यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रेला दिलेल्या राज्य उत्सवाच्या दर्जाला देवस्थानच्या रविवारी झालेल्या महाजनांच्या आमसभेत विरोध करण्यात आला. बैठकीस उपस्थित असलेल्या महाजनांनी हा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगताना आपला विरोध दर्शवला. श्री लईराई देवस्थानचे नूतन अध्यक्ष दीनानाथ गावकर व समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या महाजनांच्या आमसभेत एकूण 82 महाजन उपस्थित होते. यावेळी देवस्थान नूतन समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर, भास्कर गावकर, अतिश गावकर, दयानंद गावकर, वासु गावकर, महादेव गावकर, प्रकाश गावकर, सुभाष गावकर व इतर महाजन उपस्थित होते. या संदर्भात माहिती देताना देवस्थान देवस्थानचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी सांगितले की, श्री लईराई देवस्थान हे महाजनी देवस्थान असल्याने कोणताही निर्णय घेताना महाजनांच्या सभेत त्याला मान्यता घेणे बंधनकारक आहे, त्या दृष्टीने आपण देवस्थान समितीचा ताबा घेतल्यानंतर रविवारी देवस्थान सभागृहात देवस्थानांच्या महाजनांची महत्त्वपूर्ण सभा झाली व या बैठकीत सुरुवातीलाच देवीच्या जत्रोत्सवाला राज्य उत्सव दर्जा देण्यास महाजनांनी विरोध केला. राज्य सरकार लईराई देवस्थानच्या जत्रेला सर्व प्रकारचे सहकार्य करते. कायदा-सुव्यवस्था व इतर पायाभूत व मूलभूत सुविधा पुरवताना त्यांचे सहकार्य असते. यापुढेही त्यांनी अशाच प्रकारे आपले सहकार्य चालू ठेवावे, असेही दीनानाथ गावकर यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात लईराई देवस्थानच्या जत्रोत्सवाला राज्य उत्सव म्हणून दर्जा देताना या ठिकाणी अनेक सुविधा पुरवणार असल्याची घोषणा केली होती.