युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते रानिल विक्रमसिंघे यांनी काल श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. श्रीलंकेच्या २२५ सदस्यांच्या संसदेत रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे केवळ एकच जागा आहे, तरीही ते पंतप्रधान बनले आहेत.
भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. आर्थिक संकटाला सत्ताधारी राजपक्षे परिवार जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्यासाठी ३१ मार्चपासून श्रीलंकेत आंदोलनाला सुरुवात झाली. अखेर सोमवारी महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेत निर्माण झालेल्या परिस्थितीवर सर्वपक्षीय सरकारच्या स्थापनेचे आश्वासन विरोधी पक्षांना दिले होते. सर्वपक्षीय सरकारचा नेता कोण होणार याबाबत गोतबाया राजपक्षे यांनी अनेकांशी चर्चा केली. मात्र, पंतप्रधानपदावर एकमत होत नव्हते. अखेर गोतबाया राजपक्षे यांनी ज्येष्ठ नेते रानिल विक्रमसिंघे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली आणि त्यानंतर ते पंतप्रधान होण्यास तयार झाले. गुरुवारी सायंकाळी त्यांनी पतंप्रधानपदाची शपथ घेतली.
रानिल विक्रमसिंघे यांचा २२५ सदस्यांच्या संसदेत केवळ एक खासदार आहे. रानिल विक्रमसिंघे यांनी यापूर्वी पाचवेळा पंतप्रधानपद भूषवले आहे. विक्रमसिंघे यांचे वय ७३ वर्ष असून, ते यूएनपी पार्टीचे प्रमुख आहेत.
श्रीलंका आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सध्या निर्माण झालेले राजकीय संट आणि हिंसाचार आटोक्यात आणून देशाला पुन्हा उभे करण्याचे आव्हान रानिल विक्रमसिंघे यांच्यासमोर आहे.