श्रीपाद नाईक यांना राज्यमंत्रिपद

0
6

>> गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांत उत्साह

काल शपथग्रहण झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात उत्तर गोव्याचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा समावेश झाला आहे. श्रीपाद नाईक यांनी काल हिंदीतून शपथ घेतली. श्रीपाद नाईक यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. दरम्यान, श्रीपाद नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यामुळे राज्यातील भाजप गोटात तसेच भाजपचे स्थानिक कार्यकर्ते व भाजप समर्थक यांच्यात उत्साहाचे वातावरण होते. ज्या खासदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी एक बैठक घेतली होती. श्रीपाद नाईक यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आल्याचे वृत्त कळल्यानंतर गोव्यातील स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे पक्षाचे अन्य काही प्रमुख नेते हे शपथविधीनिमित्त दिल्लीत आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्रीपाद नाईक यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनीही श्रीपाद नाईक यांचे अभिनंदन केले आहे. श्रीपाद नाईक यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले असल्याने त्याचा फायदा गोवा सरकारला व गोव्याला होईल आणि पर्यायाने राज्यातील जनतेचाही त्यामुळे फायदा होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला आहे.
उत्तर गोव्यातून सलग सहावेळा खासदार म्हणून निवडून आलेले श्रीपाद नाईक हे काल चौथ्यांदा केंद्रीय मंत्री बनले असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शपथविधीसाठी गोव्यातून अनेक नेत्यांची उपस्थिती

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी गोव्यातून दिल्लीला गेलेल्या नेते मंडळींमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मगो नेते व वीजमंत्री सुदिन ढवळीकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, जलसंसाधन मंत्री सुभाष शिरोडकर, मच्छिमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, मंत्री आलेक्स सिक्वेरा, दक्षिण गोव्यातून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवलेल्या नेत्या पल्लवी धेंपो, बाबू कवळेकर, आमदार संकल्प आमोणकर, आमदार दिगंबर कामत, केदार नाईक, गणेश गांवकर, राजेश फळदेसाई, रुदाल्फ फर्नांडिस, डॉ. चंद्रकांत शेट्ये, जीत आरोलकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, उल्हास तुयेंकर, कृष्णा साळकर, माजी आमदार दामू नाईक, माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येंकर, दयानंद सोपटे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, विनय तेंडुलकर, सुलक्षणा सावंत व अन्य काही पक्ष पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.