निदाहास चषक तिरंगी टी-२० क्रिकेट मालिकेत आज यजमान श्रीलंका आणि बांगलादेश यांच्या महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी दोघांनाही विजय अत्यावश्यक असून त्यांच्यासाठी ही लढत म्हणजे ‘जिंकू किंवा मरू’ अशीच असेल. भारतीय संघाने यापूर्वीच रविवारी होणार्या अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केलेले आहे.
या सामन्यात बांगलादेशसाठी जमेची बाजू म्हणजे त्यांचा नियमित कर्णधार तथा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणारा आहे. कर्णधार शाकिब या मालिकेतील बांगलादेशच्या पहिल्या तिन्ही सामन्यात खेळू शकला नव्हता. परंतु बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पुष्टी दिलीय की आजच्या महत्त्वपूर्ण सामन्यात तो पुनरागमन करेल. त्यामुळे बांगलादेशसाठी ही एक मनोबल वाढविणारी बाब असेल. शाकिबच्या परतण्याने संघाला फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत मजबुती मिळेल.
याच मैदानावर झालेल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेवर विक्रमी विजय मिळविला होता. लंकेकडून मिळालेले २१५ धावांचे लक्ष्य बांगलादेशने मुश्फिकुर रहिमच्या दमदार खेळीमुळे गाठले होते. सलामीवीर तमिम इक्बाल आणि कर्णधार महमुद्दुलाह तसेच सौम्य सरकार यांच्यावरही संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्याची जबाबदारी असेल.
गोलंदाजीच्या विभागात मुस्तफिझुर रेहमान, रुबेल हुसैन यांना लंकेच्या फलंदाजांना रोखण्याची कामगिरी पार पाडावी लागेल.
दुसर्या बाजूने लंकेचा विचार केल्यास कुशल मेंडिस, कुशल परेरा आणि दिनेश चांदिमल यांच्यावर लंकेच्या फलंदाजीची जबाबदारी असेल. तर गोलंदाटजीत फिरकीपटू अकिला धनंजयने प्रभावित केलेले असून आजही त्याच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा कर्णधाराला असेल.
संभाव्य संघ ः बांगलादेश : शाकिब अल हसन (कर्णधार), महामूदुल्लाह, तमीम इक्बाल, सौम्य सरकार, इमरुल कायेस, मुश्फीकुर रहीम, सब्बीर रहमान, मुस्तफीझुर रहमान, रुबेल हुसैन, तस्किन अहमद, अबू हैदर, अबू जायेद अरिफुल हक, नजमुल इस्लाम, नुरुल हसन, मेहदी हसन आणि लिटन दास.
श्रीलंका : शाकिब अल हसन (कर्णधार) दिनेश चांडीमल, कुशल मेंडिस, उपुल थारंगा, कुशल परेरा, अकिला धनंजय, धनंजय डीसिल्वा, दानुष्का गुणतिलका, जीवन मेंडिस, थिसारा परेरा, दासुन शनाका, इसुरु उदाना, सुरंगा लकमल, अमिला आपोंसो, दुश्मंता चमीरा, नुवान प्रदीप.