श्रीलंकेने केला विजय बहाल

0
211

>> दुसर्‍या कसोटीत इंग्लंड ६ गड्यांनी विजयी

>> मालिका २-० अशी जिंकली

दुसर्‍या डावात खराब फलंदाजी करून यजमान श्रीलंकेने इंग्लंडला दुसर्‍या कसोटीत विजय बहाल केला. तिसर्‍या दिवसअखेरपर्यंत रंगतदार वाटणार हा सामना चौथ्या दिवशीच निकाली निघाला. पहिल्या डावात ३७ धावांची आघाडी घेतलेल्या श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या १२६ धावांत संपला. इंग्लंडने १६४ धावांचे विजयी लक्ष्य ४३.३ षटकांत केवळ ४ गडी गमावून गाठत मालिका २-० अशी खिशात घातली.

तिसर्‍या दिवसाच्या ९ बाद ३३९ धावांवरून पुढे खेळताना काल इंग्लंडचा पहिला डाव ३४४ धावांत आटोपला. श्रीलंकेने पहिल्या डावात ३८१ धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडचा संघ ३७ धावांनी पिछाडीवर पडला. श्रीलंकेकडून दुसर्‍या डावात किमान २०० धावा अपेक्षित होत्या. परंतु, इंग्लंडच्या फिरकी आक्रमणासमोर त्यांनी शरणागती पत्करली. एकवेळ त्यांची ८ बाद ७८ अशी केविलवाणी स्थिती झाली होती. गोलंदाज लसिथ एम्बुलदेनिया याने सुरंगा लकमलसह नवव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केल्याने लंकेला शतकी वेस ओलांडता आली.
इंग्लंडकडून डावखुरा फिरकीपटू जॅक लिच याने ५९ धावांत ४, ऑफस्पिनर डॉम बेस याने ४९ धावांत ४ तर कर्णधार ज्यो रुटने एकही धाव न देता २ बळी घेतले. माफक धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडची ४ बाद ८९ अशी स्थिती झाली होती. पण सलामीवीर डॉम सिबली याने ५६ धावांची समयोचित खेळी करत जोस बटलर (४६) याच्यासह अविभक्त भागीदारी रचत संघाला विजयी केले.

धावफलक
श्रीलंका पहिला डाव ः सर्वबाद ३८१
इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद ३४४
श्रीलंका दुसरा डाव ः कुशल परेरा पायचीत गो. लिच १४, लाहिरु थिरिमाने झे. क्रावली गो. लिच १३, ओशादा फर्नांडो झे. क्रावली गो. बेस ३, अँजेलो मॅथ्यूज त्रि. गो. बेस ५, दिनेश चंदीमल झे. अँडरसन गो. लिच ९, निरोशन डिकवेला झे. लॉरेन्स गो. बेस ७, रमेश मेंडीस झे. बटलर गो. लिच १६, दिलरुवान परेरा झे. क्रावली गो. बेस ४, सुरंगा लकमल नाबाद ११, लसिथ एम्बुलदेनिया झे. बॅअरस्टोव गो. रुट ४०, असिथा फर्नांडो त्रि. गो. रुट ०, अवांतर ४, एकूण ३५.५ षटकांत सर्वबाद १२६
गोलंदाजी ः जेम्स अँडरसन २-०-६-०, सॅम करन २-०-९-०, डॉम बेस १६-१-४९-४, जॅक लिच १४-१-५९-४, ज्यो रुट १.५-१-०-२
इंग्लंड दुसरा डाव ः झॅक क्रावली झे. ओशादा गो. एम्बुलदेनिया १३, डॉम सिबली नाबाद ५६, जॉनी बॅअरस्टोव पायचीत गो. एम्बुलदेनिया २९, ज्यो रुट त्रि. गो. रमेश ११, डॅन लॉरेन्स झे. डिकवेला गो. एम्बुलदेनिया २, जोस बटलर नाबाद ४६, अवांतर ७, एकूण ४३.३ षटकांत ४ बाद १६४
गोलंदाजी ः लसिथ एम्बुलदेनिया २०-३-७३-३, दिलरुवान परेरा १३.३-१-३९-०, रमेश मेंडीस १०-०-४८-१