>> न्यूझीलंडकडून ऐजाझ पटेलचा प्रभावी मारा
श्रीलंका व न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना दुसर्या दिवसअखेर समान स्थितीत येऊन पोहोचला आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील २४९ धावांना उत्तर देताना यजमानांनी ७ बाद २२२ धावांपर्यंत मजल मारली आहे.
पहिल्या दिवसाच्या ५ बाद २०३ धावांवरून काल पुढे खेळताना न्यूझीलंडला अडीचशेपार जाता आले नाही. शतकाकडे वाटचाल करत असलेल्या टेलरने निराशा केली. फिरकीपटू प्रभावी ठरण्याची अपेक्षा असताना किवी डावातील उर्वरित पाच पैकी चार गडी मध्यमगती गोलंदाज सुरंगा लकमल याने बाद केले. टिम साऊथी धावबाद झाला.
धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने चांगली सुरुवात केली होती. २ बाद १४२ अशी भक्कम मजल मारून त्यांचा संघ विशाल धावसंख्येकडे आगेकूच करत होता. परंतु, कुशल मेंडीस अर्धशतकानंतर परतताच लंकेचा डाव कोलमडला. २ बाद १४२ वरून त्यांची ७ बाद १६१ अशी केविलवाणी स्थिती झाली. यष्टिरक्षक फलंदाज निरोशन डिकवेला याने यानंतर सुरंगा लकमल याला हाताशी धरून डाव सावरताना आठव्या गड्यासाठी ६६ धावांची अविभक्त भागीदारी केली. आपल्या नैसर्गिक आक्रमक शैलीला मुरड घालताना त्याने केवळ एक चौकार ठोकताना एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला. न्यूझीलंडकडून ऐजाझ पटेल याने आपल्या कारकिर्दीत दुसर्यांदा डावात पाच बळी घेतले. श्रीलंकेचा संघ केवळ २२ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे ३ गडी शिल्लक आहेत. सामन्याचे अजून तीन दिवस बाकी असल्याने दुसर्या डावातील धावा निर्णायक ठरणार आहेत.
धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव ः ५ बाद २०३ वरून ः रॉस टेलर झे. डिकवेला गो. लकमल ८६, मिचेल सेंटनर पायचीत गो. लकमल १३, टिम साऊथी धावबाद १४, विल्यम सॉमरविल नाबाद ९, ट्रेंट बोल्ट झे. परेरा गो. लकमल १८, ऐजाझ पटेल पायचीत गो. लकमल ०, अवांतर ३, एकूण ८३.२ षटकांत सर्वबाद २४९
गोलंदाजी ः सुरंगा लकमल १५.२-५-२९-४, लाहिरु कुमारा १०-१-३७-०, अकिला धनंजया ३०-३-८०-५, धनंजय डीसिल्वा ६-०-२०-०, लसिथ एम्बुलदेनिया २२-१-८१-०
श्रीलंका पहिला डाव ः दिमुथ करुणारत्ने पायचीत गो. पटेल ३९, लाहिरु थिरिमाने यष्टिचीत वॉटलिंग गो. पटेल १०, कुशल मेंडीस झे. टेलर गो. पटेल ५३, अँजेलो मॅथ्यूज झे. टेलर गो. पटेल ५०, कुशल परेरा झे. सेंटनर गो. बोल्ट १, धनंजय डीसिल्वा झे. व गो. पटेल ५, निरोशन डिकवेला नाबाद ३९, अकिला धनंजया झे. टेलर गो. सॉमरविल ०, सुरंगा लकमल नाबाद २८, अवांतर २, एकूण ८० षटकांत ७ बाद २२७
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट १३-३-२४-१, टिम साऊथी ७-३-१७-०, विल्यम सॉमरविल २०-२-७८-१, ऐजाझ पटेल २९-६-७६-५, मिचेल सेंटनर ११-०-३१-०