श्रीपादभाऊंना उमेदवारी नाकारल्यास भाजपचा पराभव!

0
16

>> भंडारी समाजातील नेते गुरुदास सावळ यांच्याकडून शक्यता व्यक्त;

>> समाजातील अन्य नेत्यांकडून साधकबाधक प्रतिक्रिया

श्रीपाद नाईक हे भंडारी समाजातील एक दिग्गज असे नेते असून स्वच्छ चारित्र्याचे नेते असलेले नाईक हे भंडारी समाजच नव्हे, तर बहुजन समाज तसेच ब्राह्मण समाजातही लोकप्रिय आहेत. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत जर श्रीपाद नाईक यांना उमेदवारी नाकारली, तर त्याचे तीव्र पडसाद उमटतील व उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार व भंडारी समाजातील एक नेते गुरुदास सावळ यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिली.

भाजपमधील कुणीतरी श्रीपाद नाईक यांना बाजूला काढण्यासाठी त्यांच्या विरुद्ध हे षड्‌‍यंत्र रचले असावे, अशी शंकाही सावळ यांनी व्यक्त केली. श्रीपाद भाऊंविरोधात प्रथम माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांना पुढे काढण्यात आले आणि आता त्यांच्याविरोधात माजी आमदार दयानंद सोपटे यांना पुढे काढण्यात आल्याचे सावळ म्हणाले. भाऊंविरोधात भंडारी समाजातीलच दोन नेत्यांनाच पुढे काढणे यावरुन योग्य रणनीती तयार करुनच हे सगळे नेते जात आहे हे स्पष्ट होत असल्याचे सावळ म्हणाले.

यासंबंधी विवेक कृष्णा नाईक हे म्हणाले की, जो नेता आपल्या मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाही, त्यांनी श्रीपाद भाऊंसारख्या दिग्गज नेत्यला विश्रांती घेण्याचा सल्ला देऊ नये. श्रीपाद नाईक हे फार मोठे नेते आहेत आणि त्यांनी तळागाळात काम केलेले आहे. ते फक्त भंडारी समाजापुरतेच लोकप्रिय नसून, सर्व समाजात लोकप्रिय आहेत. ते कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले तरी देखील त्यांच्यामागे बरेच लोक उभे राहतील. श्रीपादभाऊंचे कार्य हे खूप व्यापक आहे आणि त्यांना उमेदवारी द्यायची की नाही त्याचा निर्णय पक्षाचे नेते घेतील.

अशोक नाईक हे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, उत्तर गोवा मतदारसंघात भाजपची उमेदवारी कुणाला द्यावी यासंबंधीचा निर्णय हा पक्षश्रेष्ठी आणि गोव्यातील भाजपची गाभा समिती मिळून घेईल. अजून त्यासंबंधी काहीही ठरलेले नाही. त्यामुळे श्रीपाद भाऊंवर अन्याय होतो आहे, असे आत्ताच म्हणणे बरोबर होणार नाही.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी कुणाला द्यावी त्याचा निर्णय भाजपच घेऊ शकते. समाज त्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही, असे मत देवानंद नाईक यांनी मांडले. श्रीपादभाऊंविषयी आम्हाला आदर आहे; पण भंडारी समाजातील चार-चार नेते उमेदवारीसाठी दावा करायला लागले तर समाजाने कोणती भूमिका घ्यावी, असा प्रश्नही नाईक यांनी केला. याबाबत भाजपच योग्य काय तो निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.

जनता भाऊंना बाजूला करणार नाही
पंतप्रधान व गृहमंत्री ही दोन पदे सोडून अन्य पदांसाठी 60 वर्षांवरील नेत्यांना निवडणूक लढवू द्यायची नाही, असे भाजपने ठरवले असून, केंद्रातील कित्येक दिग्गज नेत्यांना हा नियम लागू करुन बाजूला करण्यात आले आहे. भाजपने श्रीपादभाऊंना बाजूला करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी जनता त्यांना बाजूला करणार नाही, असेही गुरुदास सावळ म्हणाले.