न्यूझीलंड व श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून गॉल येथे सुरुवात होणार आहे. मालिका २-० अशी जिंकल्यास कसोटी क्रिकेटच्या इतिहासात त्यांचा संघ प्रथमच कसोटीत अव्वल होणार आहे. श्रीलंकेचा संघ तुलनेने कमकुवत असला तरी मायदेशात खेळण्याचा फायदा त्यांना नक्की मिळणार आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असल्याने या मालिकेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
श्रीलंकेचा संघ सध्या संक्रमणाच्या प्रक्रियेतून जात आहे. सलामीवीर व कर्णधार दिमुथ करुणारत्नेचा अपवाद वगळता संघातील एकाही खेळाडूची संघातील जागा निश्चित नाही. त्यामुळे मायदेशातील चिरपरिचित खेळपट्ट्यांवर प्रभावी कामगिरी करत संघातील जागा मजबूत करण्याचा संघातील इतरांचा प्रयत्न असेल. दीर्घ कालावधीनंतर दिनेश चंदीमलचे संघात पुनरागमन झाले आहे. कसोटी क्रिकेटसाठी पुरक शैली त्याच्याकडे आहे. दुखापतींमुळे सातत्याने संघाच्या आत-बाहेर जात असलेला अँजेलो मॅथ्यूज हा अजून एक अनुभवी खेळाडू संघात असल्याने या दुकलीला मधल्या फळीत जबाबदारीने खेळ दाखवावा लागेल. खेळपट्टीचे फिरकी स्वरुप पाहता लंकेचा संघ चार स्पेशलिस्ट फिरकीपटूंसह उतरण्याची तयारी करत आहे. परंतु, नाणेफेकीचा कौल गमावल्यास कसोटीच्या पहिल्याच दिवशी केवळ एका स्पेशलिस्ट जलदगती गोलंदाजासह खेळणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे सर्व बाबी ओळखूनच त्यांना संघाच्या रचनेबाबत निर्णय घ्यावा लागेल.
दुसरीकडे न्यूझीलंड संघाची फलंदाजी मजबूत आहे. केन विल्यमसन, रॉस टेलर हे उपखंडातील खेळपट्ट्यांवर खेळण्यात हातखंडा असलेले खेळाडू त्यांच्या संघात आहे. भारतीय वंशाचा सलामीवीर जीत रावलच्या रुपात भक्कम तंत्र असलेला खेळाडू त्यांना लाभला आहे. त्यामुळे फलंदाजी विभागात त्यांना सध्यातरी चिंता करण्याचे कारण नाही. गोलंदाजांची निवड मात्र त्यांनी सावधरित्या करावी लागेल. मिचेल सेंटनर व ऐजाझ पटेलच्या रुपात दोन डावखुरे फिरकीपटू खेळवायचे की अननुभवी पटेलला बाहेर बसवून लेगस्पिनर टॉड ऍस्टलला संधी द्यायची, हा कठीण निर्णय त्यांना घ्यावा लागेल.
श्रीलंका संभाव्य ः दिमुथ करुणारत्ने, लाहिरु थिरिमाने, कुशल मेंडीस, दिनेश चंदीमल, अँजेलो मॅथ्यूज, कुशल परेरा, धनंजय डीसिल्वा, लसिथ एम्बुलदेनिया, अकिला धनंजया, लक्षन संदाकन व सुरंगा लकमल.
न्यूझीलंड संभाव्य ः जीत रावल, टॉम लेथम, केन विल्यमसन, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॉटलिंग, मिचेल सेंटनर, ऐजाझ पटेल, विल सोमरविल, ट्रेंट बोल्ट व टिम साऊथी.