श्रीपाद नाईक यांना ऊर्जा राज्यमंत्रिपद

0
8

>> 24 तासांत मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर शहा,
>> गडकरी, राजनाथ सिंह यांचे खाते कायम
>> जे. पी. नड्डांकडे आरोग्य खात्याची जबाबदारी
>> शिवराज सिंह चौहान सांभाळणार कृषिमंत्रिपद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर 24 तासांच्या आत नवनियुक्त मंत्र्यांना खात्यांचे वाटप करण्यात आले. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत देशाचा कारभार हाती घेतला आहे. शपथविधी सोहळ्यानंतर काल नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, त्या बैठकीत खातेवाटप करण्यात आले. उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्याकडे ऊर्जा आणि नवीन व अपारंपरिक ऊर्जा खात्याचे राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात जुन्या काही नेत्यांकडील खाती कायम ठेवण्यात आली आहेत. अमित शहा यांच्याकडील गृह, राजनाथ सिंह यांच्याकडील संरक्षण, निर्मला सीतारमण यांच्याकडील अर्थ, एस. जयशंकर यांच्याकडील परराष्ट्र, अश्विनी वैष्णव यांच्याकडील रेल्वे आणि नितीन गडकरी यांच्याकडील रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्रालय कायम ठेवण्यात आले आहे. तसेच पक्षातील दिग्गज नेत्यांकडे मोठ्या खात्यांची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालय सोपवण्यात आले आहे. शिवराज सिंह चौहान यांना कृषिमंत्रिपद देण्यात आले आहे.

गेल्या दोन वेळच्या तुलनेत यावेळेस शपथविधीनंतर खातेवाटप होण्यास सर्वाधिक वेळ लागला. रविवारी शपथविधी झाल्याच्या 23.30 तासांनी खातेवाटप झाले. यापूर्वी खाते वाटप करण्यासाठी 2019 मध्ये 18 तास आणि 2014 मध्ये 15.30 तास लागले होते.
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा भव्य शपथविधी रविवारी देश-विदेशातील दिग्गज नेते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात पार पडला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 36 राज्यमंत्री शपथबद्ध झाले होते. या सोहळ्यानंतर सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या कारभाराची सूत्रे हाती घेतली. यानंतर सायंकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत नवनियुक्त कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि राज्यमंत्री यांना खात्यांचे वाटप करण्यात आले.

मित्रपक्षांतील खासदारांनाही चांगली खाती

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मित्रपक्षांनाही स्थान मिळाले असून, तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) के राममोहन नायडू यांच्याकडे नागरी विमान वाहतूक खात्याची जबाबदारी दिली आहे. जनता दल (युनायटेड) चे राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंह यांच्याकडे पंचायत राजमंत्री, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायमंत्री ही खाती दिली आहेत. लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) चिराग पासवान यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग खात्याची जबाबदारी दिली आहे. त्याच बरोबर हिंदुस्थानी अवाम मोर्चा चे जीतन राम मांझी यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, तर जनता दल (सेक्युलर) चे एच. डी. कुमारस्वामी यांच्याकडे अवजड उद्योग आणि पोलाद खाते दिले आहे.

खात्यांबाबत पूर्णपणे समाधानी : नाईक
नवीकरणीय ऊर्जेच्या उपलब्ध सर्व संसाधनांच्या वापरावर भर दिला जाणार आहे. पारंपरिक ऊर्जा निर्मितीवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणाला दिलेल्या खात्याबाबत पूर्ण समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी खातेवाटपानंतर व्यक्त केली.

कॅबिनेट मंत्र्यांची संपूर्ण यादी

श्री. नरेंद्र मोदी

पंतप्रधान आणि पुढील खात्यांची धुरा :-

कार्मिक, सार्वजनिक तक्रारनिवारण आणि निवृत्तिवेतन मंत्रालय; अणु ऊर्जा विभाग; अंतराळ विभाग; सर्व महत्त्वपूर्ण धोरणात्मक बाबी; आणि कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेली उर्वरित सर्व खाती/विभाग.

कॅबिनेट मंत्री

राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री

अमित शहा – गृहमंत्री; आणि सहकार मंत्री

जगत प्रकाश नड्डा – आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री; रसायने आणि खतेमंत्री

नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

निर्मला सीतारमण – अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री

शिवराज सिंह चौहान – कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री, ग्रामविकासमंत्री

अश्विनी वैष्णव– रेल्वेमंत्री, माहिती-प्रसारणमंत्री, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती-तंत्रज्ञानमंत्री

डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर – परराष्ट्र व्यवहारमंत्री

मनोहर लाल खट्टर – गृहनिर्माण, नागरी व्यवहारमंत्री आणि उर्जामंत्री

एच. डी. कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री आणि पोलादमंत्री

पियुष गोयल – वाणिज्य आणि उद्योगमंत्री

धर्मेंद्र प्रधान – शिक्षणमंत्री

जीतन राम – मांझी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री

सर्वानंद सोनोवाल – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्गमंत्री

राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह – पंचायत राजमंत्री, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायमंत्री

वीरेंद्र कुमार – सामाजिक न्यायमंत्री

के. आर. नायडू – नागरी विमान वाहतूकमंत्री

प्रल्हाद जोशी – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री, नवीन व अपारंपरिक ऊर्जामंत्री

जुआल ओरम – आदिवासी व्यवहारमंत्री

गिरीराज सिंह – वस्त्रोद्योगमंत्री

ज्योतिरादित्य शिंदे – दळणवळणमंत्री, ईशान्य क्षेत्राचे विकासमंत्री

भूपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदलमंत्री

गजेंद्रसिंह शेखावत – पर्यटनमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री

अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्री

किरेन रिजिजू – संसदीय कामकाजमंत्री, अल्पसंख्याक व्यवहारमंत्री

हरदीप सिंग पुरी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री

मनसुख मांडवीय – कामगार-रोजगारमंत्री आणि युवा व्यवहार तथा क्रीडामंत्री

जी. किशन रेड्डी – कोळसामंत्री आणि खाणमंत्री

चिराग पासवान – अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री

सी. आर. पाटील – जलशक्तीमंत्री