श्रीलंकेत आंदोलकांचा पंतप्रधान कार्यालयावर कब्जा

0
13

>> राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे देशातून पलायन

श्रीलंकेत परिस्थिती आणखी बिघडली असून काल आंदोलकांनी पंतप्रधान कार्यालयावर कब्जा केला. यावेळी सुरक्षा दलांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता ३० आंदोलक जखमी झाले आहेत. तर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडून पलायन केले असून श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची हंगामी राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर विक्रमसिंघे यांनी, आंदोलकांना सामोरे जाण्यासाठी लष्कर आणि पोलिसांना पूर्ण सवलत दिली असून देशातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी देशातील सुरक्षा यंत्रणांनी जे काही शक्य आहे ते करावे, असा आदेश दिला आहे.

दरम्यान, शनिवारी आंदोलकांनी, राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती सचिवालय आणि पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान, टेम्पल ट्रीज या राजधानीतील तीन मुख्य इमारतींवर मिळवलेला ताबा अजून सोडलेला नाही.

राष्ट्रपती राजपक्षे यांचे पलायन
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेतून पलायन केले असल्याचा दावा श्रीलंकेतील एका स्थानिक मीडियाने केला आहे. राजपक्षे ५ जुलैपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रपती राजपक्षे मालदीवला रवाना झाल्याच्या वृत्तालाही मीडियाने दुजोरा दिला आहे.

मीडियाच्या दाव्यानुसार राष्ट्रपती राजपक्षे यांनी काल पहाटे लष्करी विमानातून देशातून उड्डाण केले. श्रीलंकेतील निदर्शनांमुळे राष्ट्रपती राजपक्षे यांना अटक होण्याची भीती होती. अशा परिस्थितीत ते राष्ट्रपती म्हणून देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते. कारण राजपक्षे यांना राष्ट्रपती म्हणून अटकेतून सूट देण्यात आली आहे. त्यामुळेच अटक होण्याची शक्यता टाळण्यासाठी त्यांनी पद सोडण्यापूर्वी परदेशात पलायन केले असल्याची शक्यता आहे. राष्ट्रपतीपदाचा राजपक्षे हे काल बुधवारी राजीनामा देणार होते.

मालदीवमध्ये आश्रय
श्रीलंकेतील मीडिया वृत्तानुसार राष्ट्रपती राजपक्षे बुधवारी पहाटे लष्कराच्या विमानातून मालदीवला रवाना झाले आहेत. विमानात गोटाबाया राजपक्षे, त्यांची पत्नी आणि एक अंगरक्षक होते असे म्हटले जात आहे.