श्रीलंका संघात मॅथ्यूजचे पुनरागमन

0
118

>> भारताविरुद्धची टी-ट्वेंटी मालिका

भारताविरुद्ध ५ जानेवारीपासून खेळविल्या जाणार्‍या टी-ट्वेंटी मालिकेसाठी श्रीलंकेने अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज याला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे जवळपास १६ महिन्यांनंतर मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामना खेळताना दिसणार आहे.

२०१८ साली ऑगस्ट महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने आपला शेवटचा टी-ट्वेंटी सामना खेळला होता. सातत्याच्या दुखापतींमुळे अष्टपैलू मॅथ्यूजला श्रीलंकेच्या कसोटी, वनडे किंवा टी-ट्वेंटी संघाचा कधीच नियमित सदस्य बनता आलेले नाही. मागील कॅलेंडर वर्षात मॅथ्यूजने गोलंदाजीला रामराम ठोकून तज्ज्ञ फलंदाज म्हणून खेळणे पसंत केले होते. त्यामुळे श्रीलंका संघात तो नेहमीपेक्षा जास्तवेळा दिसला होता. टी-ट्वेंटीसाठी निवडलेल्या संघातील सात स्पेशलिस्ट फलंदाजांमध्ये मॅथ्यूजचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोव्हेंबरमध्ये झालेली टी-ट्‌ेंटी मालिका खेळलेला वेगवान गोलंदाज नुवान प्रदीप याला दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले आहे. त्याची जागा कासुन रजिता याने घेतली आहे. अष्टपैलू शेहान जयसूर्या याला संघात स्थान मिळालेले नसून त्याची जागी धनंजया डीसिल्वाने घेतली आहे.

श्रीलंका टी-ट्वेंटी संघ ः लसिथ मलिंगा (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, अविष्का फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनका, कुशल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डीसिल्वा, इसुरु उदाना, भनुका राजपक्षा, ओशादा फर्नांडो, वानिंदू हसारंगा, लाहिरु कुमारा, कुशल मेंडीस, लक्षन संदाकन व कासुन रजिता.