७४ गुण आहेत. गुरज्योत सिंगपेक्षा त्याचा एक गुण अधिक आहे. ऑलिंपिकपटू मैराज अहमद खान ७१ गुणांवर आहे. महिलांमध्ये ट्रॅप व स्कीट प्रकारात अनुक्रमे श्रेयसी सिंग व दर्शना राठोड प्रथम स्थान आहे.