श्रीमद्‌‍ भगवद्गीता, नाट्यशास्त्र ‘मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर’मध्ये

0
2

भारतासह जगभरात वास्तव्य करणाऱ्या तमाम भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरावी अशी बातमी समोर आली आहे. युनेस्को अर्थात जगभरातल्या हेरिटेज साईट्सचे जतन व संवर्धन करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जागतिक संस्थेने भगवद्गीता व नाट्यशास्त्र या दोन भारतीय ग्रंथांचा आपल्या ‘मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समावेश केला आहे. या समावेशानंतर या रजिस्टरमधील समाविष्ट भारतीय लिखितांची एकूण संख्या 14 वर पोहोचली आहे. या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

17 एप्रिल रोजी युनेस्कोने जगभरातल्या एकूण 74 लिखितांचा समावेश या यादीमध्ये केला. त्यात भगवद्गीता व नाट्यशास्त्राचा समावेश आहे. आता वर्ल्ड रजिस्टरमधील लिखितांची एकूण संख्या तब्बल 570 पर्यंत पोहोचली असून, त्यात 14 भारतीय लिखितांचा समावेश आहे.
केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी शुक्रवारी सकाळी या संदर्भातली माहिती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली. श्रीमद्‌‍ भगवद्गीता व भारतमुनी यांनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राचा युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समावेश करण्यात आला आहे. भारताचे शाश्वत ज्ञान आणि कलात्मक नैपुण्य यांचा हा सन्मान आहे, असे शेखावत यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर म्हणजे काय?
युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून जगभरातल्या हेरिटेज वास्तू आणि गोष्टींचे जतन केले जाते. अशा वास्तूंवर ‘जागतिक वारसा स्थळ’ असे नमूदही केलेले असते. भारतासह जगभरात अशी शेकडो ठिकाणे आहेत. युनेस्कोच्या माध्यमातून अशाच प्रकारे जगभरातल्या संपन्न संस्कृती व त्यांचा इतिहास मांडणाऱ्या लिखितांचेही जतन ‘मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर’च्या माध्यमातून केले जाते. याच यादीत आता भगवद्गीता व नाट्यशास्त्र यांचा समावेश करण्यात आला आहे.