ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू व जागतिक क्रमवारीत द्वितीय असलेल्या किदांबी श्रीकांत यांना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अनुक्रमे महिला एकेरी व पुरुष एकेरीसाठी अव्वल मानांकन देण्यात आले आहे. १० एप्रिलपासून या प्रकाराचे सामने कारेरा स्पोटर्स अँड लिजर सेंटरवर होणार आहेत.
६४ खेळाडूंच्या महिला एकेरीच्या ‘ड्रॉ’मध्ये सिंधू दुसर्या फेरीत आपल्या मोहिमेची सुरुवात फाल्कलँड्स आयलंडच्या झो मॉरिस हिच्याविरुद्ध करणार आहे. पहिल्या फेरीत सिंधूला ‘बाय’ मिळाली आहे. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना २०१४च्या ग्लास्गोतील स्पर्धा विजेत्या मिचेल ली हिच्याशी होऊ शकतो. चार वर्षांपूर्वी कॅनडाच्या तिसर्या मानांकित ली हिने आपल्या जेतेपदाच्या प्रवासादरम्यान सिंधूला उपांत्य फेरीत नमविले होते. ‘२०१०’ची विजेती व द्वितीय मानांकित सायना नेहवाल एल्सी डीव्हिलियर्सविरुद्ध आपपा पहिला सामना खेळणार आहे. रुत्विका गड्डे हिला आठवे मानांकन लाभले आहे. घानाच्या अतिपिका ग्रेस घा व अह वान ज्युलियट (सिशिलिस) यांच्यातील विजेत्याशी तिचा सामना होणार आहे.
पुरुष एकेरीत श्रीकांत आपला सलामीचा सामना फिजीच्या लियाम फोंग याच्याविरुद्ध खेळणार आहे. उपांत्य फेरीत श्रीकांतला २०१०च्या रौप्यपदक विजेत्या राजीव ओसेफ याच्याशी दोन हात करावे लागू शकतात. ऑल इंग्लंडच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलेल्या प्रणॉयला तिसरे मानांकन प्रदान करण्यात आले आहे. पॉल जॉन व स्टीव मालकुझाने यांच्यात विजयी ठरणार्या खेळाडूशी तो दुसर्या फेरीत लढणार आहे. उपांत्य फेरीत त्याला तीनवेळच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या ली चोंग वेई याच्याशी झुंजावे लागू शकते.