श्रीराम प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या सज्ज

0
18

>> 10 लाख दिव्यांनी अयोध्या लखलखणार

देशात उत्साही व आनंदी वातावरण, कडेकोट सुरक्षा व्यवस्था

आज सोमवारी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. अयोध्यानगरीत प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी येथील राममंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे. रामलला प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी प्रत्येक रामभक्त आतूर आहे. या ऐतिहासिक क्षणाचा अवघा देश साक्षीदार होणार असून यावेळी अयोध्येमध्ये खास दीपोत्सवही होणार आहे. या दीपोत्सवात 10 लाख पणत्या प्रज्वलित करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रभू श्रीरामाची नगरी अयोध्या लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघणार आहे.

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. अयोध्येतील या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 7 हजार 140 निमंत्रक हजेरी लावणार आहेत. शिवाय 112 परदेशी पाहुणेही या भव्य सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

10 लाख रामज्योती
राम मंदिरात आज रामललाचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अभिषेक सोहळ्यानंतर संध्याकाळी अयोध्यानगरी दिव्यांनी सजवली जाईल. यावेळी अयोध्येत 10 लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर आज संध्याकाळी सरयू नदीच्या काठावर मातीपासून बनवलेल्या दिव्यांनी अयोध्या उजळून निघणार आहे. याशिवाय, अयोध्येतील घर, दुकाने, आस्थापने आणि पौराणिक स्थळांवर ‘रामज्योती’ प्रज्वलित करण्यात येणार आहे.
रामनगरी अयोध्येत 150 चार्टर्ड विमान उतरणार आहेत. येथे जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विनानिमंत्रण कुणालाही अयोध्येत परवानगी नाही. याशिवाय अयोध्येवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांना राममंदिर ट्रस्टतर्फे भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त
अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. आज सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12.29 मिनिटांच्या मुहूर्तावर हा प्राणप्रतिष्ठापनेचा विधी करण्यात येईल. अवघ्या 32 सेकंदाचा मुहूर्त या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आला आहे. तसेच मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 84 सेकंदांचा मुहूर्त असणार आहे.

असे असतील विधी
रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होण्याआधी रविवार 21 जानेवारी रोजी यज्ञविधी, विशेष पूजा आणि हवन करण्यात आले. तसेच 125 कलशांसह रामललाला दिव्य स्नान घालण्यात आले. त्यानंतर आज 22 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. मंगल ध्वनी, सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील. 11 वा. पाहुणे येतील. सकाळी 11.30 ते 12.30 वा. गर्भगृहात पूजा दुपारी 12.30 प्रमुख पाहुण्यांचे भाषण, दुपारी 2 ते 7 वाजेपर्यंत पाहुण्यांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. दुपारी 2:15 वा. पंतप्रधान मोदी कुबेर तीलावरील शिव मंदिरात पूजा करतील.

रामसेतूवर मोदींनी केली पूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राम मंदिराच्या अभिषेकाच्या एक दिवस आधी जिथे राम सेतू बांधण्यात आला होता त्या ठिकाणी भेट दिली. त्यांनी या ठिकाणी फुले वाहून पूजादेखील केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी धनुषकोडी येथील श्री कोठंडारामस्वामी मंदिराला भेट देत अभिषेक केला होता. यानंतर त्यांनी मंदिरात पूजा देखील केली. यानंतर काल त्यांनी अरिचल मुनई येथे भेट देत जिथे रामसेतू बांधला गेला होता त्या ठिकाणी जात पूजा केली. या ठिकाणी मोठी यांनी फुले देखील वाहिली. दरम्यान, पंतप्रधान मोदी प्राणप्रतिष्ठेसाठी आज 22 जानेवारीलाच अयोध्येत येणार आहेत. ते येथे चार तास थांबतील. यापूर्वी 21 जानेवारीला ते अयोध्येत येणार असल्याची चर्चा होती.

आज राज्यात सुट्टी

अयोध्या येथील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आज सोमवारी (22 जानेवारी) रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी मोदी सरकारने जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे गोवा सरकारनेही आज राज्यात सुट्टी जाहीर केली आहे. राज्य सरकारने अधिकृत परिपत्रक काढून ही सुट्टी जाहीर केली आहे. गोव्यासह
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगड येथील राज्यसरकारनेही आज 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्ह्यात 10 हजार सीसीटीव्ही
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही असेल. सुमारे 10,000 सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यावेळी पोलीस यंत्रणेत मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून सर्वत्र नजर ठेवली जात आहे.

अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येला अभेद्य किल्ला बनवण्यात आले आहे. प्रत्येक कोपऱ्यावर फौजफाटा तैनात आहे. एके-47 मशीनगनसह कमांडो तैनात आहेत. हेलिकॉप्टरमधून देखरेख केली जात आहे. रस्त्यावर सर्वत्र कमांडो आणि सायरन असलेली वाहने दिसत आहेत. सीमा सील करण्यात आल्या आहेत. आता ज्यांच्याकडे प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण आणि पास असेल त्यांनाच अयोध्येत प्रवेश करता येईल. विमानतळापासून राम मंदिरापर्यंतच्या सर्व उंच इमारतींमध्ये स्नायपर तैनात करण्यात आले आहेत.

अगदी शरयूमध्ये जाणाऱ्या बोटींवरही. मंदिराच्या आजूबाजूच्या घरांमध्ये पोहोचलेल्या पाहुण्यांची यादीही तपासण्यात आली आहे. अयोध्येत 25 हजारांहून अधिक जवान तैनात आहेत. 31 आयपीएस अधिकारी कर्तव्यावर आहेत. प्रत्येक व्यक्तीवर 10 हजार सीसीटीव्ही आणि एआयने नजर ठेवली जात आहे. याशिवाय ड्रोनविरोधी यंत्रणा बसवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणा सक्रिय असून साध्या गणवेशात हजाराहून अधिक सैनिक तैनात आहेत. सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्सच्या महिला जवानही अयोध्येत आहेत. हेलिकॉप्टरमधून राम मंदिरावर नजर ठेवली जात आहे. याशिवाय ड्रोन, विमाने किंवा हेलिकॉप्टरला मंदिर परिसरातून जाऊ दिले जाणार नाही. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरक्षा एनएसजी आणि सीआयएसएफकडे सोपवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आणि इतर व्हीव्हीआयपी पाहुणे ज्या मार्गावर जातात त्या मार्गांवर बांधलेल्या घरांची पडताळणी केली जात आहे. या मार्गावरील जवळपास सर्व घरांच्या छतावर सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत.

900 व्हीआयपी, 60 व्हीव्हीआयपी

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातील 900 व्हीआयपी व 60 व्हीव्हीआयपी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदी, अंबानी-अदानी, अमिताभ बच्चन, विराट कोहली यांच्यासह बड्या व्यक्तींचा समावेश आहे.

अशी आहे रामाची मूर्ती

  • मूर्तीत पाच वर्षाच्या मुलाची बालसुलभ कोमलता.
  • प्रभू श्रीरामाच्या हातात धनुष्यबाण.
  • पाणी प्रतिरोधक असल्याने हजारो वर्ष टिकेल.
  • दुधाचा, पंचामृताच्या अभिषेकानेही परिणाम नाही.
  • मूर्तीची चमक वर्षानुवर्ष कमी होणार नाही
  • पायाच्या बोटापासून मस्तकापर्यंत 51 इंच उंची
  • मूर्तीचे वजन जवळपास 200 किलो आहे.
  • डोक्यावर मुकूट आणि आभामंडल आहे
  • प्रभू श्रीरामाचे हात गुडघ्यापर्यंत (अजानुबाहू) लांब आहेत.
  • भव्य कपाळ, तेजस्वी आणि मोठे डोळे
  • कमळाच्या फुलावर उभी असलेली मूर्ती
  • मूर्तीसोबत दगडापासून आकाराची चौकट
  • एका बाजूला गरूड, दुसऱ्या बाजूला हनुमान
  • ही मूर्ती एकाच दगडापासून कोरण्यात आली आहे.
  • प्रभू श्रीरामांची मूर्ती काळ्या रंगाची आहे.

अयोध्या रंगली

अयोध्येत जागोजागी राम मंदिर रेखाटलेले झेंडे, धनुष्यधारी रामाचे कट आऊट, छायाचित्र, फलक दिसत असून संपूर्ण अयोध्या राममय झाली आहे.
मंदिराकडे जाणाऱ्या पुनर्विकसित रस्त्याला रामजन्मभूमी पथ असे नाव देण्यात आले आहे. येथील एका इमारतीतील सार्वजनिक बँकेच्या नवीन शाखेला ‘रामजन्मभूमी’ शाखा असे नाव देण्यात आले आहे.
व्हिजिटिंग कार्डस, फलक आणि कॅलेंडरही भव्य मंदिराच्या प्रतिमांनी सजले आहेत.
शहरात फलक लावणाऱ्या प्रत्येक कंपनीने कोणत्या ना कोणत्या प्रकारे राम मंदिराचे चित्रण केले आहे.
सार्वजनिक वाहतूक सेवाही राममय झाल्याचे दिसून येते. संपूर्ण अयोध्येतील बस, रस्ते आणि अगदी मोबाइल फोन कॉलर टय़ूनमध्ये याचा प्रभाव आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम बीएसएनएलने रामजन्मभूमी मार्गाशेजारी एका भिंतीजवळ मंदिराची प्रतिमा, छायाचित्रांनी जवळजवळ सर्व दुकानांच्या फलकांवर तसेच हॉटेल आणि लॉजच्या लॉबीच्या जागा पटकावली आहे.