श्रीलंकेची भूमी भारताविरोधात वापरू देणार नाही : दिसानायके

0
4

श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यावर भारतात आले आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. आपल्या देशाची भूमी भारताविरुद्ध वापरू देणार नाही, असे आश्वासन दिसानायके यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना दिले.

श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी सोमवारी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे गार्ड ऑफ ऑनरने स्वागत करण्यात आले. राष्ट्रपती झाल्यानंतर दिसानायके यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. 17 डिसेंबरपर्यंत ते भारताच्या दौऱ्यावर आहेत.

राष्ट्रपती म्हणून पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेले दिसानायके यांनी सोमवारी सांगितले की, श्रीलंका भारताच्या मदतीने पुढे जाईल आणि शेजारी देशाला आपला पाठिंबा देत राहील. सुमारे 2 वर्षांपूर्वी आम्ही मोठ्या आर्थिक संकटाचा सामना केला होता. त्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी भारताने आम्हाला खूप मदत केली. भारताच्या परराष्ट्र धोरणात श्रीलंकेचे महत्त्वाचे स्थान असल्याचे पंतप्रधान मोदींनी मला सांगितले आहे.

त्याचवेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, राष्ट्रपती झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली याचा मला आनंद आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होत आहे. आम्ही आपल्या भागीदारीसाठी भविष्यवादी दृष्टीकोन स्वीकारला आहे.